महापौर व परीवाराच्या बोगस कंपन्यांविरोधात ईडीकडे तक्रार करणार !

11 Sep 2020 17:23:45

Kirit Somaiya_1 &nbs

 


बेकायदा जागा हडपणाऱ्या शिवसेना नेत्यांवर किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल



मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात एसआरए आणि म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी संबंधित नेत्यांनी उत्तरे द्यावी तसेच बेकायदेशीर प्रकार आढळल्यास कारवाई करवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
 
 
मंत्री अनिल परब यांचे बेकायदा पंचतारांकीत कार्यालय
 
२७ जून २०१९ रोजीचे पत्र ट्विट करत सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. खार रोड येथील रहिवासी विकास गंगाराम शेगले यांनी अनिल परब यांच्या कार्यालयाच्या नावे उभारण्यात आलेल्या बांधकाम प्रकरणी म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. गांधीनगर, वांद्रे पूर्व विभागातील इमारत क्रमांक ५७ व ५८ यांच्या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या जागेचा वापर कार्यालयासाठी केला जात असल्याची तक्रार केली होती. ही जागा निष्कासित करून मोकळी करण्यासाठी निर्देश म्हाडा अधिकाऱ्यांनी १० दिवसांची मुदत दिली होती. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही.
 
 
म्हाडा अधिकाऱ्यांवर दबाव ?
 
शिवसेनेचे मंत्री परब यांच्या बेकायदा पंचतारांकीत कार्यालयाविरोधात एका माजी शिवसैनिकानेच सोमय्या यांच्याकडे तक्रार केली आहे. गेली अडीच वर्षे या बेकायदा बांधकामाविरोधात लढा देत आहेत. सोमय्या यांनी गुरुवारी अनिल परब यांच्या कार्यालयाला भेट दिली. म्हाडा इमारतींच्यामधील मोकळी जागा बळकावली आहे. २७ जून २०१९ रोजी म्हाडाने या संदर्भात अनिल परब यांना जागा मोकळी करण्यासाठी सांगितली होती. तरीही कित्येक वर्षे हे बेकायदा ऑफिस सुरू आहे, असा हल्लाबोल सोमय्या यांनी सरकारवर केली आहे. एका माणसाला एक न्याय आणि ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना वेगळा न्याय हा कुठला कायदा, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. म्हाडातर्फे कारवाई होऊ नये म्हणून दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 

महापौरांनी एसआरएतील समाज कल्याण केंद्राची जागा हडप केली !
 
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि कुटूंबियांनी वरळीतील एसआरए प्रकल्पातून उभ्या झालेल्या एका इमारतीत तळमजल्यावर बेकायदेशीररित्या कार्यालय थाटल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. एसआरए प्रकल्पाअंतर्गत पूर्नवसन झालेल्या झोपडपट्टी वासीयांच्या समाज कल्याण केंद्राची जागा तिथे बळकवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पुरावे सादर केले. किशोरी पेडणेकर आणि त्यांचे पती किशोर पेडणेकर यांच्यानावे असलेल्या ‘किश कॉर्पोरेट सर्व्हीस’ या कंपनीने संपूर्ण तळमजला हडप केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच अन्य आठ बोगस कंपन्यांची नोंदणी झाली असून त्यांची यादीही त्यांनी सादर केली. या कंपन्यांचा मनी लाँडरींगसाठी वापरला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या बेनामी कंपन्यांबद्दल पेडणेकर परिवाराने स्पष्टता नाही केली तर ईडीकडे हे प्रकरण नेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


Powered By Sangraha 9.0