कोरोना लसीच्या उत्पादनात भारताची भूमीका महत्वाची : बिल गेट्स

15 Sep 2020 17:41:25
Bill Gates_1  H



हर्ड इम्युनिटीची वाट पाहिलात तर लाखो लोकांचा जीव जाईल !

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे (बीएमजीएफ) सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना महामारी आणि लसीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. हर्ड इम्युनिटीद्वारे कोरोना महामारी संपेल या भरवशावर बसून चालणार नाही, कोरोनाची लस यासाठी महत्वाची आहे. तसेच कोरोना लसीच्या निर्मितीत भारताची भूमीका महत्वाची असेल. कारण भारताकडे चांगल्या गुणवत्तेची लस निर्मिती करण्याची क्षमता आहे.
 
 
 
कोरोना लस आपल्याला संपूर्णपणे सुरक्षित ठेवू शकेल का या प्रश्नावर ते म्हणतात, 'आत्तापासून हा निष्कर्ष काढणे ही घाई ठरेल. आपल्याकडे आता अँटीबॉडीजचा कालावधी आणि टी सेल रिस्पॉन्स या गोष्टींबद्दलचा डेटा तयार नाही. कित्येक कोरोना लसीच्या निर्मितीच्या आणि चाचणीच्या प्रक्रीया सुरू आहे. सर्वांचा दृष्टीकोन वेगळा आहे ज्यामुळे प्रभावी लस मिळेल, अशी आशा आहे.'
 
 
 
कोरोना लसीच्या उत्पादनात भारताच्या योगदानाचा उल्लेख बिल गेट्स यांनी केला. कोरोना लस बाजारात आल्यानंतर भारतातील फार्मा कंपन्या आणि लस उत्पादनांची भूमिका महत्वाची असेल. कारण इथल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता आहे. ही लस चांगल्या गुणवत्तेची असेल शिवाय किंमतही परवडणारी असेल. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे.
 
 
ते म्हणाले, "सीरम इन्स्टीट्यूटमध्ये फाऊंडेशनतर्फे निधी देण्याची घोषणा मी केली आहे. लसीच्या निर्मितीसाठी हे योगदान दिले आहे. मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी २०२१ पर्यंत १० कोटी लसींची निर्मिती करण्याचे ध्येय आपण ठेवले आहे. तसेच लसीची किंमत तीन डॉलरपेक्षा जास्त नसेल, असा विश्वासही सिरम इन्स्टीट्युटने व्यक्त केला आहे. मी यापूर्वीही बऱ्याच भारतीय कंपन्यांसह काम केले आहे."
 
 
कोरोना लसीशिवाय ही महामारी संपू शकते का ? हर्ड इम्युनिटी लसीशिवाय शक्य आहे का ? या प्रश्नांचेही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणतात, "जेव्हा लोक हर्ड इम्युननिटीबद्दल चर्चा करतात, तेव्हा ते दोन गोष्टींवर लक्ष देत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे हर्ड इम्युनिटी प्राप्त होईपर्यंत लाखो लोकांचा जीव जाईल. 
दुसरी गोष्ट म्हणजे हर्ड इम्युनिटी ही कायम अस्थिर असेल, तिचे सातत्य किंवा अस्तित्व याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. लहान मुले ही रोगप्रतिकार शक्तीविना जन्म घेतात. त्यामुळे रोग सहज पसरू शकतो. दोन्ही गोष्टींमध्ये लस महत्वाचीच आहे. लसच जीवन वाचवू शकते. येणाऱ्या पीढीला कोरोनापासून वाचवण्यासाठी एकच पर्याय योग्य आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0