शेतकर्‍याच्या कोट्यवधी उद्योजक चिरंजीवाची गोष्ट!

11 Sep 2020 11:51:36

arth_1  H x W:


तुम्हाला ‘स्वदेस’ चित्रपटातला मोहन भार्गव आठवतोय का? जो शाहरुख खानने साकारला होता. तोच जो अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये संशोधक असतो आणि भारतात येतो. आपल्या देशाची परिस्थिती पाहून आपल्या लोकांसाठी तंत्रज्ञान विकसित करतो. तोसुद्धा काहीसा मोहन भार्गवसारखाच आहे. अमेरिकेत शिकला. दोन पदव्युत्तर पदवी मिळवल्या. तिथे कंपनीसुद्धा सुरु केली. पुन्हा भारतात आला. त्याने शेतकर्‍यांसाठी असं काही तंत्रज्ञान विकसित केलं की, शेतकर्‍यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. हा खर्‍या आयुष्यातला मराठमोळा ‘मोहन भार्गव’ एका शेतकर्‍याचा मुलगा आहे हे विशेष. हा मुलगा म्हणजे ‘टेकतंत्र ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष अमेय राऊत होय.



पालघर जिल्ह्यातील केळवे-माहिम परिसर म्हणजे पर्यटनासाठी प्रसिद्ध. केळवेचा समुद्रकिनारा पाहण्यासाठी दुरुन पर्यटक येतात. याच केळवा-माहिममध्ये बाळकृष्ण राऊत आणि शैला राऊत गुण्यागोविंदाने नांदत होते. बाळकृष्ण एक प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जात. नारळ, विड्याची पाने, सुपारी, भात, कारले इत्यादी ते आपल्या शेतातून पिकवत असत. त्यांचं भाताचं शेत पाहण्यासाठी तर दूरवरुन लोक येत. १९९६ साली तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते त्यांना ‘शेतीनिष्ठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शेतीवर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. त्यांनी पिकवलेले कारले थेट गुजरात, नाशिक येथे जात. त्यांना या शेतीच्या कामात तेवढीच तोलामोलोची साथ त्यांची पत्नी शैला देत असत. घर आणि शेती अशा दोन्ही आघाड्या समर्थपणे त्या हाताळत होत्या. या दाम्पत्यांचा अमेय हा चिरंजीव. लोभस आणि गोंडस.


अमेयचं शालेय शिक्षण माहिम शिक्षण संस्थेच्या भुवनेश किर्तने विद्यालयात झाले. मराठी माध्यमाची असलेली ही शाळा दहावीपर्यंत होती. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे तांत्रिक शिक्षणदेखील मुलांना दिले जाई. तशाप्रकारचं तांत्रिक शिक्षण अमेय याच शाळेत शिकला. पुढे यामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्याने मुंबईला धाव घेतली. दादरमधल्या अण्णासाहेब वर्तक वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत त्याला ‘इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक’ या विषयाच्या पदविकेसाठी प्रवेश मिळाला. तीन वर्षांची पदविका प्राप्त केल्यानंतर त्याने मालाडच्या अथर्व कॉलेजमधून ‘इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यावेळी कॅम्पस इंटरव्यूव्ह व्हायचे. पण, अमेयला नोकरी करायची नव्हती. तो अशा मुलाखती टाळायच्या. नोकरीची त्याची मानसिकताच नव्हती. मात्र, त्याला इंजिनिअरिंग नंतर एमबीए करायचं होतं. दरम्यान, वसतिगृहामधील काही मुलं परदेशी जाण्यासाठी आवश्यक असणार्‍या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत होती. तसा परदेशी जाण्याचा अमेयचा काही विचार नव्हता. पण, एकदा आपण प्रयत्न करुन पाहण्यास काय हरकत आहे, या विचाराने त्याने ‘जीआरई’ आणि ‘टोफेल’ची परीक्षा दिली. त्या परीक्षेत तो उत्तीर्णसुद्धा झाला. घरुन अमेयला उच्च शिक्षणासाठी पाठिंबा होताच. अमेरिकेतल्या पाच विद्यापीठांमध्ये त्याने अर्ज केला होता. त्यातील तीन विद्यापीठांमध्ये त्याचा नंबर लागलेला. यापैकी ‘मरे स्टेट युनिव्हर्सिटी’मध्ये अमेयने प्रवेश निश्चित केला. ‘मास्टर्स इन मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी त्याला प्रवेश मिळाला होता. दरम्यान, शिक्षणाच्या खर्चाचा बोझा पूर्णपणे घरच्यांवर टाकायचा नाही, हे त्याने मनाशी ठरवलेलं. त्यामुळे तो कॅम्पस नोकरी करु लागला. एका फूड स्टॉलवर तो पार्टटाईम नोकरी करायचा. पुढे एमबीए करायचेदेखील त्याने निश्चित केले. मात्र, एमबीएसाठी येणारा शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण स्वत:च करायचा हे मात्र मनात ठरवलेलं.


arth_1  H x W:
भारतीय मालक असलेल्या हॉटेलमध्ये अमेय रात्रपाळीचं काम करु लागला. काऊंटरवर ग्राहकांना हाताळण्याचं काम होतं ते. आठवड्यातून तीन रात्री ते काम करावं लागे. शनिवार-रविवार कॉलेजला सुट्टी असायची. या दिवशी हा पठ्ठ्या एका पेट्रोलपंपावर काम करायचा. अशाप्रकारे आठवड्यातले तब्बल ६४ तास तो काम करत असे. साधारणत: सर्वसामान्य अमेरिकन आठवड्याचे फक्त ४०तास काम करतात. प्रचंड मेहनत करुन त्याने जी पै न पै जमवली अन् त्यातून तो एमबीए झाला. येथे एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. अमेयचे एक अमेरिकेत शिक्षक होते. त्यांनी कधीच कोणत्याच मुलाचे प्रेझेंटेशन घेतले नव्हते. पण, अमेयने ज्या सखोलपणे विषय मांडला होता ते पाहून पहिल्यांदा त्यांनी अमेयला प्रेझेंटशनची संधी दिली होती. त्यानंतर त्याने एका क्रुझवर आयटी डिपाटर्मेंटमध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्याने एका खासगी कंपनीत ‘सिस्टिम बिझनेस अ‍ॅनालिस्ट’ म्हणून नोकरी केली. २०१३साली मात्र त्याने एका मित्रासोबत अमेरिकेत भागीदारीत ‘ट्रायक्वेट्रा प्रोफेशनल सोल्युशन्स’ नावाची आयटी कन्सल्टिंग कंपनी सुरु केली. त्यानंतर ‘ओटीईटी’ नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी भारतात २०१७मध्ये सुरु केली. ही कंपनी मुख्यत्वे इस्पितळ व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवते. जवळपास ३० हून अधिक इस्पितळे ही सेवा घेतात. भारतात आल्यानंतर अमेयने आपल्या शिक्षकासोबत ‘टेकतंत्र ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सुरु केली. ‘होम ऑटोमेशन’ आणि ‘ऑफिस ऑटोमेशन’ची सुविधा ही कंपनी देऊ लागली. आपण निव्वळ मोबाईलवरुन एअरकंडिशन आणि इतर घरगुती उपकरणे नियंत्रित करु शकतो. अमेय बाबांना शेतात राबताना लहानपणापासून पाहत असे. शेतीची कामे प्रचंड अंगमेहनतीची असतात. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे, रात्रीचं जाऊन पंप चालू करुन शेताला पाणीपुरवठा करणे. खरंतर हे जोखमीचं पण होतं. जर हे घरी बसून करता आलं तर... त्याने एक तंत्र विकसित केलं. निव्वळ मिस्ड कॉल देऊन पाण्याची मोटर चालू-बंद करण्याची क्षमता त्यात होती. अशा स्वरुपाची आणखी तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने अमेयने बाजारात आणली आहेत.


ही उत्पादने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हैदराबाद, उत्तर प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ येथेसुद्धा गेली. अवघ्या नऊ महिन्यांत ८००हून अधिक उत्पादने विकली गेली आहेत. आज १५डिलर कंपनीकडे कार्यरत आहेत. अशाप्रकारे अमेयच्या तिन्ही कंपन्यांमध्ये ५०हून अधिक लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. एका प्रयोगशील शेतकर्‍याचा, केळशी-माहिम सारख्या दुर्गम भागातला हा तरुण काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे. तेदेखील निव्वळ सात वर्षांच्या कालावधीत. होम ऑटोमेशन, ऑफिस ऑटोमेशन आणि अ‍ॅग्रो ऑटोमेशनमध्ये ‘मेक इन इंडिया’ उत्पादन तयार करणारी अमेय राऊत यांची बहुधा ही एकमेव कंपनी असावी. शेतकर्‍यांचं आणि सर्वसामान्य भारतीयांचं जीवन सुसाहाय्य व्हावं यासाठी आपलं ज्ञान वापरुन तंत्रज्ञान विकसित करण्याचं अमेय राऊत यांचं उद्दिष्ट आहे. अमेय राऊत यांसारखे तरुण जर भारताला लाभले तर या देशातील बळीराजा कदाचित मृत्यूला कवटाळणार नाही. त्याचं जीवन सुसाहाय्य होईल. खर्‍या अर्थाने अमेय राऊत ‘स्वदेस’मधला खराखुरा ‘मोहन भार्गव’ आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.


Powered By Sangraha 9.0