खासगी डॉक्टरांच्या समस्या, राज ठाकरेंचे राज्य सरकारला खरमरीत पत्र!

14 Sep 2020 15:07:28
Uddhav Raj_1  H


सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसे चालेल?


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी या पत्रातून खासगी डॉक्टरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. ‘खासगी सेवेतील डॉक्टरांना विमाकवच नाकारणे असंवेदनशील आहे. खासगी सेवेतील डाँक्टरांना मृत्यूनंतरही कुटुंबाला ५० लाखाचा विमा मिळायला हवा’, असे राज ठाकरे म्हणाले.


मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटायला आले होते. त्यांनी त्यांचे या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितलले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली, त्याने माझे मन विषण्ण झाले. मुळात जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे, तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे?, याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.


सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? चूक आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. दरम्यान, माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की,तुम्ही या विषयांत तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खासगी सेवेतील असो वा सरकारी सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असोत यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करा, असे राज ठाकरे म्हणाले.




Powered By Sangraha 9.0