पीएम केअर फंडात मुस्लीम राष्ट्रीय मंचातर्फे भरगोस मदत

10 Sep 2020 12:04:33
1_1  H x W: 0 x
 
 

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीएम केयर फंडमध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने भारतीय मुस्लिम समुदायकडून एकत्रित केलेल्या १० लाख ५१ हजारांचा निधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सोपविण्यात आला. मंचाचे राष्ट्रीय संयोजक मो. अफजल आणि प्रोफेसर डॉ. शाहिद अख्तर यांच्या नेतृत्वात हा निधी देण्यात आला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहीले आहे. 

 
प्रतिनिधी मंडळात मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संघटन संयोजक गिरीश जुयाल, राष्ट्रीय सह-संयोजक डॉ. इम्रान चौधरी, महिला प्रकोष्ठ संयोजिका शाहीन परवेझ, डॉ. माजीद अली तालीकोटी, भारत रावत आणि मौलाना सुहैब कासमी आदींचा सामावेश होता. मंचाचे राष्ट्रीय संयोजक मो. अफजल म्हणाले, "कोरोना महामारीच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पीएम केअर फंडाची स्थापना केली. त्यात आपले योगदान देण्याचे आवाहन मुस्लीम मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी मुस्लिमांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यकर्त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि गोवा-गुजरात ते असम-मणिपूरपर्यंत असंख्य बांधवांशी संपर्क करून हा निधी गोळा केला आहे. 

दरम्यान, या मदतीचा स्वीकार करत जे. पी. नड्डा यांनी मुस्लीम मंचाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. मुस्लीम समाजाच्या सहकार्याचे स्वागत केले. मो. अफजल यांनी यावेळी माहिती देतांना सांगितले की, 'मुस्लीम राष्ट्रीय मंच गेल्या १८ वर्षापासून भारतीय मुस्लीम समुदायाला राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय इंद्रेश कुमार यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे. स्वतंत्र भारताततील मुस्लीमांतर्फे मुस्लीम जनसमुदायासाठी चालवण्यात आलेले हे एक अनोखे आंदोलन आहे. देशभरातील २५ राज्यांमध्ये ३५० जिल्ह्यांत मंचाच्या २५०० शाखा आणि असंख्य कार्यकर्ते आहेत. देशभक्ती, मदरसा शिक्षण, महिला सक्षमीकरण, गो सेवा, अशा अनेक मुद्द्यांवर मंचाचे कार्यकर्ते जनजागरण करीत आहेत.


अलीकडे तीन तलाक, कलम ३७० आणि ३५ अ, श्रीराम जन्मस्थान अयोध्या विवाद या सारख्या मुद्द्यांवर मंचाने वेळोवेळी राष्ट्रहीत लक्षात घेत योग्य भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून मुस्लीम समाजाने या मुद्द्यांवर सरकारचा तसेच न्यायालयांचा निर्णय सहजपणे मान्य केला हे सगळ्या देशाने अनुभवले आहे. ९ जून २०२० पासून मंचाने 'हम मजबूत-मजबूत भारत' शपथ अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत तीन लाखाहून अधिक मुस्लीम नागरिकांनी आत्मनिर्भर बनविण्यात सहयोग देण्याची शपथ घेतली आहे. 

या मोहिमेचे घोषवाक्य आहे : “हिन्दुस्तानी अपनाएंगे-भारत को बनाएंगे; कट्टरता भगाएंगे-नफरत को मिटाएंगे; ना भड़केंगे-ना भड़काने देंगे; एक हिन्द जय हिन्द-जोर से गुंजाएंगे”. दोन ऑक्टोबर पर्यंत हे अभियान चालू राहणार असून या काळात पाच लाख स्लिमांपर्यंत पोहचण्याचे मंचाचे लक्ष्य आहे. भारतीय मुस्लीम समुदात हा नेहमीच देशहिताच्या पूर्ण शक्तीनिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि सहकार्य करील असे आश्वासन यावेळी अफजल यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

Powered By Sangraha 9.0