चिनी गुप्तहेरांचा सापळा - भाग-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2020   
Total Views |


China_1  H x W:



चीनची गुप्तहेर यंत्रणा इतर देशांहून पुष्कळशी वेगळी आहे. चीन परदेशांमध्ये गोपनीय माहिती काढण्यासाठी केवळ एमएसएसचाच वापर करतो असे नाही; त्याखेरीज तिथे असलेल्या अनेक चिनी सरकारी संस्थांचाही वापरही करत असतो. ते केवळ व्यावसायिक गुप्तहेरांचाच वापर करतात असे नाही; तर अनेक अव्यावसायिक गुप्तहेरांचाही वापर करत असतात.



देशाला सुरक्षित करण्यात मदत


अलीकडेच भारताने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. त्यांचा वापर भारतीयांची माहिती किंवा ‘बिग डेटा’ गोळा करण्यासाठी केला जात होता. भारताने चिनी गुप्तचर यंत्रणेपासून सुरक्षित राहण्यासाठी काही पावले उचलली आहेत, पण अद्यापही काही गोष्टी करणे नितांत गरजेचे आहे.


ज्यांच्याकडे चिनी मोबाईल आहे किंवा ज्यांच्या मोबाईलमध्ये अजूनही काही चिनी अ‍ॅप्स डाऊनलोड केलेली आहेत किंवा ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची चिनी इलेक्ट्रॉनिक साधने म्हणजे लॅपटॉप वगैरे आहे, त्यांच्या घरामध्ये चिनी गुप्तहेरांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर चीनची नजर असू शकते. आपण सरकारमध्ये किंवा इतरत्र कुठल्याही महत्त्वाच्या जागी असू, तर ते खूपच जास्त नुकसानीचे होऊ शकते. कारण, यामुळे महत्त्वाची, गोपनीय माहिती चीनकडून चोरली जाऊ शकते. म्हणूनच सगळ्या प्रकारच्या चिनी मोबाईल अ‍ॅप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर थांबवणे गरजेचे आहे.

चिनी गुप्तहेर संस्था ‘मिलिटरी सिक्रेट सर्व्हिस’ (MSS)


पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि ‘आयएसपीआर’ याविषयी भारतीयांना पुष्कळ माहिती आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’विषयी आपल्याकडे बरीच चर्चा होते; परंतु चीनच्या गुप्तहेर संस्थेविषयी फार बोलले जात नाही. चीनच्या गुप्तहेर संस्थेला ‘एमएसएस’ म्हणजे ‘मिलिटरी सिक्रेट सर्व्हिसअसे म्हटले जाते. या संस्थेच्या मदतीने चीन वेगवेगळ्या देशांत गुप्तहेर ऑपरेशन्स करत असतो. चीनची गुप्तहेर यंत्रणा इतर देशांहून पुष्कळशी वेगळी आहे. ते केवळ व्यावसायिक गुप्तहेरांचाच वापर करतात असे नाही; तर अनेक अव्यावसायिक गुप्तहेरांचाही वापर पण करत असतात. जगभरातील चिनी कंपन्यांमध्ये गुप्तहेर खात्यातील एक व्यक्ती हमखास असते. आजची स्थिती पाहता, चीनच्या या गुप्तचर खात्याविषयी जाणून घेणे सर्वांसाठीच गरजेचे आहे. चीनची गुप्तहेर संस्था अत्यंत गुपचुपणे काम करत असतात. त्यामुळे त्याविषयी भारतीयांना फारशी माहिती नाही.

वास्तविक, चिनी गुप्तचर संस्था कशा प्रकारे काम करते, त्यांना जगामध्ये आणि भारतामध्ये आजवर किती यश मिळाले आणि त्यांच्या कारवाया भारतामध्ये थांबवायच्या असतील, तर नेमके काय करायला हवे, याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपण जिथे चिनी नागरिकांच्या संपर्कात येतो, त्यावेळेस त्यांच्या वरती लक्ष ठेवून देशाला सुरक्षित करण्यात मदत करू शकतो.


चिनी गुप्तहेर संस्थेवर सतत संशोधन करणे गरजेचे


गेल्या दोन वर्षांमध्ये चिनी गुप्तहेर संस्थेवर अनेक पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत. यामध्ये अमेरिकन लेखकाने लिहिलेले एक पुस्तक अत्यंत संशोधन करुन लिहिले गेले आहे. या लेखातील पुष्कळशी माहिती त्या संशोधनातून घेतली गेली आहे. याशिवाय इंग्लंड, युरोपमधल्या अनेक देशांचे चीनच्या गुप्तहेर संस्थांवर लक्ष आहे. यातून विविध पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्यामध्ये सुद्धा नेमके काय करण्यात आले, यावर महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे. अर्थात, या महत्त्वाच्या विषयावर भारतामध्ये सुद्धा सतत संशोधन करणे गरजेचे आहे. कारण, चीन आपले गुप्तहेर ऑपरेशन्स करण्याच्या पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल करत असतो. त्यामुळे त्यांना पकडणे आणि थांबवणे हे अतिशय आव्हानात्मक असते.

चिनी नागरिक, संस्था यांना गुप्तहेर माहिती मिळवणे बंधनकारक


चिनी गुप्तहेर संस्था ‘रिसर्च स्कॉलर्स’ म्हणजे ‘अ‍ॅकॅडमिक स्कॉलर’ विद्यार्थ्यांचाही याकामी वापर करतात. कारण, हे विद्यार्थी भारतात दोन-तीन वर्षेच असतात. त्यांच्यावर फारसे कोणी लक्ष देत नाहीत. आपला रिसर्च संपल्यावर ते परत जातात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना पकडणे तसे सोपे नसते. चीनने आपल्या कायद्यामध्ये एक मोठा बदल केलेला आहे. यानुसार परदेशात काम करणारा कोणीही चिनी नागरिक किंवा संस्था यांना चीनसाठी गुप्तहेर माहिती मिळवणे बंधनकारक झाले आहे. तेथील कायद्याच्या ‘कलम १४’ नुसार ही सक्ती करण्यात आली आहे.

अव्यावसायिक गुप्तहेरांचा वापर


चीनची गुप्तहेर यंत्रणा इतर देशांहून पुष्कळशी वेगळी आहे. चीन परदेशांमध्ये गोपनीय माहिती काढण्यासाठी केवळ एमएसएसचाच वापर करतो असे नाही; त्याखेरीज तिथे असलेल्या अनेक चिनी सरकारी संस्थांचाही वापरही करत असतो. ते केवळ व्यावसायिक गुप्तहेरांचाच वापर करतात असे नाही; तर अनेक अव्यावसायिक गुप्तहेरांचाही वापर करत असतात. उदाहरणार्थ, ज्या चिनी कंपन्या परदेशांमध्ये काम करत असतात, त्यामध्ये चीनच्या गुप्तहेर खात्याचा एक व्यक्ती असतो. तिथून तो सर्व प्रकारच्या उद्योजक जगताला संबंधित माहिती चोरण्याचा/काढण्याचा प्रयत्न करतो. असे म्हटले जाते की, चिनी कंपन्यांमधील गुप्तहेरांनी अमेरिका आणि युरोपमधल्या जागतिक दर्जाच्या वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती चोरून आपले तंत्रज्ञान उभे केले आहे. दुसर्‍या देशातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान चोरणे, त्या देशाकडे असलेल्या महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांविषयी, त्यांच्या विकासाविषयीची माहिती चोरणे यामधे समाविष्ट आहे. अनेकदा ट्रेड सिक्रेट्सचोरली जातात. इंडस्ट्रीयल माहिती चोरी केली जाते आणि चीनला त्यातून मदत केली जाते.

चीनविरोधी कारवायांवर लक्ष


चीनचे त्या त्या देशात दोन-तीन मोठ्या विषयांवर लक्ष केंद्रित असते. एक तर त्या देशांमध्ये कोणी चीनविरोधी कारवाया करत असतील, तर त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते. उदाहरणार्थ, भारतामध्ये हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे तिबेटियन सरकार काम करते. त्यांच्यावर चीनचे नेहमीच लक्ष असते. याशिवाय तैवानचे कोणीही अधिकारी किंवा नागरिक भारतात आले असतील, तर त्यांच्यावरही चीनचे लक्ष असते. तसेच चीनमधील उघूर समाजाचे अल्पसंख्याक लोक किंवा मंगोलियन भारतात येत असतील, तर त्यांच्यावरही चीनचे लक्ष असते. हाँगकाँगमधून भारतात येणार्‍या नागरिकांवरही चीन लक्ष ठेवून असतो. कारण, भारत या चीनविरोधी घटकांना मदत करत असतो, अशी चीनची समजूत आहे.

समाजाच्या मर्म स्थानाचे विश्लेषण


याशिवाय चीन आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवतो. हे विद्यार्थी शिक्षण घेण्याबरोबरच चीनचे गुप्तहेर म्हणून काम करत असतात. त्या विद्यापीठांमध्ये चाललेल्या संशोधनावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. ते संशोधन चोरण्याचा प्रयत्न केला जातो. आज भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये पीएचडी किंवा एम.फिल करण्यासाठी अनेक विषयांवर संशोधन केले जाते. दोन-तीन वर्षांच्या मेहनतीनंतर रिसर्च पेपर किंवा थिसीस प्रकाशित केला जातो. ते चोरण्याचे काम हे विद्यार्थी रुपातील चिनी गुप्तहेर करतात. त्यामुळे तीन वर्षे काम करुन, अभ्यास करुन केलेले संशोधन त्यांना आयतेच हातात मिळते.अर्थात, चीनला तंत्रज्ञान आणि सुरक्षात्मक विषयात विषयावरती झालेल्या संशोधनामध्ये जास्त रस असतो. कारण, त्यामुळे त्यांना भारतीय समाजाच्या मर्मस्थानाचे विश्लेषण करून त्याचा दुरुपयोग करता येतो.

‘एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन’मध्ये टेहळणी


अनेक वेळा खोल समुद्रामध्ये आणि इतर राष्ट्रांच्या ‘एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन’मध्ये चिनी मच्छिमार जहाजे तिथे टेहळणी करत असतात. उदाहरणार्थ, एक चिनी मच्छिमार जहाज भारताच्या पश्चिमी किनारपट्ठीवर सिंधुदुर्गामध्ये पकडले गेले होते. एक मोठे वादळ आल्यामुळे त्याने सिंधुदुर्गाच्या बंदराचा आधार घेतला होता. हे जहाज ३५०० किलोमीटर लांब असलेल्या भारताच्या समुद्रामध्ये मच्छिमारी करण्यासाठी आले होते का? अर्थातच नाही. इतक्या दूर येऊन मच्छिमारी करणे कोणालाही परवडणारे नाही. मच्छिमारी करणे हे केवळ निमित्त होते. या चिनी जहाजाचा मुख्य वापर इलेक्ट्रॉनिक टेहळणी करणे हा होता. ते आपल्या किनारपट्टीवर अशा प्रकारची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत होते; पण त्यामध्ये ते पकडले गेले.

उपाययोजना


चीनच्या नावीन्यपूर्ण हेरगिरीकडून आपल्या गुप्तहेर संस्था काही शिकू शकतात का? आपण पण तशाच प्रकारच्या कारवाया राष्ट्रहिताचे रक्षण करण्याकरता करू शकतो का? तसेच चिनी विद्यार्थ्यांच्या आणि रिसर्च स्कॉलरशिप कामावर लक्ष ठेवले पाहिजे. चीन शस्त्रांची मदत देऊन शेजारी राष्ट्रांमध्ये गुप्तहेर कारवाया करतो. आपण त्याचप्रमाणे कारवाया करू शकत नाही का? शेजारी राष्ट्रांना शस्त्राची मदत करणे, हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा घटक असला पाहिजे. ज्यामुळे केवळ आपण चीनवरती लक्ष ठेवणार नाही, परंतु आपणसुद्धा आक्रमक कारवाया करून त्यांना प्रत्युत्तर त्यांच्याच भाषेमध्ये देऊ शकतो. आपल्या नौदलाला आणि भारतीय तटरक्षक दलाला ‘एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन’मध्ये लक्ष ठेवावे लागेल. त्यामुळे अशा प्रकारची घुसखोरी करून गुप्तहेर माहिती मिळवणे आपल्याला थांबवता आले पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@