मास्क न लावणाऱ्यांवर पालिकेचा वॉच!

13 Sep 2020 17:09:45

mask_1  H x W:


५०० अधिकाऱ्यांची मुंबईत गस्त

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. मायर काहीजण तोंडाला मास्क न लावताच बाहेर पडत असल्याने त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी पाचशे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तोंडावर मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.


कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे. तरीही अनेक जण घराबाहेर पडताना तोंडावर मास्क न लावताच घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेचे फिल्ड ऑफिसर आता मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील, असे पालिकेच्या घनकचरा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, क्लीन अप मार्शलचे कंत्राट संपुष्टात आले आहे. नव्याने क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीनंतर एजन्सीची नेमणूक करण्यात येईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.


मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि तेव्हापासून कोरोनाला हरवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मुंबईकरांचाही योग्य तो प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि पालिकेने मास्क न लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. घराबाहेर पडताना तोंडावर मास्क न लावणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. पालिकेने कारवाईचा बडगा उगारला तो कोरोनाला हरवण्यासाठी, परंतु एक हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याने पालिकेवर टीकेची झोड उठली. अखेर दंडाची रक्कम कमी करत २०० रुपये करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


मागील पाच महिन्यांत 'मास्क' न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या २ हजार ७९८ नागरिकांकडून एक हजार रुपयांप्रमाणे २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
Powered By Sangraha 9.0