सरकारने विमाकवच नाकारले : डॉक्टरांची राज ठाकरेंकडे तक्रार

11 Sep 2020 16:15:13
Raj Thackeray_1 &nbs


मुंबई : खासगी डॉक्टरांनी कोरोना काळात रुग्णांची सेवा करावी, आपले दवाखाने सुरू ठेवावेत, अशी परिपत्रके राज्य सरकारने काढली. मात्र, कोरोना रुग्णांची सेवा करताना मृत्यू झाला तर हक्काचे विम्याचे पैसे देण्याची बाब राज्य सरकारने निर्लज्जपणे टाळली, या प्रकरणाचा मनसेतर्फे निषेध करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासगी डॉक्टरांच्या संघटनेने भेट घेत व्यथा त्यांच्या कानावर घातली.
 
 
राज्यातील कोरोना योद्धे असलेल्या डॉक्टरांना अशी वागणूक म्हणजे हा सरकारचा नाकर्तेपणा आहे, अशी टीकाही मनसेने केली आहे. राज्य सरकारने खासगी डॉक्टरांनी चिकित्सालये सुरू ठेवण्याचे परिपत्रक काढले होते. त्यात डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू जर कोरोनाने झाला तर विमाकवच देऊन कुटूंबाला मदत करण्याचे आश्वसनही परिपत्रकात देण्यात आले होते. मात्र, ही बाब आता सरकार नाकारत असल्याची गोष्ट यावेळी डॉक्टरांनी लक्षात आणून दिली.
 
 
“कोरोनाच्या काळात रुग्णांची सेवा करावी, आपले दवाखाने चालवावेत अशा आशयाची परिपत्रकं सरकार काढतं, आणि तेच सरकार कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला तरी त्याचा हक्काचे विम्याचे पैसे त्याचा कुटुंबाला नाकारतं आणि कारण देतं की तुम्ही खासगी दवाखान्यात काम करत होतात. मुळात ह्या काळात जीवावर उदार होऊन डॉक्टर्स सेवा देत होते, देत आहेत, त्यात खाजगी डॉक्टर्सना पण विमा कवच असल्याचं सरकारच स्वतःच्या परिपत्रकात जाहीर करते आणि आता निर्लज्जपणे ते नाकारते. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे, अशी टीका मनसेतर्फे सरकारवर करण्यात आली आहे.



Powered By Sangraha 9.0