युद्ध आमुचे सुरु...

14 Sep 2020 19:40:50
Corona_1  H x W




कोरोनाच्या दीर्घकालीन अस्तित्वाबरोबर आपल्याला आपले अस्तित्व टिकवायचे आहे आणि जोपासायचे आहे, हे आपल्या लक्षात आले आणि काही काळासाठी का होईना, आपण आपले ‘लॉकडाऊन’मधले दैनंदिन आयुष्य प्रतिरोध करत का होईना, मान्य केले. कोरोनाच्या जीवघेण्या संकटाबरोबर आपल्याला काही अधिक काळ आयुष्य घालवायचे आहे.



आजकाल आपण लोकांना अतिशय भावूक झालेले, चिडलेले वा नर्व्हस, ब्रेकडाऊन झालेले पाहतो आहोत. जो तो आज उठसूठ दुसर्‍या कोणावर तरी बोंबलताना दिसतो. कारण, लोकांच्या मनात विचारांचा गदारोळ माजला आहे. त्यात सुसूत्रता दिसत नाही. लॉजिक नाही. यात लोकं जेव्हा चिडून चिडून आक्रमक होतात, तेव्हा या समस्या खर्‍या अर्थाने माणसाच्या विवेकी मर्यादेच्या बाहेर जातात.


जेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी अनोळखी आणि नवीन दिसते किंवा ते भयप्रद असले, तरीसुद्धा आपला मेंदू पुढचा अंदाज काय बरं असू शकेल, या विचाराने चमकून उठतो. आपल्यासमोर उभे ठाकलेले संकट पाहता, आपल्या शरीराची रासायनिक प्रक्रिया ही आवेश आल्यासारखी किंवा उद्दिपीत झाल्यासारखीच वाटते. म्हणून तर, कित्येक लोकांना ‘हॉरर फिल्म’ बघायला आवडतात. कारण, या चित्रपटात जितके भय जास्त तितके स्फुरणही जास्त मिळते. चित्रपटाचे एक बरे असते, तो या थरारातून आणि उन्मादित प्रसंगातून संपतो आणि आपण सगळे वस्तुस्थितीच्या जगात परत येऊन पोहोचतो. चित्रपटातील भय, सीरिअल किलर वा खलनायक सगळेच पडद्यावरचे असतात. नंतर ते आपल्या खिजगणतीतसुद्धा राहत नाहीत. तथापि, कोरोना मात्र आजही अदृश्य आहे, पण आपल्या अंगणातच बसकण मारुन आहे. आजही अनेक लोक त्याच्या विळख्यात सापडत आहेत. अनेकांचे जीवही जात आहेत. आपल्याला अजून त्याला रोखायचे कसे, याचा उपाय सापडलेला नाही.


पण, ‘लॉकडाऊन’मुळे लोकांना मात्र घरात स्वत:लाच ‘लॉक’ करुन बसायला लागले. मास्क लावून एकमेकांपासून ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ‘दो गज दूरी’ पाळायला लागली. सुरुवातीला सगळ्यांना आपला जीव वाचवायचा आणि जगात स्थिरावायचे इतकेच महत्त्वाचे वाटले. शिवाय आता हे नवीन महामारीचे हे काय नवे ‘फॅड’ म्हणून सगळ्यांच्या मनात प्रचंड कुतूहलही होते, पण हे कुतूहल संपता संपता भय इथले संपेना, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीला वाटलं की, जाईल ही पीडा दोन-तीन महिन्यांत, पण दोन-तीन महिन्यांनी कळायला लागले की, हा आगंतुक शत्रू जायचे नाव काही घेत नाही. उलट याचा विळखा आता वाढायला लागलेला आहे. आपल्याच प्रियजनांच्या हद्दीत कोरोना शिरायला लागला आहे. आपल्याला माहीत असलेलेसुद्धा आता हळूहळू कोरोनाच्या दुनियेत नाहिसे होत चालले आहेत. आता मात्र मन खूपच भेदरायला लागले आहे. हे जग असेच अनिश्चित आणि लहरी वागणार आहे का? पुढे काय? हा प्रश्न आणखी किती काळ आपल्या मनात थैमान घालणार आणि भयभीत करणार आहे?


आपल्या शरीराची अशा रेंगाळत राहणार्‍या या तणावाशी सामना करायची प्रक्रिया कशी आहे, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या पातळीच्या प्रक्रियेत आपण एका तणावाला सामोरे जायची घंटा वाजते. आपण रमतगमत बागेतून चालत असताना आपल्याला एखादा सिंह समोर दिसला, तर आपण काय करतो. भीतीने थरथरतो, आपला घसा कोरडा पडतो, छातीत जोरात धडधडायला लागते, धाप लागते आणि पूर्ण शरीराला घाम फुटतो. पण, आपलं मन मात्र तल्लख होते. आपली प्रत्येक कृती स्वतःला वाचविण्यासाठी असते. आपल्याला काही कळायच्या आत भीतीच्या त्या प्रेरणेने चपळ प्रतिक्रिया आपल्याकडून होत असतात. या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या शरीरात ‘अ‍ॅड्रीनॅलिन’चा प्रवाह सुरु झाल्याने होतात. ही ‘अ‍ॅड्रीनॅलिन रश’ची प्रक्रिया अत्यंत आवश्यक असते. आपल्या त्वरित सुरक्षिततेसाठी सिंह अचानक दिसला आणि दिसला तसाच नाहिसा झाला आणि माणसाचे शरीर पण शांत झाले, तसेच हार्मोन्स शांत होऊन जातात.


पण कोरोना जसा अचानक विस्मयजनक पद्धतीने आला आणि निघून गेला, असे काही दुर्दैवाने झाले नाही. कोरोनाचे आव्हान वाटले तसे अल्पकालीन न राहता, दीर्घकालीन झाले आणि त्यावर अनिश्चिततेची टांगती तलवारही डोळ्यावर राहिली. आता काय झालं की, आपण घाबरुन जी प्रतिक्रिया देत होतो ती थांबली. भीती थांबली. आता आपण काही काही महत्त्वाच्या गोष्टी करायला सुरुवात केल्या. ‘झूम मीटिंग’ आल्या. घरुन कार्यालयीनकाम करायची सवय करुन घेतली. कोरोनाच्या दीर्घकालीन अस्तित्वाबरोबर आपल्याला आपले अस्तित्व टिकवायचे आहे आणि जोपासायचे आहे, हे आपल्या लक्षात आले आणि काही काळासाठी का होईना, आपण आपले ‘लॉकडाऊन’मधले दैनंदिन आयुष्य प्रतिरोध करत का होईना, मान्य केले. कोरोनाच्या जीवघेण्या संकटाबरोबर आपल्याला काही अधिक काळ आयुष्य घालवायचे आहे, हे जाणून त्याला प्रतिकार करत आयुष्य बदलले पाहिजे.
(क्रमशः)



- डॉ. शुभांगी पारकर



Powered By Sangraha 9.0