अंतिम वर्ष पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा

12 Sep 2020 17:38:01
Railway_1  H x


ओळखपत्र, हॉल तिकिटावर रेल्वे प्रवासाची मुभा


मुंबई : पदवीच्या अंतिम वर्ष परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि हॉल तिकिटावर रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अनलॉक ४चा टप्पा सुरु होताच मुंबई हळूहळू पूर्ववदावर येत आहे. त्यातच अंतिम वर्षाच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा रेल्वे बोर्डाने दिली. परंतु प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, तोंडावर मास्क लावणे या नियमांचे पालन करत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना ओळखपत्र व हॉल तिकीट दाखवणे बंधनकारक असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. २३ मार्चपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दरवाजे आजही बंद आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी लोकल सेवा उपलब्ध आहेत. परंतु अंतिम वर्षाच्या स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाता यावे यासाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


दरम्यान, सध्या लोकल सेवा ही अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी उपलब्ध असून सर्वसामान्य प्रवाशांनी स्थानकांवर गर्दी करु नये,असे आवाहन मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाने केले आहे.





Powered By Sangraha 9.0