'मराठा आंदोलकांना नोटीस बजावणे सरकारने थांबवावे'

    दिनांक  16-Sep-2020 13:53:11
|

maratha kranti morcha_1&nमुंबई :
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यभरातील मराठा समाज संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासाठी राज्यस्तरीय बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. मात्र, या आंदोलनकांवर पोलिसांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असून अनेकांना पोलिसांनी नोटीस पाठविल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आंदोलकांना नोटीस बजावणे सरकारने थांबवावे अशी मागणी केली आहे.ते पत्रात म्हणतात,मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावने सुरू केले आहे. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करून आणि नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.पुढे ते म्हणतात, मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेंव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतः साठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे.न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्याउपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे,अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकरने केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.