पाकिस्तानची नकाशेबाजी ; अजित डोवालांनी केला निषेध तर रशियानेही फटकारले

    दिनांक  16-Sep-2020 12:12:02
|

ajit doval_1  Hनवी दिल्ली :
चीन व पाकिस्तानच्या मैत्रीने पुन्हा एकदा शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आभासी बैठकीत भारताविरूद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला, परंतु राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाच्या  कठोर पवित्र्यामुळे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्यात भारताला यश आले. वस्तुतः या बैठकीत पाकिस्तानने एक काल्पनिक नकाशा सादर केला आणि त्यामध्ये भारताची भूमीही आपली असल्याचे जाहीर केले. 


पाकिस्तानने दाखविलेल्या या नकाशानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानच्या या काल्पनिक नकाशाचा निषेध करत बैठक मध्येच सोडली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने पाकिस्तानच्या या नकाशाला तीव्र विरोध दर्शविला. या बैठकीचे अध्यक्षस्थान असलेल्या रशियानेही पाकिस्तानला फटकारले आणि हा नकाशा दर्शविण्याचा विरोध केला. रशियाने अशीही आशा व्यक्त केली आहे की पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कृत्याचा एससीओमधील भारताच्या सहभागावर परिणाम होणार नाही.


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या महिन्यातदेखील एक नवीन नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशामध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीरला पाकिस्तानचा एक भाग म्हणून दाखविण्यात आले होते. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्र शासित प्रदेश आहेत. एससीओच्या बैठकीत पाकिस्तानने हा नकाशा प्रतिमा म्हणून वापरला. रशियाने गेल्या आठवड्यात एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी असे स्पष्ट केले होते की एससीओ बैठकीत द्विपक्षीय वादावर चर्चा करण्यास मनाई केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.