शेतकऱ्यांना दिलेला शब्द मोदी सरकारने खरा केला ; पहिली 'किसान रेल' धावली

07 Aug 2020 13:58:49

kisan rail : प्रातिनिधिक


नवी दिल्ली :
भाजीपाला, फळे यासारख्या नाशवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ या विशेष रेल्वे सेवेचा शुभारंभ आज शुक्रवार रोजी करण्यात आला. पहिली गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून बिहारमधील दानापूरकडे रवाना झाली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीतून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.




यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, किसान रेल कृषी उत्पादने विशेषतः नाशवंत उत्पादनांची स्वस्त दरात वाहतूक करण्यास मदत करेल आणि या उपक्रमाचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर मिळण्यास मदत होईल. तोमर म्हणाले की, कोरोनाच्या काळात देशभरात खाद्यपदार्थांचा पुरवठा व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने ९६ मार्गांवर ४ ,६१० रेल्वे गाड्या चालवल्या आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना केल्या असून यामुळे देशातील शेतकरी स्वावलंबी व समृद्ध होतील. या व्हर्च्युअल समारंभात रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकारचे मंत्री छगन भुजबळ हेही उपस्थित होते.

नाशवंत मालाच्या पूर्णपणे वातानुकुलित वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागिदारीने विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचा अर्थसंंकल्प मांडताना केली होती. या रेल्वेने शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत विनाखंड वातानुकुलित वातावरणात मालाची वाहतूक करण्याची सोय उपलब्ध होईल. पहिली ‘किसान रेल’ गाडी आज ७ आॅगस्ट रोजी देवळाली येथून सकाळी ११ वाजता रवाना झाली. १,५१९ किमीचे अंतर ३१ तास ४५ मिनिटांत कापून शनिवारी (८ आॅगस्ट) सायंकाळी ६.४५ वाजता ही रेल्वे दानापूरला पोहोचेल. ही ‘किसान रेल’ गाडी आठवड्यातून एक दिवस चालविली जाईल. वाटेत ती नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर , खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, पं. दीनदयाल उपाध्याय नगर व बक्सर येथे थांबून दानापूरला जाईल. नाशिक जिल्हा आणि परिसरात ताज्या भाज्या, फळे, फुले, कांदे व अन्य नाशवंत मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. किंबहुना हा परिसर ‘किचन गार्डन’ म्हणूनच ओळखला जातो. हा माल महाराष्ट्रातील अन्य शहरांखेरीज अन्य राज्यांमध्ये पाटणा, अलाहाबाद, कटनी, सतना इत्यादी ठिकाणी पाठविला जातो.
Powered By Sangraha 9.0