कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसाठी महापालिकेची उपाययोजना सुरू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2020
Total Views |
Covid centre_1  


'आयसीयू'मध्ये २५० खाटा वाढवणार; नर्सिंग होम सुरू करण्याचा विचार


मुंबई : मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आटोक्यात आलेल्या कोरोनाने मागील काही दिवसांत पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने त्यावर उपाययोजनांसाठी पालिकेने पावले उचलली आहेत. खाटा कमी पडू नये यासाठी नर्सिंग होमचा पुन्हा वापर करता येईल का, याचा विचार केला जात आहे. वाढत्या रुग्णांमुळे अतिदक्षता विभागात खाटा कमी पडू नयेत यासाठी आणखी २५० खाटा वाढवण्यात येणार आहेत. तसेच होमक्वारंटाईन असलेल्या ५० वर्षांवरील रुग्णांना वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


कोरोना नियंत्रणात आल्यामुळे अनलॉकमध्ये काही प्रमाणात वाढ आणण्यात आली. याच दरम्यान, गणेशोत्सवात नागरिकांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यामुळे क्लोज कॉन्टॅक्टमुळे मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दररोज हजार ते १२०० पर्यंत आलेली रुग्णसंख्या आता दोन हजारांच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने खबरदारी घेत उपाययोजना वाढवण्यास सुरुवात केली आहे.


सध्या पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात मिळून १५,७९६ खाटा असून त्यात ६१५७ रिक्त आहेत. येत्या काही दिवसात रुग्णसंख्या आणखी वाढल्यास खाटांची कमतरता भासू नये यासाठी मुंबईतील ७३ नर्सिंग होममधील खाटांचा पुन्हा वापर करता येईल का, याचा विचार केला जात आहे. प्रकृती चिंताजनक झालेल्या रुग्णांना आवश्यक उपचार नर्सिंग होममध्ये मिळत नाही. तसेच खासगी रुग्णालयातील मृत्यूदर दहा टक्क्यांपर्यंत गेल्यामुळे नर्सिंग होमचा वापर बंद करण्यात आला होता. येत्या काळात रुग्णसंख्या वाढीस लागल्यास प्राथमिक उपचारासाठी नर्सिंग होमचा वापर करता येऊ शकतो, असे पालिकेतील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, 'नर्सिंग होम वापरण्याबाबतता अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र तेथील खाटांची संख्या व उपचार पद्धतीचे विश्लेषण प्रशासनाने सुरू केले आहे', अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.


लक्षणे नसलेले तसेच ५० वर्षांपेक्षा अधिक वय आणि दीर्घकालीन स्वरुपाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी होमक्वारंटाईनसाठी आग्रह धरू नये. अशा रुग्णांना कोरोना काळजी केंद्र-२, समर्पित कोरोना आरोग्य केंद्र, शासकीय किंवा खासगी समर्पित कोरोना रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या गरजेनुसार दाखल करण्यात येईल. याव्यतिरिक्त लक्षणे नसलेल्या बाधितांना दीर्घकालीन आजार नसल्यास होम क्वारंटाईनचा पर्याय देण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवणार असून आवश्यकता भासल्यास त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही काकाणी यांनी सांगितले.




@@AUTHORINFO_V1@@