कलेतील रावबसाहेब @ ७६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |


Art_1  H x W: 0




‘रावसाहेब गुरव’, ‘सीर्फ नाम ही काफी हैं’ अशी ज्यांची ओळख आहे. ते कला क्षेत्रातील ‘रावसाहेब’ म्हणूनच परिचित आहेत. ‘धनगर’ या व्यक्तिरेखेला चित्रबद्ध, रंगबद्ध आणि आशयगर्भ बनविले ते ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव. ते पुण्याच्या ‘अभिनव कला महाविद्यालया’च्या प्राचार्यपदावरुन नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कलाजगताविषयी...



बर्‍याचदा सेवानिवृत्त झालेली व्यक्ती ही काहीशी नाराज, उदास आणि खिन्न होऊन निरुत्साही बनते. गुरव सर याला अपवाद आहेत. गुरव सर सेवानिवृत्तीची कदाचित वाट पाहात होते. ते निवृत्त झाले आणि अभिनव कला महाविद्यालयाच्या कलाजगातून बाहेर पडून त्यांनी आणखी एक नवीन जग निर्माण केले. ‘सुंबरान’ हे त्या कलाजगाचं नावं! ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ असं सांगत ‘आकाश के उसपारभी आकाश है!’ गानसाम्राज्ञी लतादीदींनी बालेवाडी, पुणे येथे गायलेल्या गीताची आठवण ‘सुंबरान’ पाहिल्यावर निश्चित होते.
 

कलेला वेळ-स्थळ-काळ-परिस्थिती या कुठल्याच सीमाबंधनांची गरज नसते. ती मन-भावना आणि इच्छाशक्तीच्या बळावर व्यक्त होत असते. ‘अभिनव’च्या प्रांगणात कलाविद्यार्थ्यांच्या रुपाने, जीवंत कलाकार जणू एक जीवंत कलाकृती निर्माण करतानाच गुरव सर ‘रावसाहेब’ बनले...! कलाजगताच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा दिनक्रम अधिक व्यस्त बनत गेला. आजही ते कलासृजनात रममाण असतात. सार्‍या जगभरातून त्यांच्याकडे कलारसिक, कलाकार, कलोपासक आणि कलाभ्यासक येतच असतात. कलासाधना करण्यासाठी पुणे-पौंड रस्त्यावर मुळशी तालुक्यात ‘सुंबरान’ व्हिलेज मायस्ट्री’ वसलेले आहे.
 
चित्रकार गुरव सर आणि त्यांची कन्या चित्रा मेटे अर्थातच त्याही कलाकार...! यांनी सुमारे दीड एकर जमिनीवर एक सुंदर नैसर्गिक रचना निर्माण केली. साक्षात निसर्गालाही तोंडात बोट घालायला लावणारी ही जीवंत कलाकृती. ‘सुंबरान’ तिचं शीर्षक!
 
‘सुंबरान’ एक आदर्श वास्तुशास्त्राचा मूर्तिमंत, देखणा वास्तुप्रकार जेथे अभ्यासकांसाठी-अभ्यागतांसाठी निवास करण्यास सुंदर खोल्या, जेवणासाठी एक टुमदार शेड, सेमिनार-मीटिंग्ज किंवा कार्यशाळेसाठी अद्ययावत, साधारण २०-२५ अभ्यासकांना बसण्यासाठीचा ‘प्रेझेंटेशन हॉल’, वरच्या मजल्यावर कलाकृती निर्माणासाठी खास गुरव सरांचा स्टुडिओ. या सार्‍या वास्तूमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण होईल, अशा वस्तू रंगयोजनांमधील समर्पक रचना आणि वास्तूबाहेर आलं की, अनेकफुलांनी वनस्पतींनी हिरवाईने नटून-थटून सजलेला परिसर खुणावतच असतो...‘हम भी कुछ कम नही’ असं सांगतो.
 
सरांच्या कॅनव्हासवरील रंगसृजन आणि ‘सुंबरान’च्या परिसरातील निसर्ग यांचा अनोखा संगम म्हणजे चित्रकार रावसाहेब गुरव यांचं मूर्त स्वरुपातील स्वप्न, जादुई दुनिया. येथे सार्‍या जगभरातील रसिक कलाविद्यार्थी आणि कलाकार, कुणी निवांत कलासृजनासाठी येतात, तर कुणी कलाकार्य, शाळा सेमिनार, आर्ट कॅम्प वगैरेसाठी येत असतात. त्यासाठी रावसाहेब गुरव (९८२२३९९८७३) आणि चित्रा मेटे (९९२३६२१११२) यांना संपर्क केला की, ‘सुंबरान’ची वेळ वगैरे निश्चित करता येते. ‘विक्एंड’पासून ‘वर्कशॉप’पर्यंत सतत आणि सातत्याने ‘सुंबरान’ व्यस्त असते.

चित्रकार रावसाहेब गुरव यांनी त्यांच्या कलाशैलीतंत्रात काळ-वेळ आणि प्रासंगिकता यांचा समन्वय साधून अनेक आशयगर्भ आणि सौंदर्यभिरुची पूर्ण कलाकृतींना जन्माला घातले आहे. आजही त्यांचं कलाकार्य अव्याहतपणे सुरू असते.
 


कलेच्या वार्षिक कार्यक्रमांच्या मांदियाळीत ‘सुंबरान’ येथे सतत कलाज्येष्ठांची वर्दळ सुरू असते. मग कला शिक्षणतज्ज्ञ सुधाकर चव्हाण, डॉ. सुभाष यशवंत पवार, चित्रकार मुरली लाहोटी यांच्यासह अनेक कलाकार येथे कलानिर्मितीसाठी येतच असतात.


गुरव सरांच्या एका पेंटिंगला फ्रान्समधील ‘पिकिए पोशया प्रकाशन संस्थेने त्यांच्या एका ग्रंथाच्या मुखपृष्ठासाठी निवडले, तर दिल्लीच्या ज्येष्ठ पत्रकार व लेखक खुशवंत सिंग यांच्या ‘दिल्ली’ या इंग्रजी पुस्तकाच्या फ्रेंच अनुवादासाठी ‘धनगर’ या शीषर्काखालील, गुरव सरांच्या कलाकृतीचा मुखपृष्ठासाठी उपयोग केलेला आहे. तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ गुरव सरांची ‘धनगर’ ही चित्रमालिका देश-विदेशात गाजली आहे.
 

‘लॉकडाऊन’च्या काळात गुरव सरांनी तब्बल ४०-५० पेंटिंग्ज निर्माण केली आहेत. त्यांची कन्या चित्रा मेटे सांगत होत्या, “त्यांनी म्हणजे गुरव सरांनी आपली कलाकृती विकली जावी, या हेतूने कधीच निर्माण केली नाही. ‘कलेसाठी कला’ हे त्यांचं तत्त्व त्यांनी आताच्या ७६व्या वर्षातही काटेकोरपणे पाळलेलं आहे.हे सांगताना चित्रा यांचा कंठ दाटून आला होता! खरंही आहे ते. कौटुंबिक स्तरावर कलाकाराची कुठलीही परंपरा नसलेला हा अवलिया कलाक्षेत्रातील ‘रावसाहेब‘ बनतो आणि ‘ज्येष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव’ अशी ओळख निर्माण करतो. त्यांच्या कलासृजनाला शतकी भागीदारीचं सुदृढ कला जीवन लाभो, हीच सदिच्छा...!!
 
 

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@