मुक्ती संग्रामात ‘गूंज उठी गुंजोटी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |


Marathvada Mukti Sangram_
 


दि. १७ सप्टेंबर रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला. आज या घटनेला ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामात महर्षी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या ‘आर्य’ समाजानेही महत्त्वाची भूमिका निभावली. आज जाणून घेऊया मराठवाडा मुक्ती संग्रामात ‘आर्य’ समाजाच्या बरोबरीने ‘गुंजोटी’ गावाने दिलेल्या लढ्याबद्दल...

 


हैदराबाद संस्थान एक मोठे संस्थान होते. यात आजचा तेलंगण, आंध्र, कर्नाटक (गुलबर्गा, रायचूर, मराठवाडा) यांचा समावेश होता. निझामाच्या अधिपत्याखालील हे संस्थान शिक्षणापासून वंचित असलेला या चार भागातील लोकांना मातृभाषेतून शिकण्याची सुविधाच नव्हती. सामाजिक व धार्मिक कसलेच स्वातंत्र्य नव्हते. समारंभात मिरवणुकीत बॅण्ड (वाजंत्री) लावला जाई. पण, काही ठिकाणी तो बंद ठेवून मूकपणे जाणे सक्तीचे होते. धार्मिक विधी करायलाही अडथळा केला जायचा. हवन (यज्ञ) करण्याचा प्रयत्न केला, तर यज्ञकुंड जप्त केला जाई. सर्व प्रजेला गुलामगिरीचे जीवन जगावे लागे. गावातील सुंदर महिलांना पोलीस व अन्य अधिकार्‍यांकडून बोलावून घेऊन त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला जाई. याविरुद्ध ‘ब्र’ही काढता येत नसे. अशा कितीतरी प्रकारच्या अनन्वित अत्याचारास तोंड द्यावे लागे. अन्याय निमूटपणे सहन करावा लागे. एकूण सारेच त्रस्त.


अशा या भयग्रस्त वातावरणात आशेचा किरण दिसू लागला. तो पं. नरेंद्रजी, भाई श्यामलालजी व भाई बन्सीलालजी यांच्या रूपाने. कारण, या मान्यवरांच्या साहाय्याने दिल्लीतील सार्वदेशिक ‘आर्य प्रतिनिधी सभे’ने प्रांतीय ‘आर्य प्रतिनिधी सभेची हैदराबाद येथे स्थापना केली गेली. सभेचा कार्यभार या निर्भिक नेत्यांकडे सोपविला. यांच्या मदतीला इतरही अनेकांची साथ लाभली. निझाम शासनाच्या राजधानीतच हे सभेचे कामही सुरू झाले. श्यामलाल व बन्सीलाल बंधूंनी सारा मराठवाडा, कर्नाटकातील गुलबर्गा, रायचूर इत्यादी ठिकाणी पायी फिरून पिंजून काढला. या सार्‍या भागात महर्षी दयानंदांनी सुरू केलेल्या ‘आर्य समाजा’च्या शाखा सुरू करण्याचा जणू चंगच बांधला. या संस्थेने सर्वांना स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे धडे दिले. लोक अक्षरशः भारावून गेले. निझाम सरकारच्या जुलुमी राजवटीला हे एक मोठे आव्हानच होते. खेडोपाडी आर्य समाजाची स्थापना होऊन लागली. विशीच्या वयातील तरुण मंडळी उभी करण्याच्या क्रियेला प्रचंड गती मिळाली. उदगीर, भालकी, बिदर, हुमनाबाद, गुलबर्गा, रायचूर, आळंद, बसवकल्याण, निलंगा, लातूर, मोगरगा, रेणापूर, माडज, गुंजोटी, मुरूम, कासार शिरसी, बडूर, वलांडी, उस्मानाबाद, लातूर, केज अशा कितीतरी ठिकाणी ‘आर्य समाजा’ची स्थापना करण्यात आली. भाई श्यामलाल व भाई बन्सीलाल या जोडीने सातत्याने प्राण फुंकण्याचे काम केले. या सर्वांना मदतही अनेकांची होत होती, ज्यात शेषरावजी वाघमारे, पं. वीरभद्रजी आर्य, पत्तेवार, पं. प्रल्हादजी, पं. विनायकराव विद्यालंकार, पं. नरदेवजी स्नेही, पं. ज्ञानेंद्रजी शर्मा, पं. उत्तममुनीजी आदी मंडळी होती. या सर्वांनी एकसंध प्रयत्नाला सुरुवात केली. वर वर्णिलेल्या गावांचा जो उल्लेख केला, त्यापैकी अधिकांश गावे गुंजोटी गावाच्या नियंत्रणाखाली होती. निझाम शासनाने गुंजोटी या गावास ‘पायगा’ हा दर्जा दिला होता. त्यावेळी ‘पायगा’ म्हणजे जिल्ह्यापेक्षा विस्ताराने मोठे क्षेत्र, अशा पायग्याच्या ठिकाणी सर्व प्रकारची कार्यालये असायची. त्यात तहसील, न्यायालय, टपाल, कचेरी, घोड्यांचा पागा, जेलखाना (बंदिशाळा), पोलीस कमिशनरच्या दर्जाचा अधिकारी व त्यांचा लवाजमा, असे सर्व शासकीय अधिकारी त्यांच्या कचेर्‍या असत. गुंजोटी हे तसे एक कमी लोकसंख्येचे गाव; पण इथे वरील सर्व कार्यालये होती. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रचंड मोठे पठार होते. त्याला ‘गढी’ म्हणून संबोधले जाई. गढीवरच्या कार्यालयात जाण्यासाठी चढण असलेला शानदार रस्ता होता. मुख्य इमारतीपर्यंत तीन विशालकाय कमानी होत्या. मुख्य इमारतीत जाण्यासाठी २० फूट लांबीच्या व प्रत्येकी नऊ इंच उंचीच्या सुमारे २० पायर्‍या होत्या. इमारतीला प्रचंड मोठा दरवाजा. आत लिंबाची खूप मोठी झाडे होती. त्यात अनेक दालने होती. आत चार मोठी मैदाने होती. एक विशालकाय असे सभागृह सुमारे १००.०० चौ. फुटांचे असावे. या सभागृहाला नक्षीकाम केलेले खांब होते. सभागृहात जाण्यासाठीही २० फूट लांबी असलेल्या सुमारे २० पायर्‍या होत्या. ‘पायगा’ म्हणून या गुंजोटी गावाची निवड बहुधा यासाठी केली होती की, येथून गुलबर्गा, रायचूर, हैदराबाद, हुमनाबाद, जहिराबाद, बिदर, देगलूर, उदगीर, बीड, लातूर, केज, धारूर इत्यादीना सहज जोडले गेलेले होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गुंजोटीपासून अवघ्या १५ मैलावर (म्हणजे सुमारे २५ ते ३० किमी) इंग्रजांची राजवट होती. तसे गुंजोटी गाव हैदराबाद संस्थानाचे सीमेवरील गाव. म्हणून याच्या नियंत्रणासाठी सर्व कार्यालये आवश्यक होती. येथून सर्व नियंत्रण केले जाई व दहशत निर्माण करण्यासाठी तेवढाच अत्याचारही केला जाई. हे सर्व गुंजोटीने पाहिले आहे व भोगले आहे. या ठिकाणी एकमेव उर्दू माध्यमाची शाळा होती. मराठी माध्यमाला थाराच नव्हता. कुणी शाळा काढण्याचा प्रयत्न केलाच, तर ती तितक्याच तत्परतेने बंद पाडली जाई.


या परिसरात गुंजोटी गावापासून सुमारे ३० किमी अंतरावर लोहारा गावाशेजारी हिप्परगा या गावी स्वामी रामानंद तीर्थ यांनी शाळेची स्थापना केली. ही एक राष्ट्रीय शाळा; पण काही कारणाने ती बंद करावी लागली. हीच शाळा नंतर अंबाजोगाई येथे सुरू करण्यात आली. हिप्परगा शाळेची प्रेरणा घेऊन सन १९२७ साली गुंजोटी येथेही शाळेची स्थापना झाली, ‘श्रीकृष्ण विद्यालयया नावाने. या शाळेची प्रेरणा श्री हरिपंत राखेलकर व श्रीनिवासराव शाईवाले यांनी घेतली व अत्यंत कष्टाने ही शाळा चालूच राहिली. (आजही ही शाळा मोठ्या प्रगतीपथावर आहे. आज या संस्थेने वटवृक्षाचे रूप धारण केले आहे.)


गुंजोटी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मठ होता. त्यास ‘शिनाईचे मठ’ म्हणायचे. याच मठात ‘आर्य समाज’चेही काम चालू झाले. मठात प्रशस्त मैदान होते. मैदानात मल्लखांब, लाठी, तलवार याचा सराव घेतला जायचा. यामुळे तरुण मुले तत्परतेने हजर राहत. या मठातच एक पितळी मोठी घंटा होती. अचानक उद्भवलेल्या संकटप्रसंगी घंटा वाजवली जायची. घंटेच्या निनादाने गावातील सर्व जण त्या मठात एकत्रित होत असत. तेथे संकटसमयी सर्वांनी कसे राहावयाचे? कसा प्रतिकार करावयाचा? हे सांगितले जाई. अगदी भयग्रस्त समयीही सारे निर्भयपणे तोंड देण्यासाठी तयार राहत. यामुळे जुलुमी रझाकारालाही बेडरपणे तोंड देत असत. प्रत्येक महिलेला लाल तिखटाची पुडी ठेवण्याची सूचना असे, त्याप्रमाणे महिलाही कायम सज्ज होत्या. एखाद्याने काही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याच्या तोंडावर लाल तिखटाचा मारा करून महिला स्वत:चा बचाव करून घेत. या सर्व कामात गावातील अनेक जण सदैव तयार व जागरूक असत. यात सर्वश्री टोपणप्पा बबले, गंगाराम आययनले, वीरुपाक्षय्या स्वामी, कंठाप्पा देशमुख, शिवरुद्रय्या स्वामी, बसप्पा आगसे, दत्तू चौधरी, बळीराम चौधरी, दत्तोपंत चव्हाण, कृष्णाजी चव्हाण दंडेवाले, मुकुंदराव साळुके, हंबीरराव चव्हाण, रामराव पाटील, माणिक सिंहजी चौहान, तुळशीराम ठाकूर, काशीनाथ शिंदे, रामराव शिंदे, मारुतीराव सोमवंशी, माणिकबाबा, बाबाराव देशपांडे, सायबा कवठे, मारुती परीट, नरसोबा कडदोरे, दासमय्या हरके इ. अशा किती जणांची नावे सांगावीत? प्रत्येक घरातील कर्ता माणूस अगदी तयारच, तितकाच खंबीर, कणखर, इथे जातीभेदाचा गंधही नव्हता, श्रीमंत-गरीब असाही फरक नव्हता. प्रत्येकाला प्रत्येक जण आपलाच वाटायचा. त्याची आई ही माझी आई, बहीण वाटायची. याच मंडळींनी पुढे ‘हैदराबाद मुक्ती’साठी घोषित सत्याग्रहात सहभागी होऊन जेल भोगली, कोणीही डगमगला नाही. पुढे त्या सर्वांचा ‘सन्मानपत्र’ व ‘ताम्रपत्रा’ने शासनाने गौरवही केला. सत्याग्रहात सहभागी झालेल्यांना हैदराबाद, रायचूर, गुलबर्गा आदी तुरुंगात डांबण्यात आले. खाण्यासाठी सिमेंट मिश्रित भाकरी दिली जायची. खूप त्रास दिला जायचा. पण, यातले कोणीही डगमगले नाहीत. गुंजोटीचा असा हा देदीप्यमान इतिहास आहे. म्हणूनच, गुंजोटी ही गुंजोटी नाही, तर ही निझामाच्या जुलमी राजवटीत ‘गूंज उठी ठरलेली गुंजोटी’ आहे. इतिहासालाही याचा अभिमान वाटावा अशी ही गुंजोटी, या पुण्यभूमीस व सर्व देशभक्त स्वातंत्र्यवीर सैनिकांना शतश: नमन.

- पं. रमेश ठाकूर

@@AUTHORINFO_V1@@