'गोल्डन अॅरो' आज हवाईदलात अधिकृतपणे सामील होणार

10 Sep 2020 09:37:37

rafael_1  H x W


नवी दिल्ली :
बहुप्रतिक्षीत लढाऊ विमान राफेलचा आज औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश होणार आहे. चंदिगडच्या अंबाला हवाईतळावर हा सोहळा पार पडणार आहे. राफेलचा समावेश भारतीय हवाईदलातील १७ स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला 'गोल्डन अॅरो' नावाने संबोधण्यात येणार आहे. पाच राफेल विमानांची पहिली खेप २७ जुलै रोजी फ्रान्सहून अंबाला इथल्या हवाई दलाच्या एअर बेसवर पोहोचली होती.


या कार्यक्रमात सीडीएस जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांच्यासह संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित असतील. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात नोंद होणाऱ्या या मोठ्या घटनेचे ते साक्षीदार असतील. या निमित्ताने भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन, हवाई दल प्रमुख एरिक ऑटेलेट, फ्रान्सच्या हवाई दलाचे उपप्रमुख आणि अन्य अधिकारी फ्रान्सच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करतील.


कार्यक्रमाची रुपरेषा
सकाळी १०.१५ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होील. त्यानंतर १०.२० मिनिटांनी सर्वधर्म पूजा पार पडेल. १०.३० वाजता फ्लाय पास्ट सुरू होईल. वक्त्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आलीय. त्यानंतर औपचारिकरित्या राफेल एअरफोर्सचा एक भाग बनतील.


भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमानांचा करार झाला आहे. या विमानांसाठी ५९,००० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कराराच्या चार वर्षांनी म्हणजेच २९ जुलै २०२० रोजी पाच राफेल लढाऊ विमानांची फेरी भारतात पोहोचली होती. फ्रान्सची कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने ही विमानं बनवली आहेत. मात्र अजून ही विमानं हवाई दलात औपचारिकदृष्ट्या सामील झालेली नाहीत. आतापर्यंत भारताला १० राफेल विमानं मिळाली आहे, ज्यापैकी पाच विमानं सध्या फ्रान्समध्ये असून भारतीय हवाई दलाचे वैमानिक त्यांचं प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान सर्व ३६ लढाऊ विमानं २०२१च्या अखेरपर्यंत भारताला मिळतील, अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0