ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय?? : निलेश राणे

08 Aug 2020 10:59:38
Nilesh rane_1  

सततच्या नियमबदलांमुळे चाकरमान्यांना त्रास; भाजप नेते निलेश राणे राज्य सरकारवर बरसले

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नवनवे नियम घालून देत आहे किंवा त्यात परिस्थिती अनुरूप बदल देखील केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात पडत आहेत. गणपती निमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना सततच्या नियमबदलामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


/एकीकडे राज्य सरकार कोकणात जाणाऱ्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी १४ दिवसाचा क्वारंटाईन नियम लावत आहे. ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय??’, असे टीकास्त्र त्यांनी राज्य सरकारवर सोडले आहे.







कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने क्वारंटाईन कालावधीत सवलत दिली होती. १४ दिवसांवरून तो कालावधी १० दिवसांवर आणला होता. मात्र त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी १४ दिवसाचा क्वारंटाईनचा नवा नियम मुंबई महापालिकेने लावला आहे. राज्य सरकारच्या या नियमबदलांमुळे चाकरमानी संतापले आहेत.


त्या त्या भागातली परिस्थिती पाहून, तिथल्या जिल्हा प्रशासनाने कोरोनासंबंधातली नियमावली तसेच लॉकडाऊन संबंधातील नियम आखावेत, असे राज्य सरकारने सांगितले होते. परंतु महाराष्ट्रातल्या अनेक भागांतली परिस्थिती वेगवेगळी असल्याने नियम देखील बदलत आहेत. याचाच त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो आहे.









Powered By Sangraha 9.0