आता मी रा.स्व.संघ आणि भाजपसोबतच : मदन शर्मा

15 Sep 2020 16:02:26

Madan sharma_1  



राज्यपालांच्या भेटीनंतर माजी नौदल अधिकाऱ्याची घोषणा!


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण आत्तापासून भाजप- रा.स्व.संघासोबत असल्याची घोषणा केली आहे.


मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, 'आत्तापासून मी भाजप आणि रा.स्व.संघासोबत आहे. मला जेव्हा मारहाण करण्यात आली तेव्हा शिवसेनेने माझ्यावर मी भाजप-रा.स्व.संघासोबत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता मी घोषणा करतो की आजपासून मी भाजप आणि रा.स्व.संघासोबत आहे', असे मदन शर्मा म्हणाले आहेत.


या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयीही निवृत्त नेव्ही ऑफिसर मदन शर्मा यांनी सांगितले आहे. राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी माफी मागायला हवी, असेही ते म्हणाले.


दरम्यान, माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी रात्री दोन वाजता शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. या सर्वांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले. याआधीही या सर्वांना अटक करण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना जामीन मंजूर झाला होता. आता समता नगर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम ४५२ अंतर्गत देखील गुन्हा नोंद केला आहे.


संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आरोपींकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांना पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला.



Powered By Sangraha 9.0