सलमान खान हाजीर हो: काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयाचे आदेश

14 Sep 2020 19:02:17
Salman Khan_1  
 

 
जोधपुर : बॉलीवुड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरण आणि शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी सोमवारी जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी जोधपूरमध्ये या प्रकरणी सुनावणी झाली. पुढील सुनावणी २८ सप्टेबर रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत प्रमुख आरोपी सलमानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
जोधपूरच्या जिल्हा व सत्र न्यायलयात न्यायमूर्ती राघवेंद्र कच्छवाह यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. सलमानच्या बाजूने अधिवक्ता हस्तीमल सारस्वत उपस्थित होते. अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी सलमानची न्यायालयाने मुक्तता केली आहे. मात्र, या प्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.
 
  
काळवीट हरीण शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूरच्या ग्रामीण न्यायालयाने पाच वर्षांची कैद सुनावली आहे. त्यानंतर सलमानला तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात वनविभाग अधिकाऱ्यांनी खोटी साक्ष दिल्या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. आता २८ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणी आज न्यायालयाने सलमानला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
सलमान खान न्यायालयात उपस्थित राहणार का या प्रकरणी हाजरी माफी हा पर्याय खुला आहे. यापूर्वी बऱ्याचदा सलमानने या प्रकरणी याचा वापर केला आहे. तसेच कित्येकदा न्यायालयाच्या आदेशानंतर उपस्थितही राहिले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सलमान न्यायालयात हजर होणार का याबद्दल स्पष्टता आलेली नाही. २००८ मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, हरणाची शिकार करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर हे प्रकरण जोधपूर सीजेएम न्यायालयात हे प्रकरण सुरू झाले होते.

Powered By Sangraha 9.0