भारतीय विचारपरंपरेचे कमलपुष्प : नरेंद्र मोदी

16 Sep 2020 20:28:58
Narendra _1  H


 
चित्तवृत्ती स्थिर ठेवणारा, शरीरशक्ती वाढविणारा ‘योग’ मोदींनी सर्व जगात नेला. मोठ्या अभिमानाने ‘भगवद्गीता’ वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांना भेट दिली. त्यावेळी त्या राष्ट्रप्रमुखांना नक्कीच असे वाटले असेल की, आज खर्‍या अर्थाने आपल्याला भारत भेटला. इतकी वर्षे काळ्या इंग्रजांचा भारत भेटत होता, आता ‘सनातन भारत’ भेटत आहे.
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी दोघेही संघस्वयंसेवक आहोत. वाढदिवस साजरा करण्याचे संस्कार संघस्वयंसेवकांवर होत नाहीत. परंतु, आता सार्वजनिक जीवनात वाढदिवस साजरा करणे आणि शुभेच्छा देणे ही एक प्रथा झालेली आहे. कालानुरूप बदलत राहायचे हा हिंदू स्वभाव असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ‘सा. विवेक’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे देतो. आपल्या जिव्हाळ्याच्या माणसाविषयी लिहिणे अवघड असतं. नको त्या स्तुतीचा दोष येण्याचा संभव असतो आणि लेख एककल्ली होण्याचीही दाट शक्यता राहते. या लेखाचेही तसे काही झाल्यास वाचकांनी क्षमा करावी.
 
 
 
भाजपमध्ये जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी गुजरात प्रांतात प्रचारक होते. ‘राजकारण’ हा प्रचारकाचा ध्येयवाद नसतो. संघ सांगेल ते काम करायचे, ही प्रचारकांची मनोवृत्ती असते. पूज्य बाळासाहेब देवरस यांनी त्यांना भाजपचे काम करण्यास सांगितले. ते भाजपात गेले आणि काम करू लागले. पाण्याविषयी म्हटले जाते की, ‘पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावे वैसा.’ प्रचारकाविषयी असेच म्हणता येते की, प्रचारक ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्राचा तो होऊन जातो. दत्तोपंत मजदूर क्षेत्रात गेले ते मजदूर पुढारी झाले. एकनाथजी रानडे कन्याकुमारी शिलास्मारक समितीत गेले आणि ते कर्मयोगी विवेकानंदच झाले. दीनदयाळ उपाध्याय जनसंघात गेले आणि देशाचे पहिल्या श्रेणीचे राजकारणी झाले. ही फक्त ठळक उदाहरणे दिली आहेत. संघात अशी असंख्य उदाहरणे पावलोपावली दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे जीवंत उदाहरण आहे.
 
 
ज्या क्षेत्रात जायचे, त्या क्षेत्राप्रमाणे व्यवहार करायचा. संघकार्यातील प्रचारकाला कपड्याचे दोन-तीन जोड पुरेसे होतात. पंतप्रधानाला कपड्यांचे ढीग लागतात, ती त्या क्षेत्राची गरज आहे. राजकारण करीत असताना पक्षहिताला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते. संघकाम करीत असताना ‘समाजहित’ हा अग्रक्रमाचा विषय असतो. संघाचं नाव वाढविण्यासाठी कोणी काम करीत नाही. राजकीय पक्षाचे काम करीत असताना असे करून चालत नाही. सत्तेचे राजकारण करताना ‘हे आपले, ते विरोधक’ अशी विभागणी स्वाभाविकपणे होते. आपल्या लोकांना जवळ करावे लागते, त्यांचे कौतुक करावे लागते, त्यांना पदे द्यावी लागतात. विरोधकांना दूर ठेवावे लागते आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ठोकून काढावे लागते. संघकाम करीत असताना ‘सगळेच आमचे, आमचा कोणाला विरोध नाही, आमचे कोणी विरोधक नाहीत,’ या भावनेने काम करावे लागते.
 
 
राजकारणात धनशक्तीला फार महत्त्व असते. म्हणून राजकीय पक्ष तसे श्रीमंत असतात. वेगवेगळ्या मार्गाने ते धन गोळा करीत राहतात. राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे राहणीमानदेखील सत्ताधारी व्यक्तीला शोभेल असेच असावे लागते. झोपडीत राहणारा राजनेता हा उदाहरण द्यायला चांगला असतो. पण, तशी अपेक्षा प्रत्येकाकडून करता येत नाही, करणेदेखील अन्यायकारक आहे. संघकामात धनाला शून्य महत्त्व असते. संघ देणग्या गोळा करीत नाही. कधीही धनसंग्रह स्वतःसाठी करीत नाही. कोणत्याही संघप्रचारकाचे बँक अकाऊंट नसतं. त्याचे कपडे, चार पुस्तकं, साबण, दाढीचे सामान, पादत्राणे एवढीच त्याची संपत्ती. अशा दोन्ही रचनेमध्ये केवढे तरी अंतर आहे. अशा संघरचनेतील व्यक्ती राजकारणात जातात आणि काम करतात, याचे अर्थ काय होतात?
 
 
नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्यवहाराने हे अर्थ काय होतात हे भारतालाच काय, पण जगाला दाखवून दिलेले आहेत. छोट्या-छोट्या वाक्यांतून ते बोलतात. ‘सबका साथ, सबका विकास’ हे भाजपचे आणि शासनाचेही घोषवाक्य आहे. याचा अर्थ होतो, सर्वच आपले आहेत आणि विकासात सर्वांनाच सामावून घ्यायचे आहे. ‘आपला-परका’ असा भेद करायचा नाही. ‘लोकल टू ग्लोबल’ - ‘स्थानिक ते वैश्विक’ अशी दुसरी घोषणा आहे. तिलाही खोलवरचा अर्थ आहे. आपले उत्पादन विश्वात गेले पाहिजे आणि उत्पादन केंद्रे खेडोपाडी असली पाहिजेत.
 
सभेनंतर नरेंद्र मोदी घोषणा देतात, ‘भारतमाता की जय.’ संघप्रार्थनेची अंतिम ओळ आहे, प्रार्थनेत ती गंभीरपणे म्हटली जाते, घोषणा दिली जात नाही. स्वातंत्र्यानंतर ‘भारतमाता’ विसरविण्याचे राजकारण झाले. अगोदर ‘वंदे मातरम्’ गीत कापले, नंतर भारतमातेचा जयजयकार बंद केला. काही अफाट बुद्धिवादी सांगू लागले की, ‘भारतमाता की जय’ म्हणून राष्ट्रभक्ती प्रकट करावी, असे मला वाटत नाही. माझी राष्ट्रभक्तीची कल्पना वेगळी आहे. मोदी या कोणाच्याही तोंडी लागत नाहीत. ते ‘भारतमाता की...’ म्हटल्यानंतर जनता उत्स्फूर्तपणे जयजयकार करीत राहते. ‘भारतमाता की जय’ म्हणजे, भारत आमची माता आहे, आम्ही तिची संतान आहोत. संतान असल्यामुळे परस्पर बंधू-भगिनी आहोत. परस्पर बंधू-भगिनी असल्यामुळे एकमेकांची काळजी करणे आमचे कर्तव्य आहे. आई म्हटली की, आपल्या डोळ्यापुढे कौशल्या येते, यशोदा येते, कुंती येते, जिजामाता येतात, आधुनिक काळातील रमाबाई येतात, बा कस्तुरबा येतात. अशा आईचे पांग फेडायचे असतात. याला ‘पुत्र-पुत्री कर्तव्य’ असे म्हणतात. ते भारतातील कोणालाही सांगावे लागत नाही. जन्म देणार्‍या आईच्या जागी ‘भारतमाता’ आणायची एवढेच करायचे आहे. मोदींनी हे काम जबरदस्त केले आहे.
 
 
हा देश अतिशय प्राचीन आहे. त्याची श्रेष्ठ विचारधारा आहे. अतिशय श्रेष्ठतम अशी जीवनपद्धती आहे. ती गाडण्याचा प्रयत्न डाव्या विचारवंतांनी आणि काँग्रेसमधील खूप मोठ्या गटाने केला. असे करणे म्हणजे, सूर्याला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखे होते. त्यात अनेकांचे हात भाजले आणि थोबाडं जळली. नरेंद्र मोदी यांनी या परंपरेचा सर्वस्वी स्वीकार केला, लोकसभेच्या पायर्‍या पहिल्यांदा चढत असताना त्यांनी लोकसभेच्या मंदिरावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला, रामलल्लाच्या मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातला. ‘मी भले पंतप्रधान असेन, पण, माझ्याहून सर्वश्रेष्ठ संसद आहे आणि माझ्याहून सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे,’ हे त्यांनी आपल्या देहबोलीने दाखवून दिले. आपल्यापेक्षा श्रेष्ठाला नमस्कार करणे ही भारतीय संस्कृती आहे. कोरोनाचे संकट सुरू होत असताना सायंकाळी दिवे लावा, असे त्यांनी देशाला सांगितले. दीपज्योती ही आपली संस्कृती आहे. ते वाराणसीला गेले आणि भक्तिभावाने त्यांनी गंगेची आरती केली. गंगेलाही तेव्हा आपला पुत्र ‘देवव्रत भीष्म’ भेटल्याचा आनंद झाला असेल.
 
 
चित्तवृत्ती स्थिर ठेवणारा, शरीरशक्ती वाढविणारा ‘योग’ मोदींनी सर्व जगात नेला. मोठ्या अभिमानाने ‘भगवद्गीता’ वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांना भेट दिली. त्यावेळी त्या राष्ट्रप्रमुखांना नक्कीच असे वाटले असेल की, आज खर्‍या अर्थाने आपल्याला भारत भेटला. इतकी वर्षे काळ्या इंग्रजांचा भारत भेटत होता, आता ‘सनातन भारत’ भेटत आहे. ‘शक्तिउपासना’ हा या युगाचा मंत्र आहे. संरक्षण सिद्धता ही शक्ती उपासना आहे. अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे, पाणबुड्या, विमानवाहू नौका, ही सर्व संरक्षण शक्तीची साधने आहेत. मोदींनी त्याकडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. शत्रूला वचक बसवायची असेल, तर आपला एक जवान मारला तर त्यांचे दहा जवान मारले पाहिजेत. मोदींनी आतापर्यंत ते करून दाखविले आहे. सैनिकी शक्तीला आर्थिक शक्तीची जोड लागते. ‘आत्मनिर्भर भारत’ ही भारताला आर्थिक शक्ती बनविणारी संकल्पना आहे. तिचे परिणाम पुढच्या तीन-चार वर्षांत दिसू लागतील. सगळ्यात मोठी शक्ती समाजाच्या संकल्पशक्तीत असते. मोदींनी स्वतःविषयी सर्व देशांत प्रचंड विश्वास निर्माण केलेला आहे. समाजातील सामान्य व्यक्तीशी तुम्ही बोला, तो मोदींविषयी चार चांगले शब्दच बोलेल.
 
 
याचा अर्थ असा आहे की, समाजशक्तीला परिवर्तन हवे आहे, बदल हवा आहे, विकास हवा आहे. स्वाभिमानाने जगता येईल, असे वातावरण हवे आहे. व्यक्तिगत स्वाभिमान आणि राष्ट्रीय स्वाभिमान यात खूप मोठा फरक असतो. राष्ट्रीय स्वाभिमान देशासाठी प्रसंगी प्राण देण्यासही प्रेरित करतो. हा राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करण्याचे अलौकिक कार्य मोदी यांनी केले आहे. ‘आम्ही कोण आहोत?’ याची त्यांनी समाजाला ओळख करून दिली आहे. आमची परंपरा, संस्कृतीमूल्ये काय आहेत, हे त्यांनी जगून दाखविलेले आहे. असे जीवन आपण जगलो तर प्रगती हाच आपला मार्ग राहील, समृद्धी हेच आमचे गंतव्यस्थान राहील आणि जागतिक महासत्ता हे आमचे शिखर राहील. युगानुयुगे ज्या नेतृत्वाची वाट बघावी, असे नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला लाभले आहे. त्यांना भरपूर आयुष्य लाभो, त्यांची प्रकृती सदैव उत्तम राहो, अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना!
 
 
Powered By Sangraha 9.0