'शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात; मराठा आरक्षणावर का नाही?'

15 Sep 2020 18:02:02

sharad pawar_1  


मुंबई :
'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सगळ्या विषयांवर बोलतात, पण मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ते अद्याप एक चकार शब्दही बोलले नाहीत. असं का?,' असा थेट सवाल माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे. तसेच राज्यात मुघल सरकार आलंय असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारलाही टोला लगावला.


दरम्यान, कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पवारांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत राणेंनी ट्वीट केलं आहे. 'पवार साहेब सगळ्या विषयांवर बोलतात पण अजून पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही. मुस्लिम समाजाच्या एका सणासाठी पवार साहेबांनी मुंबईत येऊन बैठक घेतली होती, तशी बैठक मराठा समाजासाठी का घेतली नाही,' असा प्रश्नही नीलेश राणे यांनी केला आहे. तसेच नीलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिगटाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला आहे.







'न्यायालयाचा निर्णय येऊन चार दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. अशोक चव्हाण यांच्या कामाचा आम्हाला अनुभव आहे. ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाहीत व पूर्णत्वास नेऊ शकत नाहीत. त्यावर मुख्यमंत्र्याचं काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल,' असं नीलेश राणे यांनी म्हटले आहे. यावेळी निलेश राणे यांनी मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय करण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. तसेच यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्याची संधीही त्यांनी साधली. ते म्हणतात, आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून "छत्रपती शिवाजी महाराज" यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तंस काही होईल वाटत नाही, म्हणत त्यांनी ठाकरे सरकरला टोला लगावला.

Powered By Sangraha 9.0