बांधकाम बेकायदा असल्यामुळेच कंगनाच्या कार्यालयावर कारवाई!

    दिनांक  10-Sep-2020 19:45:23
|
BMC_1  H x W: 0


मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र; पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

मुंबई : कंगना राणावत हिच्या पालीहिल येथील कार्यालयात पालिकेची परवानगी न घेता बांधकाम बेकायदा बांधकाम केल्यामुळेच कारवाई केली असल्याचे प्रतिज्ञापत्र गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. दरम्यान, कंगनाच्या वकिलांनी आपली बाजू मांडण्यासाठी तीन दिवसांचा मागितला मात्र उच्च न्यायालयाने याबाबतची सुनावणी येत्या २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. शिवाय पुढील आदेश देईपर्यंत कारवाईवरील स्थगिती कायम ठेवत कंगनालाही कारवाईच्या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती न करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पालीहिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने बुधवारी कारवाई केली. बेकायदा बांधकामाबाबत पालिकेकडून कंगनाला २४ तासांत उत्तर देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत कंगनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने बुधवारी १० वाजल्यापासून कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. मात्र याच वेळी कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कारवाईला स्थगिती मिळविली. यावेळी १० सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवून पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार गुरुवारी पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून कंगनाच्या कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम असल्यामुळेच कारवाई केली असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, कंगनाच्या वकिलांच्या वतीने आपले मुद्दे मांडण्यासाठी वेळ मागण्यात आली. यावेळी न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलल्याचे जाहीर केले.
निवासी जागेचा व्यावसायिक वापर

कंगनाचा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी पालिकेची रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम ३५४ (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही. मात्र कंगनाने अशी परवानगी घेतली नाही. याशिवाय बंगल्यामध्ये चटईक्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून एकूण १४ ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.