‘तुंबई’ची मानकरी शिवसेनाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |


Mumbai_1  H x W



दरवर्षी पावसाळा आला रे आला की, नालेसफाईच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची तिजोरी रिकामी करायची, नालेसफाईचा दिखावा करायचा आणि मुंबईकरांनी दिलेल्या कराच्या पैशातून मेवा खायचा, हा शिवसेनेचा नेहमीचा शिरस्ता झाला. म्हणूनच ‘आमची मुंबई’ करत कित्येक वर्षांपासून घसा ताणणार्‍या शिवसेनेशिवाय मुंबईच्या तुंबईचे मानकरी कोणीच नाही.


मुंबईत गेले दोन दिवस तुफान पाऊस पडला नि नागरिकांवर आस्मानी व सुलतानी संकटाचा जाच सहन करण्याची वेळ आली. पावसाने आधीच बारा वाजवलेले असताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांच्या दैन्यावस्थेला पर्यावरणात झालेला बदल जबाबदार असल्याचा दावा केला. मुंबईतील पूरस्थिती वातावरणातील बदलामुळे ओढवली असून विरोधकांचे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरील आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. हिंदीमध्ये ‘बाप से बेटा सवाई’ नावाची एक म्हण असून त्याची आठवण इथे आल्याशिवाय राहात नाही. कारण, मागील पाच महिन्यांपासून देशासह राज्य-मुंबईवर कोरोनाची भीषण आपत्ती कोसळली. तथापि, कोणतेही संकट आले की, ते दूर करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी धडाक्याने उपाययोजना कराव्यात, अशी जनतेची अपेक्षा असते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपवाद वगळता कोरोनाशी लढण्यासाठी कोमट पाणी प्यायची, पत्ते-कॅरम खेळण्याची आणि वेळोवेळी फेसबुकवर येऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्याची धमक दाखवली. दरम्यानच्या काळात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले, तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई म्हणून कोकणी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले. आता आपले पिताश्रीच असा बावनकशी कारभार करतायत म्हटल्यावर पुत्र आदित्य ठाकरे तरी कसे मागे राहतील? त्यांनाही काहीतरी करुन दाखवण्याची खुमखुमी आली आणि ते मुंबईची ‘तुंबई’ झालेली पाहायला रस्त्यावर उतरले. बरं उतरले तर उतरले, तिथे जाऊन जनतेला दिलासा मिळेल, ‘आम्ही तुम्हाला या संकटातून बाहेर काढू,’ अशी ग्वाही द्यायची, तर तसे काही न करता आदित्य ठाकरे सगळा भार पर्यावरणावर टाकून मोकळे झाले. २०१७ सालीदेखील मुंबईत असाच पाणी तुंबण्याचा प्रकार झाला होता आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपले अपयश लवण्यासाठी नऊ किलोमीटरच्या ढगाचे पिल्लू सोडून कातडी बचावण्याचा उद्योग केला होता. आता आदित्य ठाकरे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांचाच कित्ता गिरवत असेच वातावरण-पर्यावरणाचे पिल्लू सोडून देण्याचे काम केले. जेणेकरुन मुंबई महापालिका, शिवसेना आणि ठाकरे सरकारच्या अपयशावर पांघरुण टाकता येईल.
 
 
दरम्यान, समुद्रकिनार्‍यावरील मुंबईवर कधी ना कधी निसर्गाचा कोप होतच असतो आणि त्यात हे शहर कोलमडून जाते. अशा मुंबईचा कारभार दोन दशकांपासून आदित्य ठाकरेंच्या पक्षाकडे म्हणजे शिवसेनेकडेच असून नैसर्गिक संकटावर मात करता येण्यासारख्या उपाययोजना राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडते. मात्र, २०-२५ वर्षे राज्याच्या राजधानीच्या नाड्या हाती असूनही शिवसेनेने इथे सुशासनाचे दीप लावण्याऐवजी दिवटेपणाचाच कारभार केला. निसर्गाचा कोप झाला तरी, हे शहर सुरळीत चालू शकेल, अशा सोयी-सुविधा सत्ताधारी शिवसेना अजिबात उभ्या करु शकली नाही. उलट दरवर्षी पावसाळा आला रे आला की, नालेसफाईच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची तिजोरी रिकामी करायची, नालेसफाईचा दिखावा करायचा आणि मुंबईकरांनी दिलेल्या कराच्या पैशातून मेवा खायचा, हा शिवसेनेचा नेहमीचा शिरस्ता झाला. यंदाही तसेच झाले नि आयुक्तांनी ११३ टक्के नालेसफाईचा दावा केला. म्हणजे नाल्याच्या तळाशी खोदकाम करत आणखी १३ टक्के खोल सफाई केली आणि तरीही मुंबई तुंबलीच. हे सत्ताधारी शिवसेनेचेच अपयश असून आदित्य ठाकरेंना मात्र पर्यावरण-वातावरणाला दोष देण्याचा आचरटपणा करावासा वाटतो. उल्लेखनीय म्हणजे, मुंबईत आतापर्यंत ठराविक ठिकाणीच पावसाचे पाणी तुंबण्याचा प्रकार घडत होता. पण, यंदाच्या पावसात तर मंत्रालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी, नरीमन पॉईंट, ओव्हल मैदान परिसर, मरीन ड्राईव्ह या परिसरातही गुडघ्यापर्यंत पाणी भरले. कधीही पाणी न तुंबणार्‍या जागा, असा या ठिकाणांचा लौकिक होता, पण इथेही चालू वर्षी पावसाळ्यात मुंबई महापालिका व शिवसेनेने पाणी ‘तुंबवून दाखवले.’ कदाचित, कोरोनाच्या काळात सारे काही बंद असल्याने ‘मागेल त्याला स्विमिंग पूलदेण्याची ही पर्यटनमंत्र्यांची अभिनव योजना असावी!

 
दरम्यान, मुंबई महापालिका दरवर्षी पाणी तुंबू नये म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचे, ब्रिमस्टोवॉड किंवा पाणी उपसणारे डिवॉटरिंग पंप वगैरे प्रकल्प उभारल्याचे सांगत असते. पण, परिणाम शून्यच, पाणी साठायचे ते साठतेच, कितीही पैसा ओतला तरी पाणी ओसरत नाहीच. अशाच पाण्यामुळे एखाद्या डॉक्टरचा, एखाद्या नोकरदाराचा, एखाद्या तरुणीचा, एखाद्या बाळाचा जीव जातो, कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि सत्ताधारी नुकसानभरपाई म्हणून दोन-चार-पाच लाख रुपये देण्याचा सोपस्कार उरकतात. पण, मुंबईची पाणी तुंबण्याची समस्या कायमची संपावी यासाठी पालिका वा सत्ताधारी ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत. म्हणूनच मुंबई तुंबवण्याचे हे अपयश जसे महापालिकेचे आहे, तसेच ते शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही आहे. कारण, आमची मुंबई करत घसा ताणणारी हीच मंडळी कित्येक वर्षांपासून इथे सत्तेत असून तिच्या बरे-वाईटपणाचे मानकरी त्यांच्याशिवाय कोणीच नाही. तथापि, याकडे दुर्लक्ष करुन शिवसेना किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ही लोकं केंद्र सरकार, भाजप नि नरेंद्र मोदींच्या नावाने बोंबाबोंब करुन, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची भीती दाखवत जनभावना भडकावण्याच्याच मागे लागलेले असतात. मात्र, शिवसेनेने हे लक्षात ठेवावे की, तुमच्या करंटेपणाकडे जनता पाहतेय आणि मुंबई तुंबवून दाखवणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी आतुर झालीय, योग्य वेळेची वाट पाहत. दरम्यान, मुंबईच्याच शेजारी दुसर्‍या बाजूला नवी मुंबई शहर असून तिथेही दरवर्षी अफाट पाऊस पडतो. पण, नवी मुंबईत कधी पाणी साचल्याचे, नवी मुंबई तुंबल्याचे दृश्य दिसत नाही, असे का होते, आपल्याचकडे पाणी का साठते, याचा विचार मुंबईच्या कारभार्‍यांनी आणि आदित्य ठाकरे यांनी नक्कीच करावा. त्यातून काही उत्तर सापडले तर मुंबईकरांची रस्त्यांवरील खड्डे, ढासळलेली आरोग्य सुविधा वगैरे त्रास असले तरी निदान पावसाळ्यातल्या पाणी तुंबण्याच्या एका त्रासातून मुक्तता होईल.

 
@@AUTHORINFO_V1@@