‘द्राविडी भाषागट’ - फादर रॉबर्ट काल्डवेलचे कारस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2020
Total Views |


Dravid Language_1 &n




मागच्या काही लेखांपासून आपण ‘Linguistics’ अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेची ओळख करून घेत आहोत. तिच्या आधारे पाश्चात्त्य संशोधकांनी भाषांचे विविध गट बनविले. यात दक्षिण आणि उत्तर भारतातल्या भाषांचे पूर्णपणे वेगवेगळे गट बनविले. असे वेगळे गट दाखवून त्यांच्या द्वारे ‘आर्य’ नावाचे लोक भारताच्या बाहेरून भारतात आले आणि इथल्या मूलनिवासी लोकांवर कुरघोडी करून स्थायिक झाले, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. याचे फलस्वरूप म्हणून त्यांनी भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अवकाशात दुफळी माजवून दिली. परंतु, अशा पद्धतीने उत्तर आणि दक्षिण भारतीय भाषांचे वेगळे गट बनविण्यात कितपत तथ्य आहे, ते जरा समजून घेण्याची गरज आहे.



फादर रॉबर्ट काल्डवेलचा अभ्यास


दाक्षिणात्य भाषांचा भाषाशास्त्राच्या दृष्टीने वेगळा गट बनविण्याचे श्रेय जाते ते फादर रॉबर्ट काल्डवेल नावाच्या एका ब्रिटिश अभ्यासकाला. मुळात हा गृहस्थ भारतात आला, तो ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून. ‘लंडन मिशनरी सोसायटी’ आणि त्याअंतर्गत ‘सोसायटी फॉर द प्रॉपगेशन ऑफ द गॉस्पेल मिशन’ या मिशनरी संस्थेच्या द्वारे भारतात चेन्नईच्या (तत्कालीन मद्रास) एका चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून सन १८३८ मध्ये त्याची नियुक्ती झाली. ख्रिस्ती धर्माचा उपदेश (प्रसार) करण्याच्या कामातली त्याची प्रगती पाहून पुढे मिशनने त्याला ‘बिशप’ म्हणून बढतीसुद्धा दिली. धर्मप्रसाराच्या त्याच्या कामात आवश्यक म्हणून तो तमिळ भाषा शिकला. ती शिकताना त्याने तमिळ आणि हिब्रू भाषेतली काही समान वैशिष्ट्ये शोधून काढली. ‘आर्य’ नावाच्या एका जमातीने मध्य आशियातून उत्तर भारतात स्थलांतर केल्याचे भाषाशास्त्रीय संशोधन त्यापूर्वी प्रसिद्ध झालेले होतेच. त्यातच आपल्या स्वतंत्र तर्कांची भर घालत त्याने अजून एक संशोधन मांडले. त्यावर त्याने ‘A Comparative Grammar of the Dravidian or South-Indian Family of Languages’ (द्राविडी अर्थात दक्षिण भारतीय भाषांचे तुलनात्मक व्याकरण) नावाचे एक पुस्तकही सन 1856 मध्ये प्रकाशित केले. ते संशोधन असे सांगते - दक्षिण भारतातल्या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा यांचा एक स्वतंत्र गट बनतो. तो उत्तर भारतीय भाषांच्या गटाहून भिन्न आहे. उत्तर भारतीय भाषा ज्या ‘इंडो-युरोपीय’ भाषागटाच्या आहेत, त्या मोठ्या गटाहूनही या दक्षिणी भाषा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांची ओळख वेगळी ठेवावी लागते. आर्यांनी स्थलांतर करून उत्तर भारतावर कब्जा केल्यानंतर पुढे अनेक शतकांनंतर त्यांनी दक्षिण भारतातही पाय पसरले. त्याच्या आधी दक्षिण भारतात जी भाषा होती, तिला ‘द्राविड-पूर्व’ (Proto-Dravidian) भाषा असे काल्डवेलने नावही दिले. त्या भाषेचे आजचे रूप म्हणजेच तमिळ भाषा होय.

काल्डवेलचा वैचारिक गोंधळ


काल्डवेलला युरोपीय आणि द्राविडी भाषांमधले फरक सांगायचे होते. त्याच्या नित्य वाचनात बायबलचे पहिले संस्करण अर्थात ‘जुना करार’ (Old Testament) होतेच. पण, त्यातली हिब्रू भाषा आणि दक्षिणेतली तमिळ भाषा यांच्यात काही समानता काल्डवेलच्या लक्षात आल्या. उदाहरणार्थ, मोराला हिब्रू भाषेत ‘तुकी’ म्हणतात. तो ‘तमिळ-पूर्व’ भाषेतील ‘तक्सी’ या शब्दापासून बनला आहे, असे काल्डवेल म्हणतो. हा शब्द आज तमिळ आणि मल्याळम भाषांमध्येही दिसतो. शिवाय तमिळमध्ये यासाठी ‘चिक्की’ हा जो सध्याचा शब्द आहे, तो सुद्धा ‘तक्सी’ मधूनच बनला आहे, असे काल्डवेलचे मत होते. सध्याच्या तमिळ भाषेत ‘शेपूट’ अशा अर्थाने वापरला जाणारा ‘तकाई’ (तोकई/तोगई) हा शब्द प्राचीन तमिळ साहित्यात ‘मोर’ याच अर्थाने वापरला जात असे. तो सुद्धा हिब्रू ‘तुकी’ शब्दाशी साधर्म्य दाखवतो. त्याच्याही पुढे जाऊन काल्डवेलने इतरही युरोपीय भाषांमधले मोराशी समानार्थी शब्द दाखवले. अरेबिक ‘तवस’, ग्रीक ‘तोआस’, लॅटिन ‘पाओ’, इंग्लिश ‘पी’ हे ‘मोर’ या अर्थाचे शब्दसुद्धा ‘तक्सी’ पासूनच बनले आहेत, असे काल्डवेल म्हणतो. चंदनाला हिब्रू भाषेमध्ये ‘अल्गुम/अल्मुग’ म्हणतात, तांदळाला ग्रीक भाषेत ‘ओरीझा’ म्हणतात, आल्याला ‘झिगिबेरी’ म्हणतात - हे शब्दसुद्धा मूळ ‘द्राविड-पूर्व’ भाषेतूनच बनले आहेत, असेही काल्डवेल म्हणतो. यावर स्वत:चे तर्क जोडून त्याने असे मत मांडले की, सध्याच्या दक्षिण भारतीय लोकांचे पूर्वज युरोप किंवा मध्य आशियाच्या आसपासच राहत असत. तिथून स्थलांतर करून उत्तर भारतात आल्यावर पुढे अनेक शतकांनी त्यांनी दक्षिण भारतातही स्थलांतर केले. त्यामुळे साहजिकच युरोपीय भाषांमधली वैशिष्ट्ये दाक्षिणात्य भाषांमध्येही दिसतात. ‘द्राविडी’ आणि ‘इंडो-युरोपीय’ भाषांमधले फरक सांगता सांगता काल्डवेल त्यातली साम्यस्थळे का सांगायला लागला? हा तर चक्क ‘सेल्फ गोल’ झाला!

सोयीस्कर निष्कर्ष


उत्तरेकडची प्रगत दिसणारी ‘आर्य संस्कृती’ तशाच स्वरूपात दक्षिणेत सुद्धा का दिसते? यावर काल्डवेल म्हणतो की, आर्यांनी उत्तर भारतात बस्तान बसवल्यावर त्यांच्यातल्या ब्राह्मण वर्गाने दक्षिणेत स्थलांतर केले. त्यांनी दक्षिणेत आपल्या छोट्या छोट्या वस्त्या बनवल्या. त्यांचा प्रभाव स्थानिक ‘द्राविड-पूर्व’ भाषेवर पडल्याने तिथल्या भाषा आणि संस्कृती यांची उत्तर भारतातल्या ‘आर्य भाषा’ आणि ‘आर्य संस्कृती’ यांच्याशी समानता दिसते. फक्त ब्राह्मण वर्गानेच दक्षिणेत स्थलांतर केले, याला आधार काय? या बाबतीत काल्डवेल अगस्त्य ऋषींच्या कथेकडे बोट दाखवतो! अगस्त्य ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत स्थलांतर केले - या पौराणिक कथेचा फक्त दक्षिण भारतातच नव्हे, तर आग्नेय आशियातल्या ब्रह्मदेश, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, इत्यादी देशांमध्ये सुद्धा जबरदस्त पगडा आहे. त्या त्या ठिकाणच्या भाषा आणि संस्कृतीचे प्राचीन काळातले प्रवर्तक म्हणून अगस्त्य ऋषींकडे पाहिले जाते. परंतु, या कथेवरून अगस्त्यांच्या सोबत उत्तर भारतातून ब्राह्मणांचे जत्थेसुद्धा स्थलांतर करून आले, हे मात्र या पौराणिक कथेत कुठेच दिसत नाही. पण, काल्डवेल मात्र अगदी ठामपणे हे सांगतो! कशाच्या आधारावर? देवच जाणे! पण, हे सांगून काल्डवेलने ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजात दरी निर्माण करून ठेवली आहे, हे मात्र खरे!

फसलेले वर्गीकरण


‘द्राविडी’ आणि ‘इंडो-युरोपीय’ भाषांच्या वर्गीकरणासाठी आधार म्हणून फादर काल्डवेल काही भाषिक फरक सांगतो. ‘इंडो-युरोपीय’ भाषांमध्ये नाम आणि सर्वनाम यांच्याप्रमाणेच विशेषणांची सुद्धा विभक्ती रूपे होतात. पण, तमिळ भाषेत मात्र विशेषणांची विभक्ती रूपे होत नाहीत. हे निरीक्षण काल्डवेलने किती उत्तर भारतीय भाषांचा अभ्यास करून नोंदवले, ते माहित नाही. पण, ‘मराठी’ ही ‘इंडो-युरोपीय’ गटातली भाषा आहे. तिच्यातही विशेषणांची विभक्ती रूपे होत नाहीत. आपण ‘सुंदर फुलांची आरास’ असे म्हणतो, ‘सुंदरांची फुलांची आरास’ असे नाही. किंवा ‘मर्द मावळ्यांचा पराक्रम’ असे म्हणतो, ‘मर्दांचा मावळ्यांचा पराक्रम’ असे नाही. अशीच पद्धत हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही आहे. अजून एक फरकाचा मुद्दा काल्डवेलने सांगितला. तो म्हणजे, प्रथमपुरुषी अनेकवचनाची तमिळमध्ये दोन रूपे बनतात. त्यांपैकी एकात ते ऐकणार्‍या लोकांचाही समावेश होतो, तर एकात तो होत नाही. खरे तर मराठीतही अशी रूपे आहेतच - ‘आम्ही’ आणि ‘आपण.’ अशी रूपे हिंदीतही दिसतात - ‘हमारा’ आणि ‘अपना’ - तशीच इतर प्रादेशिक भाषांमध्येही दिसतात. असेच अजूनही काही मुद्दे आहेत. ते पाहता काल्डवेलचे हे भाषांचे वर्गीकरण बरोबर ठरत नाही.

एकूणच द्राविडी भाषांची जर अशीच वैशिष्ट्ये दाखवून द्यायची असतील, तर या दाक्षिणात्य भाषा ‘इंडो-युरोपीय’ भाषागटात ठेवायला हव्यात, हे ओघानेच येते. पण, तरीही त्यांचा पूर्णपणे वेगळाच भाषागट बनविण्याचे नेमके कारण संपूर्ण संशोधनातून कुठूनही कळत नाही! मध्य आशियातून उत्तर भारतात सर्व ‘आर्यांचे’ स्थलांतर एकीकडे सांगायचे. पण, दुसरीकडे मात्र उत्तर भारतातून दक्षिण भारतात त्या आर्यांपैकी फक्त एकाच वर्गाचे स्थलांतर सांगायचे - यातच खरे तर या संशोधनातला लंगडेपणा चटकन लक्षात येतो. अशा पद्धतीने ‘परकीय आगंतुक आर्य’ विरुद्ध ‘मूलनिवासी’ असा पेटविलेला संघर्ष किती फोल आहे, अथवा ‘जागतिक मूलनिवासी दिन’ सारखे दिनविशेष सुद्धा किती व्यर्थ आहेत, हे लक्षात येते.
(क्रमश:)

- वासुदेव बिडवे

(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ‘भारतविद्या’ अथवा प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@