रश्मीज स्माईल ट्रस्ट आशेचा एक कवडसा

    दिनांक  15-Sep-2020 21:27:18
|
Rashmi _1  H x


वाचायला थोडं भावनिक वाटेल, पण एखाद्याच्या निखळ हसण्याचं स्वप्न त्या व्यक्तीच्या पश्चात सत्यात साकारावं अन त्या स्वप्नांतर्गत अनेक गरजूंना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचं बळ मिळावं, अशाच एका स्वप्नाची माहिती आहे या संपूर्ण लेखात..
 
 
 
चार्टर्ड अकाऊंटंट विकास पोतदार यांनी त्यांच्या जीवनसाथीदार रश्मी पोतदार यांच्या आठवणीत ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’ ही सेवाभावी संस्था तीन वर्षांपूर्वी सुरु केली आणि त्यांच्या साथीदाराचे ते निरागस हसू आजही जणू त्यांच्या पश्चात ते असंख्य गरजूंच्या चेहर्‍यावर रोज वेगवेगळ्या उपक्रमाअंतर्गत अनुभवत आहेत. तर नक्की ग कोणते उपक्रम अशी माणसांची स्वप्न पूर्ण करतात? असा प्रश्न पडला असेल.
 
आपण आता या संस्थेच्या उपक्रमाबद्दल बघूयात. आजवर या संस्थेचे पन्नासहून अधिक मेडिकल कॅम्प वेगवेगळ्या भागात खेड्यापाड्यात पार पाडले आहेत, फक्त हेल्थ चेकअपच नव्हे, तर तपास झाल्यावर आजारावर लागणारे औषधदेखील मोफत वाटण्याचे कार्य या संस्थेने आजवर चोख पार पाडले आहे. या संस्थेत डॉक्टर, वकील तसेच कॉर्पोरेट कंपनीत काम करणारे असे सर्व स्तरातील सदस्यांचा समावेश आहे. त्याचमुळे यांचे उपक्रमदेखील तितकेच नावीन्यपूर्ण आहेत, मुलांच्या शिक्षणावर या संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे.
 
याचे प्रात्यक्षिक म्हणजे पालघरमधील पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये यांनी प्रयोगशाळेची निर्मिती करून दिलेली आहे. त्याचबरोबर गांडूळवाड प्राथमिक शाळा ( शहापूर ) या शाळेची डागडुगी करण्यासोबत तेथे होणारे मुलांचे पिण्याच्या पाण्याचे हाल थांबावे या उद्देशाने बोअरवेल पंपाचे बांधकाम या संस्थेअंतर्गत केले गेले आहे. तसेच वलसाड, वाडा, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपदेखील करण्यात आलेले आहे.
 
अन्न, वस्त्र आणि निवारा जीवनावश्यक वस्तू आणि त्यातील ’वस्त्र’ या सबंधी संस्थने उचलेले कौतुकास्पद पाऊल म्हणजे ‘कपड्यांची बँक.’ अनेक गरीब-गरजूंना अजूनही अंग झाकता येईल इतके कपडेदेखील नशिबी मिळत नाही, दुसरीकडे बर्‍याच लग्नांमध्ये वापरले जाणारे महाग असे कपडे आपण एकदाच वापरतो आणि मग ते आपल्या कपाटात तसेच पडून राहतात, तर असेच कपडे योग्य गरजूंपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने कपड्यांची चक्क बँकच या संस्थेने बदलापूर येथे उभी केली आहे आणि अशाच बँक वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करण्याचा संस्थेचा माणसं आहे.
 
गेल्या वर्षी याच महिन्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती या संस्थेने पाचशे कुटुंबांना मदत पोहोच केली होती. ही झाली संस्थेची थोडक्यात ओळख, आता मी या लेखाच्या मूळ मुद्द्याकडे वळतो आणि ते म्हणजे कोरोना परिस्थितीतील संस्थेचे योगदान. कोरोना नावाच्या युद्धात सर्वात महत्त्वाचे योगदान आहे ते हॉस्पिटल आणि डॉक्टर्सचे, तर ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’ संस्थेच्या सदस्य पदावरील काही डॉक्टर हे ‘घाटकोपर मेडिकल असोसिएशन’ या कमिटीत कार्यरत आहे, जे स्वतः वैयक्तिक कोविड मोफत दूरध्वनी सल्लामसलत विभागातून लोकांना योग्य ते मार्गदर्शन देण्याचे कार्य करत आहेत.
 
 
तसेच संस्थेने आजवर हजारांहून अधिक एन ९५ मास्क हे ‘कोरोना वॉरिअर्स’सोबत शीव हॉस्पिटल कर्मचारी यांना वाटलेले आहेत. कोरोना आणि त्याच्या हाहाकारामुळे ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आले आणि परिणामी लोकांचे उत्पन्नाचे विकल्प कमी झाले. त्यासोबत अनाथाश्रम, वृद्धाश्रम इथे होणार्‍या माणसांच्या भेटी थांबल्या. त्यामुळे तिथे होणारी मदत कमी गोळा होऊ लागली, अशा संस्थांसारखेच जनसामान्यांचे दिवसेंदिवस खूप हाल होऊ लागले. हेच हाल काहीशा प्रमाणात कमी करण्यासाठी ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’ने आपल्या निःस्वार्थ मदतीतचे हात पुढे केले. संस्थेने आजवर एकंदर ५ हजार, ६०० किलो अन्न धान्य मदत स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी देऊ केले.
 
घाटकोपर, विक्रोळी भागातील हात मजुरी करणार्‍या कामगारांमध्ये, तसेच फूटपाथलगत झोपडपट्टी भागात एकंदर सहाशेहून जास्त किट्स वाटण्यात आले (एका किटमध्ये दोन किलो तांदूळ, दोन किलो गव्हाचे पीठ, एक किलो तूरडाळ आणि तेलाचे पॅकेट इत्यादी गोष्टींचा समावेश होता.) आणि या कार्यात घरोघरी पोहोचण्यासाठी संस्थेने त्या भागातील नगरसेवक तसेच स्थानिक समाजसेवक यांचीदेखील मदत घेतली आणि मदत थेट खर्‍याखुर्‍या गरजू घरांपर्यंत समाधानकारक पोहोचवली. आता वेळ आहे ते संस्थांना पोहोच केलेल्या मदतीबद्दल जाणून घेण्याची, या संस्थेने ‘लॉकडाऊन’ दरम्यान एकंदर चार आश्रमांना अन्नधान्य वाटप केले, संस्था आणि सुपूर्द करण्यात आलेल्या साधनांची यादी खालीलप्रमाणे :
 
१. नंदादीप अनाथाश्रम (कल्याण) - जेथे ७० अनाथ मुलांचे संगोपन केले जाते, तेथे ८४० किलो अन्नधान्य वाटप.
 
२. आई वृद्धाश्रम (कल्याण) जेथे ४४ वृद्ध रुजतात, तेथे ४४५ किलो अन्नधान्य सामग्री वाटप.
 
३.जाणीव सेवा भावी संस्था (कल्याण) येथे एकदंत ६५० किलो अन्नधान्य सामग्री वाटप.
 
४. सोलापूर हातमाग कामगार - ६०० किलो भात वाटप करण्यात आले.
 
५.घाटकोपर रेड लाईट वस्तीत ३०० किलो अन्नधान्य वाटप.
 
टीममध्ये कार्यरत असलेले डॉक्टर हे या संस्थेचे भक्कम आधारस्तंभ आहेत आणि यामुळेच मागील तीन वर्षांच्या कारकिर्दीत संस्थेने तीनशेहून अधिक स्वास्थ्य संबंधित उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले आहेत, त्यात मोफत डोळे तपासणी, नि:शुल्क मोतीबिंदू ऑपरेशन, मोफत चष्मेवाटप, मोफत दात तपासणी, मोफत रक्त तपासणी, ब्लड डोनेशन कॅम्प, आदिवासी भागात लहान मुलांना जीवनावश्यक आहारपुरवठा यासारख्या बर्‍याच सार्‍या उपक्रमांचा समावेश होतो.

- विजय माने, ९६६४२१२५६८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.