कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी आक्रमक

    दिनांक  15-Sep-2020 22:29:14
|
onion _1  H x W
 
 
 
लासलगाव (समीर पठाण) : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांच्या सह शेतकऱ्यांनी कांदा आवाराच्या प्रवेश द्वारासमोर अर्धातास रास्ता रोखून धरला. त्यानंतर बाजार आवारात कांद्याचे लिलाव सुरू होऊन सहा वाहनांमधील कांद्याचा लिलाव होऊन २२०० रु प्रति क्विंटल भाव पुकारताच सोमवार आणि मंगळवारच्या बाजार भावाच्या तुलनेत हजार रुपयांची तफावत दिसताच संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
 
दरम्यान लासलगाव बाजार समितीचा एकही संचालक या ठिकाणी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. या वेळी शिवा सुरासे म्हणाले की जेव्हा कांदा दर कोसळले होते तेव्हा केंद्र सरकारने त्याची कुठलीही दखल घेतली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून निर्यातीमुळे दर वधारले होते.नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांकडे काही प्रामाणात कांदा शिल्लक आहे त्याला समाधानकारक भाव मिळत होता.मात्र सोमवारी सायंकाळी केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असल्याचा आरोप या वेळी सुरासे यांनी केला.
 
 
नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी
 
कर्नाटक व मध्य प्रदेशातील कांदा पावसाने खराब झाल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे कांद्याचे भाव वधारले होते. मात्र, देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढतील. यामुळे संसदेतील पावसाळी अधिवेशनात रोष निर्माण होईल. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम कांदा भावावर होईल व येत्या काळात वधारलेले कांद्याचे भाव खाली येतील असे चित्र दिसत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.