कोरोनाचा कहर (भाग-२५) - ‘कोरोना’ व्हायरस आणि मानसिकता

14 Sep 2020 20:41:05
Corona 1_1  H x
 
 
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले व त्यामुळे लोकांमध्ये जो भयगंड निर्माण झाला त्याचे मुख्य कारण म्हणजे, अचानक येणार्‍या मृत्यूचे भय. आपल्या आजूबाजूला जिकडे तिकडे हा कोरोनाच आहे की काय, अशी भीती लोकांना वाटत राहते. सर्वांगाला सॅनिटायझर चोपडून फिरणारे लोकही मी पाहिले आहेत. या भयापोटी लोक अनेक प्रकारची औषधे, जीवनसत्वे स्वत:हून घ्यायला लागले.
 
 
यातही औषध कंपन्यांची कशी चलती होते ते पाहा. जीवनसत्व ‘क’ म्हणजे ‘व्हिटॅमिन सी’ व झिंकच्या गोळ्या चणे-फुटाण्यासारख्या खाल्ल्या जातात. परंतु, लोकांना हे लक्षात येत नाही की, आपल्या रोजच्या आहारात जर लिंबू, टोमॅटो, फळे, हिरव्या पालेभाज्या, बिया भाज्या, वाटाणे इत्यादींचा समावेश केला, तर ‘व्हिटॅमिन सी’ व झिंक आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते. परंतु, तसे न करता सर्वांना या गोळ्या खाण्यास सांगितले जाते व त्यामुळे येनकेन प्रकारेण औषध कंपन्यांचा नफा होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर काहीही करुन लोकांना सतत औषधे घ्यायला भाग पाडायचे हा यामागील हेतू असतो. या भयगंडामुळेच लोक सतत आशेचा किरण मिळावा, याची भाबडी अपेक्षा ठेवत आहेत आणि लस येईल, अशी वाट पाहतात.
 
 
 
मार्चपासून फक्त लस येते आहे अशा फक्त बातम्याच येत आहेत. खरोखर लस येणार की नाही व कोरोना जाणार की नाही, हा सर्वसामान्यांना मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर खरोखरच ही लस गुणकारी असेल की नुसता प्रयोग असेल हेसुद्धा ठाऊक नाही, पण काहीही असो, लोकांच्या भीतीचा फायदा उचलून यातही काही संशयास्पद होईल यात शंकाच नाही. होमियोपॅथीमध्ये डॉ. हॅनेमान यांनी मार्गदर्शन केले आहे. ज्यामध्ये लसीकरणाचे दुष्परिणाम सांगितले आहेत. होमियोपॅथीला हे अनाठाई लसीकरण मान्य नाही. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती ही लसीकरणाने कशी कमकुवत होते, याबद्दल बर्‍याच तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली मते मांडली आहेत.
 
 
 
परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष करुन हे सर्व चालूच आहे. लसीकरणामुळे आपली चैतन्यशक्ती व प्रतिकारशक्ती कशी कमकुवत होते, हे डॉ. हॅनेमान यांनी जगाला समजावून सांगितले आहे. परंतु, ते पद्धतशीरपणे दुर्लक्षित केले गेले जाते. लसीकरण केल्याने नक्की किती फायदा होतो, यावर आजही मोठे प्रश्नचिन्ह आहे. उदाहरणच घ्यायचे तर असे पाहा - भारतात जन्मतः प्रत्येक बाळाला ‘बीसीजी’ची लस दिली जाते. बीसीजीची लस बाळाला क्षयरोग होऊ नये म्हणून दिली जाते. तरीपण आपल्याला असे लक्षात येईल की, भारतात सर्वात जास्त दिसून येणारा रोग म्हणजे क्षयरोग (Tuberculosis) हा आहे.
 
 
 
जर प्रत्येकाला क्षयरोगाची लस जन्मतःच दिलेली असते, मग इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना क्षयरोग का होतो? मग या दिल्या गेलेल्या लसीचे काय? असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, हे पडलेले प्रश्न अतिशय चलाखीने दाबून टाकले जातात व लोकांच्या मानसिकतेमधील भीतीचा फायदा घेऊन त्यांच्या मनात एक ठरावीक औषधशास्त्रच बिंबवण्यात येते व बाकीच्या औषधशास्त्रांबद्दल द्वेष पसरवला जातो, याचे कारण म्हणजे पैसा. लोकांना एकाच औषधशास्त्राच्या लावलेल्या सवयीमुळे जगभरात अब्जावधी रुपयांचा नफा कमविला जातो व हा सर्व धंदा चालत असतो तो लोकांना आरोग्यविषयी ‘फिअर फॅक्टर’ तयार करुनच! पुढील भागात आपण कोरोनाच्या या साथीच्या मानसिक व सामाजिक दुष्परिणामांचा अभ्यास करुया.
 
 
 
- डॉ. मंदार पाटकर  
 
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
Powered By Sangraha 9.0