रत्नागिरीत मानव-बिबट्या संघर्ष चिघळला; मेर्वीत बिबट्याचा दुचाकी स्वारांवर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020
Total Views |
leopard _1  H x


जनजागृतीपर उपाययोजना राबविणे आवश्यक 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरीच्या जांभूळआड गावातील बिबट्याच्या मानवी हल्लाची घटना ताजी असताना सोमवारी रात्री पुन्हा बिबट्याचा हल्ला झाला. मेर्वी बेहेरे स्टॉपजवळ मोटारसायकल स्वारांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या असून या घटनेने पुन्हा एकदा या परिसरातील मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न चिघळला आहे.
 
 
 
गेल्या आठवड्यात शुक्रवारी जांभूळआडीतील ग्रामस्थ जनार्दन चंदुरकर यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला होता. गुरे चरायला सोडून घरी परतताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. चंदुरकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ला करणारा बिबट्या हा दोन पिल्लांसोबत त्याठिकाणी होता. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्यांने दोन व्यक्तींवर हल्ला केल्याची घटना या परिसरात घडली. जांभूळीआडपासून काही मीटरच्या अंतरावर असणाऱ्या मेर्वी बेहेरे स्टाॅपजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाच मोटारसायकलवरुन तीन व्यक्ती जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन व्यक्तींना जखमा झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. या व्यक्तींना उपचाराअंती रुग्णालयातून घरी सोडल्याची माहिती रत्नागिरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड यांनी दिली. गेल्या वर्षीही मेर्वीतील याच रस्त्यावर दुचाकी स्वारांवर बिबट्याचे हल्ले झाले होते.
 
 
 
गेल्या काही महिन्यांपासून पावस ते पूर्णगड दरम्यानच्या पट्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढला आहे. गेल्या आठवड्यात चंदुरकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्या पकड मोहिम राबिण्यात आली होती. त्यासाठी मुंबईहून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या बिबट्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, आठवडाभर प्रय़त्न करुनही पथकाला बिबट्याचा माग काढता आला नाही. वन विभागाने पावस ते पूर्णगड दरम्यानच्या पट्यामध्ये खास करुन जांभूळआड, मेर्वी या गावात पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. मात्र, बिबट्याचा अजूनही मागमूस लागलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे बिबट्याला पकडून हा गंभीर प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी वन विभागाने काही उपाययोजना आणि जनजागृती मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. मेर्वीतील रस्त्यावर सातत्याने दुचाकी स्वारांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. त्यासाठी रस्त्यावर दिवे बसविणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशांना एकत्र करून टप्प्याटप्प्याने वन विभागाच्या पेट्रोलिंग वाहनासह सोडणे गरजेचे आहे. 


@@AUTHORINFO_V1@@