हायराईज इमारतीतील कोरोनाचा फैलाव चिंताजनक!

14 Sep 2020 16:15:21
Highrise bldg_1 &nbs

सील इमारतींच्या संख्येत वाढ!

मुंबई : मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनामुळे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असतानाच, कोरोनाचा शिरकाव आता हायराईज इमारती व सोसायट्यांमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढत आहे. दरम्यान, झोपडपट्टी व चाळीतील कंटेन्मेंट झोनची संख्याही कमी होऊन ती ५५७ वर आली आहे.


वरळी, धारावी, कांदिवली, बोरिवली, दहिसर, भांडुप, मुलुंड , गोवंडी, चेंबूर आदी झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने चाचणी, तपासणी, संशयित रुग्णांचा शोध, वेळीच कोरोना कोविड सेंटरमध्ये दाखल करणे यामुळे झोपडपट्टी व चाळीत पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. तर दुसरीकडे उत्तुंग इमारती, टॉवर व सोसायट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे.


मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत सलग रुग्ण आढळल्याने इमारत सील करण्यात आली, मालाड येथील टीपको हाईट्स या इमारतीत १० दिवसांत २५ रुग्ण आढळल्याने इमारत सील करण्यात आली. हायराईज इमारतीत कोरोना शिरकाव करत असल्याने तीन रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.


दरम्यान, रुग्ण वाढत असले तरी स्थिती नियंत्रणात आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास सक्षम असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त करत मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0