'आम्ही कोणालाही महाराष्ट्राबाहेर जा म्हणालो नाही'; संजय राऊतांचा 'यु टर्न

13 Sep 2020 21:16:11

kangana ranout_1 &nb



मुंबई :
अभिनेत्री कंगना रानौतकडून दररोज शिवसेनेवर जोरदार हल्ले सुरू आहे. मात्र शिवसेनेने सुरु केलेल्या या वादाबाबत शिवसेनेने आपला पवित्रा बदलला आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला आहे ,अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.


माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले,'मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही'. मुंबईत येतेय, रोखून दाखवा असं आव्हान देऊन मुंबईत दाखल झालेल्या कंगनावर शिवसेना संजय राऊत यांनी नाव न घेता निशाणा साधला. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, असे म्हणत राऊत यांनी कंगनावर अधिक बोलणं टाळलं. 'आम्ही त्यावर बोलणं बंद केलं आहे ज्याला जे करायचं आहे, त्याने ते करावं. आम्ही बोलणार नाही. पण आम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू. जे कोणी मुंबई- महाराष्ट्रात येतात त्यातील कोणालाही आम्ही बाहेर जायला सांगितले नाही. फक्त मुंबई-महाराष्ट्राला आपले म्हणा. ही आमची भूमिका आहे. ज्या पोलिसांना माफिया म्हणता त्यांचे संरक्षण घेता' असे म्हणत संजय राऊत यांनी कंगना विषयावर बोलणे टाळले.


माजी लष्करी अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. यावर बोलताना राऊत म्हणतात, 'त्यामध्ये सरकारचा काय दोष, शिवसेनेने जर हल्ला कोला आहे, तर तो आम्हाला विचारुन तर नाही केला, इतका मोठा महाराष्ट्र आहे , हे कोणाहीसोबत होऊ शकतं, आमच्यासोबतही होऊ शकतं याचा संबंध सरकारशी जोडणं, सरकारशी जोडतो.लष्कराचा आदर आम्ही करत राहू. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही नेहमी लष्कराचा आदर करु, त्याचा अर्थ हा नाही की कोणीही यावं आणि चिखलफेक करावी, आदर हा दोन्ही बाजूने असतो. तुम्ही काहीही कराल आणि लोक शांत राहातील?' असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा लष्करी अधिकाऱ्यावर झालेल्या मारहाणीचे समर्थन केले.
Powered By Sangraha 9.0