'मुंबई असो की महाराष्ट्र, एकच ब्रँड; छत्रपती शिवाजी महाराज'

    दिनांक  13-Sep-2020 16:28:07
|

nitesh rane_1  


मुंबई :
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून मांडले. यावरून राणे बंधुंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबई असो की, महाराष्ट्र एकच ब्रँड, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. तर माजी खासदार निलेश राणेंनीही शिवसेनेवर टीका केली आहे.


आमदार नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड..छत्रपती शिवाजी महाराज असे एका वाक्यात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. तर निलेश राणेंनी ट्विट केले होते, त्यात म्हटलं होतं की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय?? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे.


काय म्हणाले होते संजय राऊत?


ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईसा पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांघकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.