महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकांना परवानगी!

    दिनांक  15-Sep-2020 17:48:56
|
BMC_1  H x W: 0


शिवसेना-भाजप येणार आमनेसामने


मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेतील वैधानिक समित्यांच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून शिवसेनेसमोर प्रथमच भाजपचे आव्हान उभे ठाकले आहे.


केंद्रापासून महापालिकेपर्यंत शिवसेना-भाजपची युती होती. मात्र २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढवूनही केवळ मुखमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपबरोबरची युती संपुष्टात आणली. त्यामुळे एकेकाळी मित्र म्हणून उभे राहणारे हे दोन्ही पक्ष आता राजकिय शत्रू म्हणून महापालिका वैधानिक समित्यांच्या निवडणूक आखाड्यात एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.

राज्य सरकारने अखेर या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने त्यांचे भवितव्य धूसर आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप दीर्घ काळानंतर आमनेसामने येणार आहेत. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पालिकेत स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट या वैधानिक समित्यांसह आरोग्य, विधी, बाजार व उद्यान, स्थापत्य तसेच प्रभाग समित्यांच्या निवडणुका होतात. लॉकडाऊनमुळे यंदा या निवडणुका झालेल्या नाहीत. कोरोनाचे संकट कायम असल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने निवडणुका घेऊ नयेत असे आदेश दिले होते. नगरविकास विभागाने ३ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात सर्व समित्या तसेच पालिका सभागृहाच्या बैठका व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याची परवानगी दिली. मात्र निवडणुकांबाबत काहीही स्पष्ट केले नव्हते.


त्यानंतर नगरविकास विभागाने १० सप्टेंबर रोजी नव्याने परिपत्रक काढले असून यामध्ये व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी पालिकेत प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणुका होणार असल्याने अधिकारी आणि नगरसेवकही संभ्रमात आहेत. मतदानादरम्यान सहभागी सदस्यांच्या सह्या आवश्यक असल्याने त्याशिवाय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे यावर काय तोडगा काढायचा यासाठी प्रशासनाकडून नगरविकास विभागाकडे विचारणा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली.


आतापर्यंत शिवसेना-भाजपने एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेने पालिकेत एकहाती सत्ता राबवली. इतकेच नव्हे तर २०१७ च्या निवडणुकीत केवळ दोन जागांचा फरक असतानाही भाजपने कोणत्याही समितीवर दावा न करता केवळ पहारेकऱ्याची भूमिका बजावली. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपचे संबंध विकोपाला गेल्याने या निवडणुकांनिमित्ताने तब्बल पंधरा वर्षांनंतर शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


भाजपने शिवसेनेची अधिकृतपणे साथ सोडून विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी भाजपचेही उमेदवार असणार आहेत. मात्र पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी त्यांचे सध्याचे सहकारी त्यांना साथ देतीलच याबाबत खात्रीशीर सांगता येत नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाची भूमिका या निवडणुकांत महत्वाची ठरणार आहे. या पक्षाने शिवसेनेच्या विरोधात जायचे ठरवल्यास वैधानिक व प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत सेनेला फटका बसू शकतो.काँग्रेस संधी साधणार!

शिवसेना आणि काँग्रेस हे राजकारणात पारंपरिक शत्रू आहेत. पण महाराष्ट्र विधानसभेत तडजोड म्हणून काँग्रेस- राष्ट्रवादी-समाजवादीसह महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र काँग्रेस समाधानी असल्याचे दिसत नाही. त्यामुळे जुने उट्टे काढायचे झाल्यास आणि नव्या राजकारणाची समीकरणे जुळवायची झाल्यास काँग्रेस संधी साधू शकते, असेही बोलले जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.