गिधाडांसाठी नाशिकमध्ये साकारणार रेस्टॉरंट

11 Sep 2020 00:04:38

Hotel_1  H x W:
 
 
नाशिक (प्रवर देशपांडे) : ग्रामपंचायत म्हटले की, डोळ्यासमोर येते ते वीज, रस्ते, पाणी आणि सांडपाणी आदी स्वरूपाचे कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था. मात्र, नाशिक जवळील दरी ग्रामपंचायतीने ‘ऑऊट ऑफ द बॉक्स’ विचार करत गिधाड या पक्ष्यासाठी रेस्टॉरंट साकारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. शहरालगत पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकल्प साकारला जात आहे. यापूर्वी जिल्ह्यातील हरसुल जवळील खोरीपाडा येथे अशाप्रकारचे रेस्टॉरंट साकारण्यात आले आहे. दरी येथील प्रस्तावित प्रकल्पाबाबत माहिती देताना सरपंच अलका गांगोडे, उपसरपंच अॅड. अरुण दोंदे यांसह ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी सांगितले की, “गिधाड हा निसर्गचक्रातील महत्त्वाचा पक्षी आहे. पर्यावरणाची स्वच्छता राखण्याचे काम गिधाडांमार्फत केले जाते.
 
 
मृत प्राण्यांच्या शरीराचे सेवन करून हा पक्षी आपली उपजीविका करत असतो. त्यामुळे गिधाडांचे रक्षण व्हावे, तसेच त्यांच्या घटत चाललेल्या संख्येला आळा बसून त्यात वृद्धी व्हावी, यासाठी दरी येथे हे रेस्टॉरंट साकारण्यात येत आहे.” गावालगत असलेल्या डोंगर माथ्यावर हे रेस्टॉरंट साकारण्यात येणार असून दरी या गावाच्यावतीने नजीकच्या २० गावांतील गावकर्यांना त्यांच्या गावातील कोणी प्राणी मृत झाल्यास या रेस्टॉरंटमध्ये आणण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. निसर्गचक्र अबाधित राहावे, भूतदया जोपासली, निर्सगाचे मानव म्हणून आपणदेखील देणे लागतो, या भावनेतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. केवळ आर्थिक तरतूद नसल्याने व त्या अनुषंगाने आर्थिक अडचणींचा सामना या ग्रामपंचायतीस करावा लागत असल्याने प्रकल्प संथगतीने पुढे जात असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
 
 
‘या’ कारणाने दरी येथे येणार गिधाडे
 
 
दरी येथे रेस्टॉरंट साकारल्यावर येथे गिधाडे येतील का? याबबात पक्षीमित्र अनिल माळी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, “येथे गिधाडे येण्याची ९९ टक्के शक्यता आहे. कारण, गिधाडे ही ८० ते १०० स्क्वे. किमी अंतरावरील भक्ष उंच आकाशात उडताना पाहू शकतात. नाशिक जिल्ह्यात हरसुल, मांगीतुंगी येथे गिधाडे आहेत. गिधाडांच्या निरीक्षणाखाली हा परिसर आहे. तसेच, दरीपासून हरसुल हे अवघे ४० किमी अंतरावर आहे. तेव्हा येथे गिधाडे येण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे,” असे माळी यांनी सांगितले.
 
 
दुर्गंधीचा त्रास होणार नाही!
 
 
मृत जनावरे डोंगरमाथ्यावर टाकली असता त्याच्या दुर्गंधीने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल का, याबाबत माळी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “येथे मृत जनावरांची दुर्गंधी पसरण्याची शक्यता नाही. कारण, हे रेस्टॉरंट डोंगरमाथ्यावर आहे. तसेच, ४० ते ५० गिधाडांची एक टोळी एक भक्ष खात असते. ही टोळी अवघ्या अर्धा तासात एक बैल किंवा म्हैस यांसारखा मोठा प्राणी फस्त करते. तसेच, त्यांची हाडे व इतर अवशेष हे साळींदर, तरस यांसारखे प्राणी येऊन खातात. त्यामुळे मृत प्राण्याचा अंश तेथे राहत नसल्याने दुर्गंधी व आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
‘या’ कारणांनी झाली गिधाडांची संख्या कमी
 
 
पाळीव प्राण्यांना वेदनाशामक म्हणून ‘डायक्लोफीनॅक’ हे औषध दिले जाते. हे प्राणी मृत झाले की, त्याचे सेवन गिधाडे करतात. त्यामुळे या औषधाचे अंश गिधाडांच्या शरीरात जातात. त्यामुळे गिधाडांच्या शरीरात पाणी टिकत नाही. परिणामस्वरूप गिधाडे मृत होतात. साधारण २० वर्षांपूर्वी तीन कोटींच्या आसपास जगात गिधाडांची संख्या होती. ती दहा वर्षांपूर्वी अवघी एक ते दीड हजार झाली. ‘डायक्लोफीनॅक’ला पर्याय म्हणून ‘मेलोक्सीकॅम’ हे औषध आता वापरात असल्याने गिधाडांची संख्या वाढत आहे. तसेच, कातडी काढण्याचे उद्योग बंद झाल्याने तसेच मृत जनावरे आता रस्त्यात टाकली जात नसल्यानेदेखील गिधाडांची संख्या कमी झाली आहे.
 
 
संसर्गजन्य आजाराला बसतो आळा
 
 
गिधाडे मृत जनावरे खात असल्याने गावातील भटकी कुत्री व इतर जनावरे यांच्या हाती ते भक्ष लागत नाही. परिणामस्वरूप गावातील पाळीव व भटक्या जनावरांच्यामार्फत गावात क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यास आळा बसतो. त्यामुळे गावातील आरोग्यदेखील अबाधित राहते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0