सुशांतसिंग प्रकरणात नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |

nitesh rane_1  


मुंबई :
भाजप  आमदार नितेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. दिशा ज्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. कुणाच्या तरी दबावामुळे त्याने मुंबई सोडली असावी, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.


आमदार नितेश राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून म्हटलं आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्येचा तपास सध्या सुरु आहे. यात दिशा सालियनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा रोहन रॉय याची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी केली नाही. ज्या दिवशी दिशाचा इमारतीवरुन खाली पडली तेव्हा तिथे रोहन रॉय उपस्थित होता. दिशा खाली पडल्यानंतरही रोहन रॉय २०-२५ मिनिटांनी फ्लॅटमधून खाली आला होता त्यामुळे त्याच्या वागणुकीवर संशय निर्माण होतो. तसेच, रोहन रॉयने मुंबई सोडून जावं यासाठी त्याला धमकी देण्यात आली असावी. मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने त्याला मुंबईत येण्याची भीती वाटत असावी. कोणीतरी या प्रकरणाला रोहन रॉयवर दबाव टाकून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करतंय असा दावाही नितेश राणेंनी केला. त्यामुळे रोहन रॉयला केंद्र सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी जेणेकरुन तो मुंबईत आल्यानंतर सुरक्षित राहील. रोहन रॉय हा दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य दुवा आहे. त्याच्या जबाबानंतर अनेक खुलासे बाहेर येतील. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे असं स्पष्ट मत आमदार नितेश राणेंनी पत्रात मांडले आहे.


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ही आत्महत्या नसून त्याची हत्या झाली आहे असा दावा करण्यात येत आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. यानंतर कोर्टाने सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.या संपूर्ण घडामोडीत भाजपा नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाल्यानंतर हत्या करण्यात आली असं पत्रकार परिषदेत म्हटले होते.या दोन्ही मृत्यूंचा काही संबंध आहे का, असा प्रश्न यापूर्वीही उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, सीबीआय सध्या सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे.
@@AUTHORINFO_V1@@