ज्ञानेश पुरंदरे : वंचित समाजगटातील युवकांसाठीचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व

    दिनांक  08-Aug-2020 23:18:11
|

sf_1  H x W: 0

 


 


 


पुण्यातील ज्ञानेश पुरंदरे हे समाजसमर्पित व्यक्तिमत्व नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. पुण्यातील ‘स्वरूपवर्धिनी’ संस्थेचे पूर्ववेळ काम करणारे कार्यकर्ते आणि ओघवत्या वाणीने शिवचरित्र मांडणारे व्याख्याते, म्हणूनही ते अनेकांना सुपरिचित होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा श्रद्धांजलीपर लेख...

 


 


पुणे शहराच्या पूर्व भागातील नागरी वस्ती-झोपडपट्टी परिसरातील मुलामुलींच्या विकासासाठी झटणारी ‘स्वरूपवर्धिनी’ ही पुण्यातील एक प्रमुख संस्था आहे. नियमित दैनंदिन शाखांच्याद्वारे निम्न शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्तरातील चुणचुणीत मुले-मुली निवडून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणे, त्यांच्यावर देशभक्तीचे व समाजसेवेचे संस्कार रुजविणे, ही ‘स्वरूपवर्धिनी’ची कार्यपद्धती आहे. स्वतः ज्ञानेश पुरंदरेही अशाच बिकट सामाजिक व आर्थिक परिस्थिती असणार्‍या समाजगटातून ‘स्वरूपवर्धिनी’च्या शाखेत येऊन दाखल झाले होते. महानगरपालिकेतील शाळांमधून हुशार मुले-मुली निवडून त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यानिकेतन शाळा चालविण्यात येतात. अशाच महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे ते एक विद्यार्थी होते. पुढे त्यांनी मॉडर्न हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थीदशेत असताना एका परीक्षेत तर चक्क शिक्षकांच्याच मदतीने अनेकविध सहविद्यार्थी कॉपी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी कोवळ्या वयातील ज्ञानेशने त्यास विरोध करून आपले वेगळेपण दाखवून दिले होते.
 

पुढे अभियांत्रिकी पदविकेच्या अभ्यासक्रमात ते महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर चार वर्षे त्यांनी ‘बजाज ऑटो’च्या संशोधन व विकास विभागामध्ये नोकरीही केली. पण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना त्यांच्यावर ‘स्वरूपवर्धिनी’च्या माध्यमातून झालेले समाजसेवेचे संस्कार त्यांना स्वस्थ बसू देईना. नोकरीत त्यांचे मन रमेना. त्यामुळेच त्यांनी १९९६ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला व ते ‘स्वरूपवर्धिनी’चे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. अगदी बेताची आर्थिक परिस्थिती असतानासुद्धा चांगल्या पगाराची नोकरी सोडून सामाजिक कार्यात झोकून देण्याचा ऐन तारुण्यातील त्यांचा निर्णय खूपच धाडसी होता. ज्ञानेशचे वडील घरात एकटेच कमावणारे होते व ते शासनाच्या फोटोझिंको छापखान्यात खिळे जुळविण्याचे कामगार म्हणून काम करत. घरात गृहिणी असणारी आई व धाकटा भाऊ महेश. पुण्यातील कसबा पेठेत एका अत्यंत छोट्या खोलीत हे कुटुंब राहात होते. घरच्यांचा विरोध पत्करून ज्ञानेशने हा कठोर निर्णय घेतला. ‘स्वरूपवर्धिनी’चे संस्थापक किशाभाऊ पटवर्धन यांच्यासोबत काम करण्याची त्यांना एक तपाहून अधिककाळ संधी मिळाली. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व खर्‍या अर्थाने घडत गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही ते स्वयंसेवक होते. त्यातूनही त्यांना देशसेवेचे बाळकडू मिळाले होते.
 
‘स्वरूपवर्धिनी’मधील ‘वर्धक’ हा केंद्रबिंदू
 

 

 


‘स्वरूपवर्धिनी’च्या शाखांमधील शालेय मुला-मुलींशी त्यांचे असणारे सहजभावाचे, आत्मीयतेचे नाते हे त्यांचे वेगळेपण. ते त्यात मनापासून रमणारे होते. वंचित गटातून येणार्‍या या मुलामुलींच्या घरच्या कौटुंबिक प्रश्नांची त्यांना जाण असल्याने विशेष आस्था होती. स्वतःच्या घरातील अनुभवलेली बिकट परिस्थिती हे त्याचे कारण होते. ही मुले संस्कारित व्हावीत, त्यांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे, यातच ते स्वतःचा आनंद शोधणारे होते. या मुला-मुलींच्या महाविद्यालयीन प्रवेशातही त्यांना लक्ष घालावे लागे. कारण, या मुलांचे पालक अल्पशिक्षित होते. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी ते विविध शिबिरे, अभ्यासदौरे यांचे आयोजन करीत. गड-किल्ल्यावर आवर्जून सहली काढीत. त्यांना शिवचरित्र सांगत. यातून शेकडो युवक त्यांच्याशी जोडले गेले. अनेकांचे त्यांच्याशी जीवाभावाचे नाते तयार झाले. यातून अनेक युवकांच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयाचेही ते आधारस्तंभ बनले. पदवी पूर्ण झालेल्या युवकांच्या नोकरीचीही ते चिंता वहात. युवकांबरोबरच्या नात्यांची श्रीमंती हे खरे त्यांचे वैभव बनले. सदैव हसतमुख व उत्साही असे त्यांचे व्यक्तिमत्वही युवकांनाच काय, तर अनेकांना हवेहवेसे वाटणारे असे होते. पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील ‘स्वरूपवर्धिनी’ची शिस्तबद्ध ढोलताशांची पथके अनेकांचे लक्ष वेधून घेत असतात. ही पथके बसविणे, त्यांचा उत्तम सराव करून घेणे व या युवक-युवतींच्या पथकांबरोबर स्वतः उत्साहाने मिरवणुकीत उशिरापर्यंत सहभागी होणे, असे करताना अनेकांनी त्यांना पाहिले आहे, अनुभवले आहे. तरुण वयोगटाबरोबर समरस होण्याची मानसिकता त्यांनी स्वतः प्रौढ वयोगटात पदार्पण करतानाही सहजपणे जोपासली होती, कमावली होती ही सोपी बाब नव्हे!
 

संघटनाचे एकक – कुटुंब
 

 

 


वर्धकापुरते ‘स्वरूपवर्धिनी’चे काम मर्यादित न राहता, ते त्याच्या संपूर्ण कुटुंबापर्यंत पोहोचले पाहिजे, हा किशाभाऊ पटवर्धन यांचा आग्रह ज्ञानेशनेही लावून धरला. घर जोडणे म्हणजे घरातील प्रत्येक माणूस जोडणे व आपण त्याच्या घराचा एक भाग बनणे, हा किशाभाऊंचा आग्रह असे. वेळप्रसंगी वर्धकाच्या कुटुंबाच्या कौटुंबिक समस्याही आपल्या मानून सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यामुळे काही प्रसंगामध्ये दुभंगणारी कुटुंबेही वाचली, सावरली. जातीपातीच्या वास्तवाच्या भिंतीही त्याने हळुवार, पण ठामपणे मोडून काढल्या. ‘वर्धिनी’तून मिळणारे अल्पमानधनही तो कुटुंबासाठी गरजेपुरताच खर्च करायचा. त्यातूनही अडचणीत आलेल्या अनेकांना प्रासंगिक मदत करायचा. वैयक्तिक आर्थिक मदत परत येण्याची शक्यता नसतानाही तो अशांना मदत करायचा!
 

स्वतःला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमाही जवळ बाळगण्याचा मोह त्याने कधी बाळगला नाही, त्या ‘स्वरूपवर्धिनी’त जमा करून टाकत असे. स्वतःच्या कुटुंबातील अडचणीच्याप्रसंगी तो कधी घरच्यांशी फटकून वागला नाही, तर त्याने घरीही कर्तेपणाची भूमिका निभावली, निःशब्दपणे! मग तो वडिलांना अखेरच्या आजारपणात झालेला अन्ननलिकेचा कर्करोग असो की भावाचा ऐन तारुण्यात अचानकपणे उद्भवलेला जीवघेणा आरोग्याचा प्रश्न असो. कणखर व दृढनिश्चयी भासणार्‍या ज्ञानेशचे हे वेगळे, अपरिचित असे हळवे व मृदू रूप होते.
 
अभ्यासपूर्ण शिवचरित्राची मांडणी
 

 

 


ज्ञानेश पुरंदरे हे उत्तम असे वक्ते होते. स्वतःचे वक्तृत्व त्यांनी प्रयत्नपूर्वक घडविले होते. छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्यांचा खास आत्मिक जिव्हाळ्याचा विषय होता. अत्यंत ओघवत्या भाषेत शिवचरित्र सांगून श्रोतृवर्गाला मंत्रमुग्ध करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. तरुण वयात त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्यातही काही काळ काम केले होते. कदाचित त्यातून त्यांचे हे स्पुल्लिंग जागृत झाले असावे. शिवचरित्रातील प्रसंग रसाळ भाषेत रंगवून सांगताना, श्रोत्यांपुढे तो प्रसंग अक्षरशः जीवंत करण्याचे कसब त्यांच्यापाशी होते. मग ती सिंहगडावरची लढाई असो की पावनखिंडीची लढाई, महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा प्रसंग असो की लाल महालातील शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग असो. अशा सर्व घटनांची, शिवकालीन इतिहासाची ते तारीख, तिथी, वारानुसार मांडणी करत.
 

सलग दहा दिवस शिवचरित्रावर अभ्यासपूर्ण मांडणी करू शकणार्‍या मोजक्या वक्त्यांपैकी ते एक होते. बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे यांचा वारसा पुढे चालविणारे होते. शिवचरित्राच्या मांडणीसाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून व्याख्यानांची निमंत्रणे येत. अशी शेकडो व्याख्याने त्यांनी शिवजयंती व अन्य निमित्ताने दिली आहेत. काही व्याख्याने तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरही दिली. १९९३च्या लातूर भूकंपामध्ये ते ‘स्वरूपवर्धिनी’च्या गटाबरोबर महिनाभर मदतकार्यासाठी गेले होते. त्यावेळी दिवसभराचे मदतकार्य संपल्यावर ते सलग दहा दिवस गावात शिवचरित्राची मांडणी करत होते. चक्क गावात मंडप टाकून हा व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. शिवचरित्राबरोबरीने विवेकानंद व सावरकर हेही त्यांचे अभ्यासाचे विषय होते. त्यावरही ते व्याख्याने देत. अरुणाचल प्रदेशातल्या तवांग येथे भारतीय सैन्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे ठरविले, तेव्हा उत्साहाने ज्ञानेश पुरंदरे तेथे गेले. आपल्या शिवचरित्राने व पोवाड्याने तेथील सैनिकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. समुद्रसपाटीपासून सुमारे आठ हजार फूट उंचावर हिमालयाच्या युद्धभूमीवर सदैव दक्ष असणार्‍या मराठी सैनिकांसाठी तर ही अनोखी पर्वणीच होती.
 
ज्ञानेश पुरंदरे यांचे वक्तृत्व हे काही फक्त शिवचरित्रापुरते मर्यादित नव्हते, तर ठायी ठायी व्यक्त होणारे होते. मग ते कार्यकर्त्यांसमवेत वारंवार होणार्‍या चर्चा-बैठकांतून कधी व्यक्त होत असे, तर कधी ‘स्वरूपवर्धिनी’तील एखाद्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलन अथवा वक्ता परिचयाची भूमिका पार पाडताना व्यक्त होत असे. परदेशात विशेषतः अमेरिकेत किशाभाऊंनी त्यांना आवर्जून आपल्यासोबत निधी संकलनासाठी नेले होते. त्यावेळी त्यांनी मराठी सोबतच हिंदी, इंग्रजी भाषेत ‘स्वरूपवर्धिनी’ची मांडणी करण्याचा सराव केला होता. अलीकडे दुबई, शारजा येथे देखील निधी संकलनासाठी ते गेले असता त्यावेळेसही तो उपयोगी पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात दरवर्षी होणार्‍या संघ शिक्षा वर्गातही ते कधी वक्ते, म्हणून तर कधी शिक्षक म्हणून आवर्जून जात. संघ ही मातृसंस्था आहे, अशी त्यांची धारणा दृढ होती.
 
बदलत्या काळात ‘स्वरूपवर्धिनी’ तील प्रकल्प स्वरूपातील कामांमध्येही पुरंदरे यांना लक्ष घालावे लागत होते. वेळोवेळी संस्थात्मक वाढत्या कामांचीही जबाबदारी घ्यावी लागत होती. गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वरूपवर्धिनी’च्या कार्यवाहपदाची महत्त्वाची भूमिका ते पार पाडत होते. अगदी अलीकडच्या कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मध्ये हातावर पोट असणार्‍या लोकांसाठी मदतकार्य करण्यात ‘स्वरूपवर्धिनी’चा मोठा पुढाकार होता. या मदतकार्याचेही त्यांनी नेतृत्व केले. दुर्दैवविलास म्हणजे, याच कोरोनाने त्यांना पुढे अचानकपणे गाठले. रक्तदाब व मधुमेहामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अपुरी पडली आणि आठवडाभराची झुंज अपयशी ठरली. अखेर त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अनेकांसाठी हे अनपेक्षित होते. पन्नाशीत पदार्पण करत असतानाचा त्यांचा हा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. वंचित समाजगटातील तरुणाईला आपलसं करणारे आश्वासक व उमदे व्यक्तिमत्व अकाली हरपले. ‘विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे’ हे ‘स्वरूपवर्धिनी’चे ध्येयवाक्य ज्ञानेश पुरंदरे शब्दशः जगले आणि समाजासाठी, देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले! ज्ञानेशच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ व ‘स्वरूपवर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “ज्ञानेश पुरंदरे यांचे ‘स्वरूपवर्धिनी’साठीचे समर्पण, निष्ठा व योगदान अनन्यसाधारण होते. त्याची राहून राहून आठवण येत राहाणार.” अनेकांच्या अव्यक्त व मूकभावनाही अशाच आहेत!
 

 

 


- विवेक गिरिधारी

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.