'उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर ५मिनिटे बोलून दाखवावे'

    दिनांक  11-Sep-2020 14:10:44
|

chandrakantdada patil _1&
मुंबई : कॉंग्रेसच्या काही नेत्यांना मराठा आरक्षण नको होते. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नव्हते, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विषयावर सलग ५ मिनिट बोलून दाखवावे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा  पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजपा सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी काल पत्रकाद्वारे केली होती. मराठा संदर्भात संबंधित मंत्री अशोक चव्हाण किंवा वरिष्ठ अधिका-यांनी दिल्लीत ठाणं मांडून बसायला हवं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेस नेत्यांची अनेक वर्षांची मानसिकता आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत गांभीर्यपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत असं चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे.


मराठा मोर्चांना खतपाणी घालणे हे आमचे कल्चर नाही. समाजात अस्वस्थता निर्माण व्हावी ही आमची इच्छा अजिबात नाही, मात्र ज्यांच्या मुलांना आरक्षणाअंतर्गत शैक्षणिक प्रवेश मिळाला नाही, ज्यांच्या नोकऱ्या अगदी मिळता-मिळता राहिल्या, त्यांच्यात आपसूकच अस्वस्थता निर्माण होईल. आता मराठा समाजाला सरकारने योग्य ती मदत करावी, यासाठी आम्ही आंदोलन करु, असेही चंद्रकांतदादा  पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. मराठा समजाला आरक्षण देण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले . मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नसेल तर तो विषय समजून घेण्याची तयारी पाहिजे असा सल्लाही यावेळी बोलताना पाटलांनी दिला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.