मराठा आरक्षण : कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक!

13 Sep 2020 15:29:42
kolhapur_1  H x


आंदोलन करत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न!


कोल्हापूर : मराठा समाजाला न्यायालयाच्या निकषावर टिकणारे आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरात विविध मराठा समाजाच्या संघटना रविवारी रस्त्यावर उतरल्या. क्षत्रिय मराठा समाजासह विविध संघटनांनी १२ वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल परिसरात महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.


तर मराठा मावळा ग्रुपने राज्य सरकार विरोधात मिरजकर तिकटी येथे निदर्शने केली. तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मसुदा कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळी निश्चित करण्यात आला होता. तत्पूर्वी आरक्षण मागणीचा मोर्चा आणि दसरा चौकात महिनाभर ठिय्या आंदोलन केले होते. मराठा समाजाला भाजप सरकारने नोकरी आणि शिक्षणात आरक्षण जाहीर केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण प्रक्रियेला स्थगिती दिली.


राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्याची भावना समाजाची आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने जोर लागली आहेत. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे…’ अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. महामार्ग रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. दरम्यान, मावळा ग्रुपच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलन करत आरक्षणाची मागणी लावून धरली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.








Powered By Sangraha 9.0