कोरोनाकाळातही 'टाटा' देणार कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस

    दिनांक  16-Sep-2020 15:56:15
|
TATA _1  H x W:

नवी दिल्ली :
टाटा समुह नेहमी आपल्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. कोरोनाच्या संकटात जिथे अनेकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली असताना टाटा मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस देणार आहे. टाटा समुहाने नुकताच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. कोरोना संकटात होणारी ही आर्थिक मदत या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची मानली जात आहे.
 
 
टाटा स्टील (Tata Steel) या कंपनीने सोमवारी बोनसबाबत घोषणा केली. टाटा स्टीलतर्फे एकूण २३५.५४ कोटी रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. या बोनसचे वाटप एकूण २४ हजार ७४ कर्मचाऱ्यांमध्ये वेतन श्रेणीप्रमाणे वाटप होईल. जमशेदपूर युनिटमधील ट्यूब डिव्हिजनच्या एकूण १२ हजार ८०७ कर्मचाऱ्यांना १४२.०५ कोटी रुपये तर उर्वरित ९३.४९ कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या ११ हजार २६७ कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाणार आहे.
 
 
 
या घोषणेप्रमाणे कर्मचाऱ्याला किमान २६ हजार ८३९ तर जास्तीत जास्त ३ लाख १ हजार ४०२ इतका बोनस मिळणार आहे. कंपनीतर्फे पूर्वनियोजित अटींनुसार बोनस देण्यात येणार आहे. कोरोना किंवा आर्थिक मंदी याबद्दलचे कुठलेही कारण कर्मचाऱ्यांना दिले जाणार नाही. टाटा स्टीलचे एमडी टीव्ही नरेंद्रन आणि टाटा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आर रवी यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे.
 
 
 
कर्मचारी कपातीवर टाटांची नाराजी
 
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान पाहता अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना नारळ दिला. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रतन टाटा यांनी या प्रकाराला असंवेदनशीलपणा म्हटले आहे. अशा कंपन्या केवळ नफा कमावण्यासाठीच काम करतात का, मुल्य आणि कामगारांचे हित याबद्दलही विचार व्हायला हवा, असे मत त्यांनी यावर व्यक्त केले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.