'सूडाच्या राजकारणातून वेळ मिळाला तर जरा इथेही बघा...'

    दिनांक  10-Sep-2020 10:12:51
|

atul bhatkhalkar_1 &


मुंबई :
सांगलीमध्ये रात्रभर रुग्णालयांना विनवण्या करुनही अखेर उपचार न मिळाल्याने मृत वृद्धेच्या नातवाने व्हिडिओद्वारे त्याला आलेला अनुभव मांडला. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची वस्तुस्थिती समोर आली आहे. याचाच हवाला देत राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना ठाकरे सरकार अभिनेत्री कंगना रानौतवर सूड घेण्यात व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्ष भाजपने केली आहे.भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणतात, "उपचाराअभावी कोरोना पॉझिटिव्ह वृद्धेचा कारमध्येच तडफडून मृत्यू,उद्धव ठाकरे सूडाच्या राजकारणातून वेळ मिळाला तर जरा इथेही बघा..."दरम्यान,सांगलीतील चंद्रभागा कोरे (वय ८०) यांना तीन दिवसांपूर्वी अशक्तपणा जाणवू लागल्याने स्वॅब टेस्ट केली होती. बुधवारी सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातू शैलेश कोरे याने रुग्णवाहिकेची शोधाशोध सुरू केली. रुग्णवाहिका मिळत नसल्याने आजीला स्वतःच्या कारमध्ये घेऊन तो घराबाहेर पडला. सांगली आणि मिरजेतील सर्व कोविड उपचार सेंटरवर गेल्यानंतर त्याला खाटा शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्याने खासगी रुग्णालये पालथी घातली. रात्रभर तो सांगली आणि मिरजेतील रुग्णालयांमध्ये जाऊन विनवण्या करत होता. मात्र, एकाही रुग्णालयात त्याला प्रवेश मिळाला नाही. खाटा शिल्लक नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही, अशी अनेक कारणे सांगून रुग्णालयांनी आजीला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आजीची प्रकृती झपाट्याने खालावली. उपचाराअभावी तडफडणाऱ्या आजीचा गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास कारमध्येच मृत्यू झाला. या घटनेने हतबल झालेला नातू शैलेश कोरे याने त्याला आलेले अनुभव व्हिडिओद्वारे कथन केले. त्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सांगलीतील आरोग्य यंत्रणांचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.