अंकुश सुरवडे प्रकरणात सायन रुग्णालयाचा निष्काळजीपणा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
Ankush_1  H x W

प्रवीण दरेकर यांच्याकडे आयुक्तांची स्पष्टपणे कबुली

मुंबई : अंकुश सुरवडे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याप्रकरणात सायन रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा झाल्याची स्पष्ट कबुली मुंबई महापलिका आयुक्तांनी दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून यासाठी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.


अंकुश सुरवडे या तरुणाचा २८ ऑगस्ट रोजी पूर्व द्रुतगती मार्गावर अपघात झाल्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण १४ सप्टेंबरला अंकुशचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून कळल्यानंतर अंकुशचे नातेवाईक व मित्रपरिवार रुग्णालयात गेले. पण त्यांच्या असे लक्षात आले की, अंकुशच्या किडनीजवळ शस्त्रक्रिया करूरन टाके घालण्यात आले आहेत. याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांकडे विचारणा केल्यानंतर डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. रुग्णालयाकडून कोणताही समाधानकारक खुलासा करण्यात आला नाही. दरम्यान अंकुशचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला. दोन तासानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता अंकुशचा मृतदेह चुकुन दुसऱ्याला देण्यात आला व त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायन रुग्णालयाच्या या संशयास्पद काराभाराविरुध्द विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मंगळवारी सायन रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाप्रसंगी पालिका आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनामुळे आज प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेण्यात आली. याप्रसंगी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, पालिकेचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका राजश्री शिरवाडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आदी उपस्थित होते. तसेच सुरवडे कुटुंबीयही उपस्थित होते.


यावेळी दरेकर यांनी आयुक्तांना सविस्तर निवेदन देऊन या प्रकरणाची चर्चा केली. यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, अंकुश या युवकाच्या डोक्याला मार लागला असताना त्याचे ऑपरेशन का केले, याचे स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी दिले. पण रुग्णालयातील त्या विभागात किडनीचा गैरव्यवहार होतो. त्यामुळे कुटुंबियांचा संशय आहे की यामध्ये काही वेगळे घडले असावे. यासाठी आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.


सायन रुग्णालयामध्ये मृतदेहासंदर्भात, रुग्णाच्या प्रवेशासंदर्भात, मशिनरी उपलब्ध नसणे, एमआरआय नादुरुस्त अवस्थेत असणे, असे प्रकार गेल्या काहि महिन्यांपासून वारंवार घडत आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी व मुंबईमधील सामान्य रुग्णांसाठी हे एक प्रमुख रुग्णालय आहे. त्यामुळे असे प्रकार घडणे म्हणजे रुग्णालयाची विश्वासार्हता कमी होण्यासारखे आहे.


अंकुश सुरवडे प्रकरणात सायन रुग्णालयाकडून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले. त्यामुळे या प्रकरणात केवळ कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करुन चालणार नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी होती. त्यामुळे सुरवडे प्रकरणात एक चौकशी समिती नेमण्याची मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. या समितीमध्ये आरोग्य खात्यातील तज्ञ व पोलिस खात्यातील अधिकारी यांचा समावेश असेल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. पण या समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक असावा अशी विनंतीही आम्ही यावेळी आयुक्तांकडे केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.




@@AUTHORINFO_V1@@