चंबळ नदी ओलांडताना बोट दुर्घटना ; आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

16 Sep 2020 12:38:03

Chambal River_1 &nbs
 
 
कोटा : राजस्थानमधील बुंदी येथील चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये बोट बुडून मोठा अपघात झाला. या घटनेत ३० ते ४० जण बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप काहीजण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
कोटाचे पोलीस अधीक्षक शरद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. आतापर्यंत १५ लोकांना वाचवण्यात यश मिळाले असून, १४ लोक बेपत्ता आहेत. या लोकांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. तसेच, ७ व्यक्तींचा मृतदेह नदीतून बाहेर काढला आहे. या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. एसडीआरएफचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता लोकांमध्ये बहुतांश महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0