खजिन्याचे बेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020
Total Views |

article_1  H x


गुडलो बँक्स आणि मी जिवलग बालमित्र. मी अर्ध्यावरच शाळा सोडली आणि शेतीत रमलो. गुडलोने शाळेतलं आणि कॉलेजमधीलही शिक्षण पूर्ण केलं, तरी आमची मैत्री टिकली. अगदी मे मार्था मँगम नावाची सुंदरी आमच्या आयुष्यात आली, तेव्हाही ती तुटली नाही. मार्थाचा बाप शास्त्रज्ञ होता. विक्षिप्त होता. फुलपाखरं जमवून त्यांचा अभ्यास करायचा. नोटबुकात त्यांची चित्रं आणि टिपणं काढून ठेवायचा. मार्था त्याची सगळी उस्तवार करायची. तिच्याशिवाय तो २४ तासदेखील जगू शकला नसता. म्हातारबुवा आणि गुडलोची ओळख आणि मैत्री झाली ती गुडलोला असलेल्या पुस्तकांच्या आणि वाचनाच्या आवडीमुळे. गुडलोने त्याला काही दुर्मीळ पुस्तकं मिळवून दिली होती. गुडलोमुळे एकदा मीदेखील त्याच्या घरी गेलो. तिथे मार्था दिसली आणि दोघे तिच्या प्रेमात पडलो. प्रसंगोपात मार्था आम्हाला भेटायची. पण, आम्ही तिला मागणी घालायचं धाडस केलं नाही. तिचं नक्की कोणावर प्रेम आहे हे समजायला मार्ग नव्हता.



गुडलोच्या मते तो शिकलेला आणि कवितांची वगैरे पुस्तकं वाचलेला, म्हणून ती त्याला पसंत करील. पौर्णिमेच्या रात्री तो झाडाच्या बुंध्याला टेकून बसेल. ती त्याच्या मांडीवर डोके ठेवून पहुडलेली असेल. तो तिला कविता गाऊन दाखवील. माझ्या मते, बापाची उस्तवार करून तिला पुस्तकांचा उबग आला असेल. मी शेतात गेलो की ती मला जेवण घेऊन येईल. काही वर्षांनी आम्हाला खूप मुलं होतील. त्यांना शेतावर पाठवून आम्ही आराम करू. आपल्या मुलीवर दोन तरुण प्रेम करीत आहेत हे समजल्यावर शास्त्रज्ञ भडकला. त्याने आम्हाला घरी यायला मनाई केली.आणि दोन दिवसांनी तो आपल्या मुलीसह रातोरात गायब झाला. आम्ही दोघांनी त्यांच्या शोधार्थ जंगजंग पछाडले. पण, ते दोघे सापडले नाहीत. अनेक दिवस गेले. शेवटी आम्ही त्यांना शोधण्याचा नाद सोडून दिला. गुडलो नोकरीला लागला. मी शेतीत रमलो.


एके दिवशी ली नावाचा तरुण शेतकरी भेटायला आला. त्याचे वडील नुकतेच निवर्तले होते. त्यांच्या कपाटात एक जाड कागद मिळाला होता. कागदावर नकाशा होता. हा कागद म्हणे एका स्पॅनिश फादरने लीच्या आजोबांना दिला होता. डोलर्स कौंटीमध्ये अलामितो नदीजवळ एका ठिकाणी काही टेकड्या होत्या. त्यांच्या मध्यभागी पठारवजा बेट... या बेटावर कोणा राजाने तीन लाख डॉलर्स किमतीची सोन्याची नाणी पुरलेली होती. होकायंत्राच्या साहाय्याने नकाशावर दिशा आणि अंदाजे अंतरे दर्शवली होती. नकाशावर तारीख होती 1863 सालची. आज त्यांची किंमत आणखीन वाढली असेल. आजोबांनी हा खजिना का शोधला नाही?


ते निरक्षर होते. त्यांनी कागद नुसता ठेवून घेतला आणि वडील जन्मांध होते. ते गेल्यावर मला हा कागद मिळाला. ली आणि मी करार केला. प्रवासखर्चासाठी दोघांनी आपापली शेते विकायची. नकाशात दाखवलेल्या जागी जाऊन खजिना हस्तगत करायचा. अर्धा-अर्धा वाटून घ्यायचा.त्याप्रमाणे आम्ही निघालो. त्या ठिकाणी पोहोचलो. काही आठवडे हिंडलो. पण, नकाशात दाखवलेले बेट आम्हाला सापडले नाही. कफल्लक अवस्थेत आम्ही परतलो. आल्यावर मी गुडलोला नकाशा दाखवला. नकाशा पाहून तो हसला.

“जिम, तू मूर्ख आहेस. ज्याने हा नकाशा बनवला. त्याने त्या ठिकाणाहून निघताना खिशातले होकायंत्र-पॉकेट कंपास वापरले होते. पॉकेट कंपास तितकासा अचूक नसतो. माझ्या मते इथे पश्चिमेला वळताना नऊ अंशांची चूक झाल्यामुळे तुम्ही २० मैल भरकटत गेलात.” मी गुडलोला राजी केलं आणि आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला निघालो. नदीपाशी आल्यावर आम्ही गुडलोच्या म्हणण्यानुसार दिशा घेतली. उद्या सकाळी नियोजित स्थळी पोहोचू अशा ठिकाणी रात्री मुक्काम पडला. जेवणं उरकल्यावर गप्पा मारीत असताना गुडलोने सहज म्हणून तो कागद उलगडून पाहिला आणि जोरात ओरडला, “अरे देवा, मी किती मूर्ख आहे. आपल्याकडून मोठीच चूक झाली. आधीच माझ्या लक्षात यायला हवी होती. हा कागद उजेडात धरून बघ. यावर वॉटर मार्क आहे, 1898 सालचा. नकाशावर तारीख आहे १८६३ ची. नकाशा बोगस आहे.”



आम्ही हतबुद्ध झालो. चरफडत झोपी गेलो.सकाळी उठवल्यावर लक्षात आलं. मी झोपेत असताना मला तिथंच टाकून गुडलो घोडागाडी घेऊन पळून गेला होता. माझ्यासारख्या निर्धन मित्राची संगत त्याला नकोशी झाली होती. काय करावं हे मला सुचेना. माझ्या गावापासून हजारो मैल मी आलो होतो आणि त्या गावी तरी माझं काय होतं? शेत विकलं होतं... मी विमनस्कपणे चालत राहिलो आणि अहो आश्चर्य. नकाशात वर्णिलेल्या त्या टेकड्या दिसल्या. मी एका छोट्या टेकडीवर चढून पाहिलं. खरोखरच खाली बेट होतं. मी उतरलो. तिथं एक ओंडक्यांचं साकव दिसलं. त्यावरून बेटावर चालत गेलो. अगदी छोटं बेट आणि अचानक एका झाडापाशी एक म्हातारा दाढीवाला दिसला. आधी मी त्याला ओळखलं नाही. पण, तो मे मार्थाचा बाप होता. मला पाहून तोही चकित झाला. इथे फुलपाखरांच्या काही दुर्मीळ प्रजातींचा तो अभ्यास करतोय. बेटावर सोन्याचा खजिना नव्हता. पण, मार्था नावाचा जीवंत खजिना प्राप्त व्हावा म्हणून मी विक्षिप्त म्हातार्‍याची मनोभावे सेवा केली अन् करतोय.
मार्था आणि मी सुखी आहोत.



- विजय तरवडे
(BURIED TREASURE या कथेवर आधारित)
@@AUTHORINFO_V1@@