थोर कलाध्यापक प्रा. रवींद्र दीक्षित सरांचे निधन : एका कलाध्यापन पद्धतीचा अस्त

    दिनांक  11-Sep-2020 21:11:14
|


Ravindra Dixit _1 &nप्रा. रवींद्र दीक्षित सर या जगात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. सर, ‘सीताराम निवास’, भागशाळा मैदानाजवळ, डोंबिवलीला राहायचे. दोन वर्षांपूर्वी मी त्यांना, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रदर्शनात प्रदर्शित झालेल्या स्वाध्यायिकांचे परीक्षण करण्यासाठी, परीक्षक म्हणून बोलावले होते.


मला त्यांच्या आठवणी सांगण्यासाठी अशा दुःखद प्रसंगाची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही पाहिलेलं नव्हतं. मला त्यांनी कलाक्षेत्रात, कलाध्यापक म्हणून प्रथम पुण्याच्या पाषाण उपनगरातील अभिनव कला महाविद्यालयात, प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे आणलं. औरंगाबादला शासकीय कला महाविद्यालयात शिकत असताना ते द्वितीय वर्षाला शिकवायला होते आणि मी तेव्हा अंतिम वर्षात शिकत होतो. ‘संस्कार’, ‘बालसुधारगृह’ या विषयावर माझा संशोधन प्रकल्प होता. फार मेहनतीने मी तो पूर्ण करीत होतो आणि प्रकल्प सादर करण्याच्या दिवशी, मी ‘पोर्टफोलिओ’ कॉलेजला गेलो आणि सरांना दाखविण्यासाठी, त्यांची परवानगी मागायला म्हणून दुसर्‍या मजल्यावरील त्यांच्या वर्गात गेलो. सर म्हणाले, “घेऊन ये. ” मी खाली माझ्या वर्गात आलो, तर माझा ‘पोर्टफोलिओ’ गायब झालेला होता. कुणीतरी मित्रांनी तो पळवलेला होता. कॉलेजमध्ये अशा खोड्या होतातच... मला फार रडायला आले. तोपर्यंत दीक्षित सर खाली आले. माझा रडणारा चेहरा पाहून विचारले, ‘‘काय झालं गजानन?’’ म्हटलं, ‘‘सर, माझा पोर्टफोलिओ कुणीतरी लांबवला आहे” आणि त्यांच्या गळ्यात पडून मी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांनी समजावलं ‘सबमिशन’ कधी आहे? म्हटलं, ‘आठ दिवसांनी...!’ ते म्हणाले, ‘‘तुझा पोर्टफोलिओ मित्रांनी चोरला आहे, तुझी बुद्धी आणि मेहनत तर ते चोरू शकत नाहीत. ’’ ‘‘जा घरी आणि मुख्य सहा मीडियांच्या स्वाध्यायिका नव्याने करायला घे.’’ मला त्यांनी धीर दिला, उत्साह दिला. मी घरी आलो. त्यावेळी कदाचित वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं असेल. ‘मी सलग आठ रात्र आणि नऊ दिवस सतत काम करीत राहिलो आणि ‘सबमिशन’च्या दिवशी मी ‘पोर्टफोलिओ’ घेऊन कॉलेजला हजर झालो.


सरांनी उत्साह वाढवला, ऊर्जा दिली, प्रेरणा दिली आणि माझ्याकडून एक वर्ष केलेले काम जे मित्रांनी लांबवले होते, ते नऊ दिवसांमध्ये २४X७ तासांमध्ये सलग चार दिवस काम करून पूर्ण केले होते. पुढे मी त्याच वर्षी विद्यापीठात प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येऊन उत्तीर्ण झालो. प्रा. शिवाजीराव भोसले सर, तत्कालीन कुलगुरु यांनी स्नातक म्हणून शपथ दिली. हे सारं दीक्षित सरांमुळे घडलं होतं. ते त्याचवेळी म्हणाले होते, ‘‘स्ट्रगलर नेहमी अनुभव घेऊन मोठा होतो. ’’ ‘‘मला तुझ्यासारख्या विद्यार्थी संधी मिळाल्यास अध्यापन क्षेत्रात आणायचाच आणि...’’


पुण्याच्या पाषाणला तब्बल सहा वर्षांनंतर सरांना पाहायला मिळाले. ते शासनाकडून मुलाखत घ्यायला आले होते. माझ्याकडे पाहिलंही नाही. ओळख दाखवणं तर दूरच...! मी जरा नाराज झालो. त्या मुलाखतीमध्ये आलेल्या उमेदवारांमध्ये मी पहिला आलो होतो. हे तब्बल १५ दिवसांनी समजले होते. सरांबद्दलच्या आठवणी फार दाटून आलेल्या आहेत. मला ते पितृतुल्य होते. व्हॉट्सअपवर त्यांचं कोरोनामुळे निधन झाल्याचं वृत्त वाचलं आणि धक्काच बसला...


सव्वासहा फूट सुदृढ देहयष्टी, एखाद्या पोलीस अधिकार्‍यांसारखं वाटणारं व्यक्तिमत्त्व. दणकट बोटांच्या हातात धरलेल्या लांब टोक असलेल्या पेन्सिलच्या अग्राला गुलाब पाकळ्यांप्रमाणे नाजूक पद्धतीने हाताळून समोरच्या व्यक्तीचे पूर्ण रेखांकन होईपर्यंत हात न उचलणारा कलाशिक्षक भारतातच काय जगात आढळणं अशक्य. सरांनी, व्यक्तिचित्रणे आणि आध्यात्मिक विषयांवरील पेंटिंग्ज करणारा कलासिद्धहस्त कलाध्यापक, अशी ओळख निर्माण केलेली होती. फणसाला वरून काटे असतात. आत मात्र गोड गरे मिळतात. प्रा. रवींद्र दीक्षित सर हे फणसासारखे होते. सुरुवातीला त्यांच्या तीक्ष्ण नजरेला नजर कुणाला देता येत नसायची. विद्यार्थीच काय, इतर कलाध्यापकही त्यांच्या समोर नतमस्तक असायचे. मी त्यांना दोन वर्षांपूर्वी, परीक्षक म्हणून बोलावले होते. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. खूप खूश झाले. कारण, योगायोगाने आम्ही सहाध्यायी चारही कलाध्यापक औरंगाबादच्याच शा. क. ममध्ये शिकलेलो आणि चार वर्षांमध्ये कधीतरी एकदा आम्हाला सरांच्या ‘वर्गशिक्षक’ या नेतृत्वाखाली कलाध्ययन करता आले होते.


त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी, डोंबिवलीला बोलावून त्यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतलेल्या स्वाध्यायिका दाखविल्या आणि आणखी सुलभ म्हणजे कलाविद्यार्थ्यांच्या मनातील सुप्त कलागुणांना व्यक्त करण्यासाठीच्या क्लुप्त्या सांगितल्या. एखादा आकार हा आशयगर्भ कसा करता येईल, त्याचं एक सुंदर प्रात्याक्षिक त्यांनी आम्हाला दाखविली. तीच ऊर्जा, तोच उत्साह तीच क्षमता आणि आणि तोच हातातील पेन्सिलवरील ताबा, कंट्रोल...!! आम्ही थक्क झालो. स्वत:ला धन्य मानत त्या दिवशी त्यांचा निरोप घेताना त्यांचे आणि आमचेही डोळे ओले झाले होते. या ‘लॉकडाऊन’च्या काळात, त्यांच्या सौभाग्यवतींना, नानावटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोनच महिन्यांत त्यांना देवाज्ञा झाली होती. सरांना, कोरोनामुळे आणि डॉक्टरांकडून वेळीच पुरेसे उपचार न मिळाल्यामुळे देवाज्ञा झाली. ऋध्दी त्यांचा कन्या, रडत-रडत दुबईवरुन सांगत होती. फार वाईट घडले. सरांच्या जाण्याने त्यातही अचानक जाण्याने त्यांच्या मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळलाच, परंतु महराष्ट्र कला व सांस्कृतिकेतचा पूजक-उपासक आणि व्रतस्थ कलातपस्वी हळहळ लावून निघून गेला, ही ज्ञानी कला अध्यापकीय क्षेत्रासाठी न भरुन येणारी घटना आहे. शासनसेवेत असताना त्यांनी अनेक अभ्यासक्रमांवर अनेक परीक्षा समित्यांवर, अनेक कलाभ्यास मंडळांवर तज्ज्ञ म्हणून काम केेलेले होते. त्या कामात त्यांचा ठसा त्यांनी उमटवला तो अजरामर झाला. माझ्यासारखे आणि माझ्याहून कितीतरी अधिक कौशल्य लाभलेले विद्यार्थी त्यांनी निर्माण केले.


ते जेव्हा परदेशात गेले होते, तेव्हा त्यांनी काही कला दालनांना ‘आर्ट म्युझियम्स’ना त्यांनी भेटी दिल्या. तेव्हा तेथील संबंधितांनी सरांच्या व्यक्तिमत्त्वावर भारावून जाऊन त्यांना त्यांच्याकडील आतिथ्याने सन्मान केला. त्यांच्याकडे तेव्हा सेवानिवृत्त झालेल्या शासकीय अधिकारी वा प्राध्यापकाचे ओळखपत्र नव्हते. आम्ही त्यांच्या घरी गेलो, तेव्हा मला त्यांनी ओळखपत्र नव्हते. आम्ही त्यांच्या घरी गेले तेव्हा मला त्यांनी ही घटना सांगितली. मला ही माहिती नवीन होती. मी लगेच आमचे प्रभारी अधिष्ठाता संतोष सरांना सदर घटना सांगितली आणि आठच दिवसांत सरांना सेवानिवृत शासकीय अधिकार्‍याचे ओळखपत्र मी स्वत: नेऊन दिले. ती त्यांची माझी अखेरचीच भेट ठरली. “शासनसेवेतील आणि अगोदरची अशी तब्बल 40 वर्षे त्यांनी कलाध्यापनाचे पुण्यकार्य केले. कलादान हे सर्वश्रेष्ठ दान असते,” असे ते म्हणायचे. “आपल्याकडे दुर्दैवाने कलाध्यापकांना फारसे चांगले दिवस सेवेत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरही नसतात,” असे दीक्षित सर फार खेदाने आणि नाराजीने म्हणायचे, त्याचचेळी ते असेही म्हणायचे की,“कलाकार आणि कलाध्यापकाला नेहमी त्रास होण्यामागे त्याने सतत जागसक राहावे, असाही ईश्वराचा उद्देश असावा वाईटातून चांगलं शोधायचा त्यांचा प्रयत्न असायचा.. त्यांच्या निधनाला आज सहा दिवस झालेत, आठवणी अजून संपत नाहीत. सरांच्या आठवणीत, दु:ख व्यक्त करण्यापेक्षा सरांनाच आठवणीत ठेवून त्यांना आनंद वाटेल, असे कलाकार्य करणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल...!!

 
 
- प्रा. गजानन शेपाळ
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.