डीएनएचा ‘पीळ’ आणि आर्यवंशाचा ‘तिढा’

    दिनांक  12-Sep-2020 20:57:57
|

article on DNA and AryaVa

मागच्या लेखापासून आपण ‘आर्यवंश’ या संकल्पनेत कितपत तथ्य आहे, याचा विचार सुरू केला आहे. ‘वंश’ म्हटले, की शरीररचनेचे शास्त्र या बाबतीत काही निश्चित आडाखे देते. हे सगळ्या जगाला मान्य आहे. त्यापैकी एक प्रकार म्हणजे मानवी हाडांची आणि डोक्याच्या कवटीची मोजमापे. या दृष्टीने पाहता सिंधूच्या खोऱ्यातल्या उत्खननात सापडलेले सांगाडे त्या परिसरात आज राहणाऱ्या लोकांचीच वैशिष्ट्ये दाखवतात, हे दिसते. याचा अर्थ आर्यांनी ज्या मूलनिवासींना मारले आणि दक्षिणेत हाकलून दिले, असे काही युरोपीय संशोधक सांगतात, त्याच मूलनिवासींच्या वंशाचे लोक आजही तिथेच राहतात! तर मग हाकलून कुणाला दिले गेले? आणि मग स्थलांतर तरी कुणी केले? ‘आर्य स्थलांतराचा सिद्धांत’ अशा पद्धतीने सपशेल उघडा पडतो. वंशाचे अजून एक शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे शरीरातली जनुके, अर्थात Genomes. आजच्या लेखात याची थोडक्यात ओळख करून घेऊया.


जीवपेशींची रचना

सर्व झाडे-वनस्पती, प्राणी-पक्षी यांची शरीरे असंख्य पेशींची बनलेली असतात. प्रत्येक पेशीत एक ‘केंद्रक’ (Nucleus) असते. त्या केंद्रकात काही ‘गुणसूत्रे’ (Chromosomes) असतात. प्रत्येक गुणसूत्र काही ‘जनुकांचे’ (Genome) बनलेले असते. रासायनिक दृष्ट्या ही गुणसूत्रे एका विशिष्ट प्रकारच्या रेणूची (Molecule) बनलेली असतात. या रेणूचे शास्त्रीय नाव आहे De-oxyribo Nucleic Acid अर्थात DNA. या DNA च्या रेणूची रचना सुद्धा अतिशय क्लिष्ट असते. त्यात प्रामुख्याने चार घटक पुन्हा पुन्हा येताना दिसतात. त्यांची नावे आहेत Adenine (A), Guanine (G), Cytosine (C) आणि Thymine (T). या घटकांना ‘न्युक्लिओटाईड’ (Nucleotide) असेही म्हणतात. DNA चा रेणू म्हणजे या घटकांची एक लांबलचक साखळीच असते. त्यांचा एक विशिष्ट क्रम प्रत्येक पेशीत सापडतो. एका पेशीचे विभाजन होऊन दुसरी नवीन पेशी तयार होताना तिथेही याच क्रमाने हे चार घटक साखळी बनवतात. पीळ पडलेल्या दोरीच्या शिडीसारखी ही रचना दिसते. हा क्रम पिढ्यानपिढ्या टिकून राहतो. मानवी वंशांची ओळख त्यामुळेच तयार होते. अर्थात एखाद्या वंशाच्या सर्व लोकांमध्ये हा न्युक्लिओटाईडचा क्रम तसाच असलेला दिसतो. माणसाच्या आनुवंशिक गोष्टींचे मूळ या DNA च्या क्रमात आहे. अशा रीतीने ही गोष्ट वंशाशी निगडित असल्याने काही विद्वानांनी त्यांच्या जुन्या आवडत्या ‘आर्यवंश’ संकल्पनेशी सुद्धा ती जोडण्याचा प्रयत्न केला.

अनेक पिढ्यांनंतर हजारो वर्षांनी DNA च्या या संपूर्ण क्रमात कधीतरी एखादा बदल घडू शकतो. त्याला ‘उत्परिवर्तन’ (Mutation) असे म्हणतात. अशा बदलून बनलेल्या नव्या क्रमाला अॅलिल (Allele) असे नाव आहे. या बदलामुळे त्या व्यक्तीत एखादे शारीरिक वैशिष्ट्य जरासे बदलते. त्याच्यापासून पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये पुन्हा ते तसेच राहू शकते. एखाद्या पिढीत त्याच्या जन्मदात्याकडून मिळालेल्या क्रमात जे बदल घडून येतात, त्यांना हॅपलोटाईप (Haplotype) असे म्हणतात. एकाच पूर्वजाकडून आलेल्या अशा विविध हॅपलोटाईपचा जर एक गट केला, तर त्यातून त्या गटातल्या लोकांची अनेक वैशिष्ट्ये समान, तर काही थोडीशी बदललेली दिसतात. अशा गटांना हॅपलोग्रुप (Haplogroup) म्हणतात.


गुणसूत्रांचा प्रवास

यात दुसरी एक मजेची गोष्ट घडताना दिसते. मातेकडून आपल्या मुलांकडे येणारा डी. एन. ए. (Mitochondrial DNA किंवा mtDNA) आणि पित्याकडून येणारा डी. एन. ए. (Y-Chromosome DNA) असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे डी. एन. ए. असतात. ही दोन्ही मातेची आणि पित्याची गुणसूत्रे त्यांच्या मुलांमध्ये जशीच्या तशी उतरलेली दिसतातच. पण ती कोणत्या पद्धतीने येणार, हे ठरलेले असते. पित्याचा हा Y-Chromosome DNA फक्त मुलांमध्येच संक्रमित होतो, मुलींमध्ये नाही. पण मातेचा mtDNA मात्र मुलांमध्ये आणि मुलींमध्ये असा दोघांमध्येही संक्रमित होतो. अपत्य जर मुलगा असेल, तर त्याच्यात पित्याचा Y-Chromosome DNA आणि मातेचा mtDNA एकत्र आलेले दिसतात. पण तेच जर अपत्य मुलगी असेल, तर तिच्यात मातेचा mtDNA आणि पित्याचाही mtDNAच एकत्र आलेले दिसतात. त्यामुळे मुलामध्ये पित्याचा आणि मातेचा असे दोन्ही वंश एकत्र आलेले दिसतात. पण मुलीत मात्र तिच्या स्वत:च्या मातेचा आणि पित्याच्या मातेचा असे वंश एकत्र आलेले दिसतात! DNA मध्ये होणारे हे बदल नोंदवून ठेवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. यामध्ये DNA च्या क्रमात एकाच जागी दिसून येणारे वेगवेगळ्या लोकांमधले वेगवेगळे बदल एकत्र लिहून दाखवले जातात. ही पद्धत पाश्चिमात्य जगातल्या विद्वानांनी विकसित केलेली असल्याने स्वाभाविकपणे ख्रिश्चन धर्मातल्या संकल्पनावर ती आधारित आहे. त्यानुसार जगाच्या सुरुवातीला ‘अॅडम’ नावाचा एकच पुरुष आणि ‘इव्ह’ नावाची एकच स्त्री, असे फक्त दोनच जण अस्तित्वात होते. त्यांच्या संयोगातून क्रमाक्रमाने बाकीचे लोक जन्माला येत गेले आणि जग माणसांनी भरून गेले. त्यामुळे पुरुषांच्या Y-Chromosome DNA च्या उत्परिवर्तनाची जी साखळी शोधून काढण्यात आली, त्यातल्या सगळ्यात पहिल्या DNA ला अॅडमचे नाव देण्यात आले. त्याचे आद्याक्षर ‘A’ हे त्यासाठी वापरून पुढच्या प्रत्येक उत्परिवर्तनासाठी एकेक क्रमांक आणि त्या शाखेतल्या विविध हॅपलोटाईपसाठी पुन्हा क्रमाने ‘a’ पासून पुढची अक्षरे, अशा पद्धतीने या हॅपलोग्रुपची नावे ठरविण्यात आली. त्यामुळे ‘A’ à ‘A1’ à ‘A1a, A1b’ अशा क्रमाने या हॅपलोग्रुपची नावे दिलेली आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या mtDNA च्या हॅपलोग्रुपची सुद्धा नावे तशीच देण्यात आलेली आहेत. मानवाच्या उत्पत्तीपासून आजतागायत मानवी DNA मध्ये असे असंख्य बदल होत गेलेले आहेत. त्यातून त्याचे असंख्य हॅपलोग्रुप बनलेले आहेत. त्यांचा अभ्यास करणे हा एक अतिशय क्लिष्ट विषय आहे. अत्यंत आधुनिक संगणकाच्या मदतीशिवाय हे शक्य नाही.

मग यात आर्यांचा काय संबंध?

हैदराबाद येथील ‘Centre for Cellular and Molecular Biology’ (CCMB) चे तत्कालीन संचालक पद्मश्री स्व. डॉ. लालजी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या सहयोगाने जगभरातल्या सुमारे १३ जनुकीय शास्त्रज्ञांनी काही वर्षांपूर्वी एक मोठे संशोधन केले. त्यात फक्त भारतातच आढळणाऱ्या अशा काही आनुवंशिक रोगांच्या निदानासाठी अभ्यास केला गेला. यासाठी त्यांनी भारतभरातून विविध प्रकारच्या सुमारे २५ जनजातींच्या लोकांचे DNA नमुने तपासले. यामध्ये उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, नगरनिवासी, वनवासी, इत्यादि अनेक प्रकारचे लोक समाविष्ट होते. त्याचा शोधप्रबंध डिसेंबर २०११ मध्ये प्रकाशित झाला आहे. त्या संशोधनातून जी माहिती समोर आली, त्यातून त्यांच्या संशोधनाच्या विषयाच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची बाब उघड झाली. त्यामुळे आर्य नावाच्या ‘वंशाचा’ हा तिढा निर्णायकपणे सोडवायला मोठी मदत झाली. ती म्हणजे, भारतात राहणाऱ्या या सर्व लोकांचा DNA च्या अभ्यासातून सिद्ध होणारा वंश हा एकच आहे! या सर्व DNA च्या क्रमात गेल्या किमान साठ हजार वर्षांत काहीही बदल झालेला नाही. याचा अर्थ सरळसरळ असा होतो, की त्याहून वेगळा हॅपलोग्रुप असणारे आर्य नावाचे भटके लोक इ. सनपूर्व १८०० मध्ये भारताच्या बाहेरून आले, ही चक्क लोणकढी थाप आहे! याचा दुसराही एक अर्थ असा होतो, की इथे ना कुणी आर्यवंशाचे लोक आहेत, ना कुणी द्रविडवंशाचे! ना जंगलात राहणाऱ्या जनजातींचा वंश कुठला वेगळा आहे, ना शहरात राहणाऱ्यांचा वंश वेगळा आहे!! गेल्या किमान ६०००० वर्षांपासून इथे राहत आहेत ते सगळे एकाच जीवशास्त्रीय वंशाचे आहेत, ते सगळे भारतीय आहेत.
- वासुदेव बिडवे

(क्रमश:)
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.