देशात ‘योगी’च सर्वोत्कृष्ट !

09 Aug 2020 20:27:41

cm yogi best cm_1 &n


उत्तर प्रदेशसारख्या अफाट लोकसंख्येच्या आणि तुलनात्मकदृष्ट्या विकासाचा वारसा नसलेल्या राज्याचे योगी आदित्यनाथ २४ टक्के मतांसह देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले, तर प्रगतीचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसह सातव्या क्रमांकावर राहिले आणि ठाकरे सरकारच्या अपयशी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली.


‘इंडिया टुडे’ आणि ‘कार्वी इनसाईट्स’ने देशभरात १५ ते २७ जुलै या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्वोत्कृष्ट ठरले. सलग तिसर्‍यांदा योगी आदित्यनाथ ‘इंडिया टुडे’ आणि ‘कार्वी इनसाईट्स’च्या सर्वेक्षणात अव्वल क्रमांकावर आले असून संस्थेने त्यांचा ‘बेस्ट परफॉर्मिंग सीएम’ असा गौरवदेखील केला. उत्तर प्रदेशसारख्या अफाट राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्यावर पदभार स्वीकारल्यापासून ते आतापर्यंत विरोधकांनी सातत्याने टीका केली. मात्र, विरोधकांच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता जनतेने योगी आदित्यनाथ हेच आपली पहिली पसंत असल्याचे या सर्वेक्षणातून दाखवून दिले. योगी आदित्यनाथ यांना गतवेळच्या १८ टक्क्यांत सहा टक्क्यांची वाढ होऊन यंदा २४ टक्के मते मिळाली, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ टक्के मतांसह दुसर्‍या क्रमांकावर आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ११ टक्के मतांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा प्रभाव नेमका किती, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि त्यात योगी आदित्यनाथच उत्तम कारभार करत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, उत्तर प्रदेशामधील कायदा-व्यवस्थेपासून संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थातंत्राबाबतची योगी आदित्यनाथ यांची भूमिका आणि काम करण्याच्या पद्धतीने जनतेवर प्रभाव पाडल्याचे व जनतेने ते मोकळ्या मनाने स्विकारल्याचे यातून दिसते. विशेष म्हणजे, कोरोना महामारीचा संसर्ग, स्थलांतरित मजुरांची घरवापसी व तरुणांना रोजगार, कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर व अन्य हत्याकांड, अपहरण वगैरे प्रकरणांवरुन प्रियांका गांधी-काँग्रेस आणि अखिलेश यादव-समाजवादी पक्ष सातत्याने टीका टिप्पण्या करत असताना व समाज माध्यमांवर योगी आदित्यनाथ यांना अपयशी राज्यकर्ता म्हणून सिद्ध करण्याची मोहिम चालवलेली असताना, हे सर्वेक्षण झाले आणि त्यात योगी आदित्यनाथ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.




प्रखर राष्ट्रनिष्ठ व हिंदुत्वनिष्ठ नेतृत्व अशी योगी आदित्यनाथ यांची ओळख आहेच, पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्यापासून त्यांनी उत्तर प्रदेशला ‘उत्तम प्रदेश’ करण्यासाठी कंबर कसली. दररोज १८ -१८ तास काम करुन उत्तर प्रदेशाला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. राज्यातील आतापर्यंतच्या काँग्रेस व सप-बसप सरकारांनी केवळ जातीय व धार्मिक समीकरणे जुळवत मुस्लिमांसह विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले. तथापि, हा अनुनयदेखील संबंधित समुदायांच्या प्रगतीचा नव्हे तर त्यांच्या जातीय व धार्मिक भावनांना आंजारण्या-गोंजारण्याचा व चिथावण्याचाच होता. त्यातून राज्याच्या उन्नतीचा रस्ता तयार होत नव्हता व त्यामुळेच उत्तर प्रदेशची ओळख मागास राज्य अशीच झाली. तसेच गुन्हेगारी फोफावली व रोजगाराची उपलब्धता नसल्याने कित्येकांनी अन्य ठिकाणी पलायन करण्याला प्राधान्य दिले. योगी आदित्यनाथ यांनी मात्र, सत्तेत आल्यापासून राष्ट्रनिष्ठा व हिंदुत्वनिष्ठा जपताना तुष्टीकरणाचे राजकारण संपवले आणि जातीय-धार्मिक मुद्द्यांत गुरफटलेल्या राज्याच्या विकासासाठी अनेक योजनांची आखणी, अंमलबजावणी केली. त्यात ‘वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट’ आणि ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’सारखी योजना पथदर्शक ठरली. कोरोनामुळे चीनमधून बाहेर पडणार्‍या उद्योगांना आकर्षित करण्यासाठीही योगी आदित्यनाथ यांनी मेहनत घेतली, जागतिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व अधिकाधीक गुंतवणूकीसाठी प्रयत्न केले. दरम्यान, सत्तेवर आल्यापासूनच योगी आदित्यनाथ यांनी हत्या, अपहरण, दरोडा, लुटमार आदी गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्यांविरोधात कठोर भूमिका घेत बाहुबलींची गुंडगिरी मोडीत काढली. कोरोना काळाचा विचार केला तर त्यावर नियंत्रणासाठीही योगी आदित्यनाथ यांनी उत्तम काम केले. देशभरात ‘तबलिगी’ जमातीच्या सदस्यांनी धुमाकूळ घातलेला असताना उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली. कोरोनाला रोखण्यासाठी ‘हॉटस्पॉट’ मॉडेल राबवले, तसेच ‘क्वारंटाईन सेंटर्स’ उभारणी, त्यांचे जिओ टॅगिंग, संशयितांचे पूल टेस्टिंग, स्थलांतरितांचे जागेवरच स्क्रीनिंग केले. परिणामी सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यातही कोरोनाचे संक्रमण कमीच राहिले. जनतेने योगी आदित्यनाथ यांच्या याच कारभाराला पसंती दिली असून आम्ही मुख्यमंत्र्याच्या पाठीशी असल्याचे सांगितले, हे स्पष्ट होते.



दरम्यान, ‘इंडिया टुडे’-‘कार्वी इनसाईट्स’च्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे सात टक्क्यांसह सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. वस्तुतः स्थगितीसम्राट उद्धव ठाकरे यांना भारतातील किंवा जगातीलच नव्हे तर ब्रह्मांडातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्याचा किताब त्यांच्या चाहत्यांनी ते खुर्चीवर बसल्यापासूनच दिलेला आहे. किंबहुना वडिलांना दिलेल्या कथित वचनपूर्तीसाठी जनतेच्या विश्वासाचा कोथळा काढल्यानेदेखील त्यांना हा सन्मान अगदी सुरुवातीपासून मिळालेला आहे. सोबतच कोरोनावर कॅरम-गाण्याच्या भेंड्या आणि कोमट पाण्याचा उपाय सांगत जागतिक आरोग्य संघटनेला मार्गदर्शन करणारे सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या खुशमस्कर्‍यांनी उद्धव ठाकरेंचा गौरव केलेला आहे. अर्थात, ही झाली अलौकिक जगातली किंवा ठाकरे सरकारच्या मनोराज्यातली परिस्थिती, मात्र, सर्वसामान्यांच्या दृष्टीने वस्तुस्थिती तशी नाही आणि म्हणूनच उद्धव ठाकरे सातव्या क्रमांकावर राहिले. इथे उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्याशी तुलना करता उद्धव ठाकरे यांना मिळालेले राज्य देशातील सर्वोत्तम आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग, व्यापार, रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती, दळणवळण आदी पायाभूत सुविधा प्रगत व विकसित आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्यापासून आपल्याला मिळालेल्या वारशाचा वापर करत राज्याला आणखी विकासाकडे घेऊन जाण्यासाठी किंवा कोरोनाकाळात त्यावर मात करण्यासाठी भरीव कार्य केल्याचे कधीही दिसले नाही. उलट देवेंद्र फडणवीस सरकारच्या अनेकानेक योजना बंद करण्याचा धडाका त्यांनी लावला, तसेच भाजपवर टीका करण्यालाच ठाकरे सरकारने राज्यकारभार समजले. ते कमी म्हणून की काय फेसबुकीय गप्पांबरोबर मुलाखतीचा खेळही त्यांनी रंगवला. मात्र, जनतेच्या छोट्या छोट्या मागण्या पूर्ण करण्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. कोरोना काळाचेच उदाहरण घेतले तर ठाकरे सरकारने राज्यातील आरोग्य सुविधेचा पार बोजवारा उडवून दाखवला. कोरोनाचा फैलाव तर वाढलाच पण पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध करुन न दिल्याने अनेक ठिकाणी रुग्णवाढीबरोबरच रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही वाढले.


तबलिगी जमातवाल्यांना अभय, साधुंचे हत्याकांड, मंत्र्याच्याच बंगल्यावर तरुणाला मारहाण, सुशांत सिंह राजपूत मृत्यू-हत्या-आत्महत्या प्रकरण व राज्य सरकारचे त्यात नको तितके लक्ष घालणे, पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यातली असमर्थता, यावरुनही हे सरकार कुप्रसिद्ध झाले. जनतेच्या ‘लॉकडाऊन’ काळातील वीजबिल माफी/सवलत, दूध दरवाढ, शेतकर्‍यांना खते व बी-बियाणांचा सुरळीत पुरवठा या साध्या मागण्याही ठाकरे सरकार पूर्ण करु शकले नाही. ठाकरे सरकारच्या अपयशाची ही काही लक्तरे असून यादी अजूनही अपुर्णच आहे. मात्र, राज्यातली जनता सरकारचा हा सर्व काही उद्ध्वस्त करणारा कारभार पाहत असून आताचे सर्वेक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लोकप्रियता किती तळाला गेली याचेच निदर्शक आहे. अर्थात यातून ते काही शिकतील, याची शक्यता नाहीच, कारण त्यांनी स्वतःच स्वतःला सर्वोत्कृष्टचे प्रमाणपत्र दिलेले आहे.
Powered By Sangraha 9.0