बेस्ट कामगारांच्या खिशाला सुट्या नाण्यांचा भार!

    दिनांक  15-Sep-2020 20:18:27
|

BEST_1  H x W:
 


निविदा प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांना पगारात दिली सुटी नाणी!
 
 

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या पगारापोटी बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना १५०० रुपयांची सुट्टी नाणी दिल्याने त्यांना ते दीड-दोन किलोचे ओझे सांभाळत घरी न्यावे लागले. लॉकडाऊनमुळे निविदा प्रक्रिया रखडल्याने बेस्ट उपक्रमाकडे जमा होणाऱ्या सुट्ट्या नाण्यांचा निपटारा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केला जात आहे. जुलै महिन्यात वेतनात १००० रुपये नाण्यांच्या स्वरूपात दिले होते. तर ऑगस्टच्या वेतनात त्यात ५०० रुपयांच्या नाण्यांची वाढ करण्यात आली असून दीड हजार रुपये चिल्लर स्वरूपात देण्यात आले, तर १२,००० रुपये नोटांच्या स्वरूपात देण्यात आले. याहून जास्त वेतन असणाऱ्यांची उर्वरित रक्कम मात्र बँक खात्यात जमा झाली आहे. निविदा प्रक्रिया रखडल्याने गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली ही पद्धत ऑगस्टमध्येही कायम राहिली आहे.

 
 
बेस्टचे तिकीट दर ५, १०, १५, २० असे आहेत. त्यामुळे बेस्टकडे ५-१० ची पुष्कळ नाणी जमा होतात. ती संपवायची कशी असा प्रश्न बेस्ट प्रशासनापुढे असतो. नाणी पडून राहिली तर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे बेस्ट प्रशासन तोट्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमा झालेली नाणी बेस्ट कामगारांच्या माथी मारण्याचा हा प्रकार असल्याचे एका बेस्टच्या उच्च स्तरीय कर्मचाऱ्याने सांगितले. सुट्ट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया रखडल्याने उपक्रमावर ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.

बेस्ट उपक्रमाने यापूर्वी भाडेकपात करत ५, १० रुपयाच्या टप्प्यात तिकीट दर जाहीर केले. तेव्हापासून सुट्ट्या पैशांची रास उपक्रमाकडे जमा होत आहे. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ५, १० रुपयांची नाणी प्रचंड स्वरुपात जमा होत आहे. बँकांकडून ही नाणी स्वीकारली जात नसल्याने सुट्ट्या पैशांची रक्कम वाढत गेली आहे. त्यामुळे निविदा मागवून त्याची पूर्तता केली जाते. कोरोना काळात ही प्रक्रिया लांबल्याने बँकांकडून सुट्टे पैसे स्वीकारण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कामगारांना त्यांच्या वेतनापोटी काही रक्कम नाण्यांच्या स्वरूपात बेस्टने सुट्टे पैशांचा निपटारा करण्याची शक्कल लढविली आहे. ही नाण्यांच्या स्वरूपातील रक्कम मोजताना आणि घरी घेऊन जाताना कामगारांना मोठी कसरत करावी लागली. आता ही नाणी खर्च कशी करायची असा प्रश्नही बेस्ट कामगारांपुढे उभा राहिला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.