‘त्यां’ना झोंबलेल्या मिरच्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020
Total Views |


Ram Mandir_1  H



श्रीराम मंदिराचा पायाभरणी सोहळा होतानाच असदुद्दीन ओवेसी यांचा तीळपापड झाला. बाबराचा वंशज किंवा सेनापती मीर बाकी शोभावा, अशा पद्धतीने ओवेसींनी इथे साडेचारशे वर्षांपासून बाबरी मशीद होती, आहे आणि राहणारच, अशी दर्पोक्ती केली. तसेच श्रीराम मंदिरनिर्मितीने मिरच्या झोंबल्याने हा सेक्युलरिझम आणि लोकशाहीचा पराभव तर हिंदुत्वाचा विजय असल्याचे ते म्हणाले.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीला सुरुवात होऊन हिंदू व भारतीयांच्या जीवनातील संघर्षाचा एक टप्पा पूर्ण झाला. भारतभूमीसह जगभरातील प्रत्येक श्रीरामभक्ताने पाहिलेले स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्यात उतरले. मात्र, श्रीराम मंदिराची पायाभरणी किंवा मंदिरनिर्मिती हा केवळ एक टप्पा असून हिंदुत्वनिष्ठांचे ध्येय त्याहून अधिक आहे आणि त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. श्रीराम मंदिरनिर्मितीबरोबरच राष्ट्रनिर्मितीही महत्त्वाची असून भारताच्या सर्वशक्तीसंपन्न होण्यातून ती साकार होईल. व्यक्ती, समाज व राष्ट्र घडवतानाच देशाला सर्वप्रकारे स्वयंपूर्ण, आत्मनिर्भरही करावे लागेल. तसेच आज काँग्रेस, समाजवादी पक्ष वगैरे विरोधकही श्रीरामाचे नाव घेताना व श्रीराम मंदिराचे स्वागत करताना दिसतात. हा तथाकथित सेक्युलर, धर्मनिरपेक्ष व हिंदूंचे दमन करणार्‍या राजकारणाच्या पिछाडीचा व हिंदुहिताचे राजकारण प्रभावी होण्याचा पुरावा आहे. तथापि, इतरांच्या रामनाम घेण्याला न भुलता, त्यांना हे तत्त्वासाठी नव्हे तर मतांसाठी करावे लागत असल्याचे भान ठेवत, वेळ येताच याची आठवणही करून दिली पाहिजे. राष्ट्रीय व प्रादेशिक राजकारणातही हिंदुहिताची भूमिका प्रत्येकाने घेण्यासाठी आधुनिकतेची हिंदुत्वाच्या मूळ पायाशीही सांगड घालावी लागेल. त्यातून आपला वारसा, संस्कृती व राष्ट्राचे चैतन्य पुनःस्थापित करण्याचे ध्येयही साध्य होईल. तसेच अयोध्या आंदोलनादरम्यान काशी-मथुरामुक्तीच्या घोषणाही देण्यात आल्या होत्या व आता त्यासंबंधी न्यायालयात वेगवेगळ्या प्रकारे याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. त्या सर्वांनाही समर्थन, पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून धर्मांध आक्रमकांच्या अत्याचारापुढे हिंदूंनी गमावलेल्या वैभवाच्या खाणाखुणा पुन्हा उजळून निघतील. सोबतच शासकीयदृष्ट्या समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, या मुद्द्यांचीही पूर्तता व्हायला हवी. तसे झाले तर ध्येयपूर्तीतले आणखी काही टप्पे पूर्ण होतील व अंतिम लक्ष्याचा मार्ग आणखी सुकर होईल.


 
दरम्यान, अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा होत असतानाच एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा चांगलाच तीळपापड झाला. बाबराचा वंशज किंवा सेनापती मीर बाकी शोभावा, अशा पद्धतीने ओवेसींनी श्रीरामजन्मभूमीस्थळी बाबरी मशीद असल्याचे वकिली केली. “साडेचारशे वर्षांपासून बाबरी मशीद होती, आहे आणि राहणारच,” अशी दर्पोक्ती त्यांनी केली. तसेच श्रीराम मंदिरनिर्मितीने मिरच्या झोंबल्याने हा सेक्युलरिझम आणि लोकशाहीचा पराभव तर हिंदुत्वाचा विजय असल्याचे ते म्हणाले. त्याला कारण अर्थातच त्यांचा एकगठ्ठा मुस्लीम मतांवर असलेला डोळा. धर्माच्या मुद्द्यावर मुस्लिमांना खेळवत राहायचे आणि आपली राजकारणाची पोळी भाजून घ्यायची ही त्यांची यामागची मानसिकता. कारण, काँग्रेससह सप व बसपनेही श्रीराम मंदिराचा विरोध न केल्याने मुस्लीम लोकांनी त्यांच्याऐवजी आपल्याला निवडावे, अशी ओवेसींची अपेक्षा. त्यासाठीच ते पुन्हा पुन्हा बाबरी मशिदीची अगदी कळवळून तरफदारी करताना दिसतात. मात्र, यातून त्यांचा संविधानद्रोहही समोर येत असून त्यांचा न्यायालयावरही विश्वास नसल्याचे स्पष्ट होते. कारण, श्रीरामजन्मभूमीस्थळाचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रकारचे साक्षी-पुरावे तपासून, घटनात्मक कसोटीवर तासून दिला आहे. न्यायालयाने तो निर्णय, जसे ओवेसी भावनेच्या भरात काहीबाही बरळतात, तसा दिलेला नाही. पण, बॅरिस्टर असलेल्या ओवेसींची तेही समजून घेण्याची कुवत नाही. तसेच श्रीराम मंदिरनिर्मिती जर सेक्युलरिझमचा पराभव असेल, तर बाबरी ढांचानिर्मिती कशाचा पराभव होता, याचेही उत्तर ओवेसींनी द्यावे. एका समृद्ध देशाच्या सांस्कृतिक वारशाला आपल्या रानटी धर्मांधपणापायी उद्ध्वस्त करणार्‍यांनी केलेला तो सत्याचा, तथ्याचा पराभवच होता ना? आज तोच पराभवाचा कलंक मिटला गेला, त्यामुळे खरे तर सेक्युलरिझमचे गोडवे गाणार्‍या असदुद्दीन ओवेसींनी आनंद व्यक्त केला पाहिजे आणि तेवढेही करता येत नसेल तर निदान तडफडू तरी नये!
 


भारतात असदुद्दीन ओवेसी आणि सेक्युलरिझमचे भुक्कड-भंपक वारस श्रीराम मंदिरावरून कोकलत असतानाच काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही विरोधाचा सूर लावला. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने, ‘भारत मुस्लिमांच्या अपमानाचा उत्सव साजरा करत आहे,’ असा लेख लिहून आपणही दाढ्या कुरवाळण्यात अजिबात मागे नसल्याचे दाखवून दिले. तसेच ‘कलम ३७०’ रद्दीकरणाच्या वर्षपूर्तीचा संदर्भ देत मुस्लिमांच्या आयुष्यात आणखी एक अवमानजनक घटना घडल्याचे त्यांनी म्हटले, तर ‘अल जजीरा’ने, एका बाजूला श्रीराम मंदिरनिर्मिती होत असताना दुसर्‍या बाजूला भारताची जुनी प्रतिमा डागाळण्याचा धोका वाढत असल्याचे लिहिले. तसे असेल तर ठीकच, भारताची केवळ एकाच एका धर्माची तळी उचलण्याची, काळजी करण्याची व हिंदूंना कायम सावत्र वागणूक देण्याची ओळख पुसत असेल तर उत्तमच! कारण, देश सर्वप्रथम हिंदूंचा आहे नि अयोध्येबाबतचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनेच दिला गेला व मंदिरनिर्मितीही संविधानिक पद्धतीनेच होते आहे. त्यामुळे ‘अल जजीरा’ने भारताची काळजी करू नये. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांना ‘फेक न्यूज’ म्हणून हाकलून लावतात, त्या ‘सीएनएन’नेही श्रीराम मंदिराला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून विरोध केला. पण, देशात कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे व मृत्युदराचे सातत्याने घटते प्रमाण ‘सीएनएन’ला दिसले नाही. अर्थात भारत, नरेंद्र मोदी व हिंदूंना विरोधच करायचा म्हटल्यावर सत्य आणि तथ्याला धाब्यावर बसवूनच करावा लागतो, तेव्हा ‘सीएनएन’देखील तसेच करणार. त्यानंतर ‘द गार्डियन’ने संयम व निष्पक्षतेचा आव आणत भारतीय मुस्लिमांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. ४०० वर्षांपासूनची मशीद गेल्याचे दुःख आणि मंदिरनिर्मितीला मौन सहमती, अशी मुस्लिमांची भावना असल्याचे त्यांनी म्हटले. पण, पाच शतकांपूर्वी बाबराने मंदिर तोडल्यानंतरच्या हिंदूंच्या अवस्था, भावनेची ‘द गार्डियन’ला आठवण झाली नाही. कारण, हे सगळेच ढोंगबाजांचे टोळके असून त्यांना वास्तवाशी काडीचेही देणेघेणे नसून काडी टाकण्यात आनंद वाटतो.
 


दरम्यान, श्रीराम मंदिरनिर्मितीचा आनंद प्रत्येक भारतीयाला झालेला असतानाच पाकिस्तानला झटका बसल्याचे वृत्तही समोर आले. जम्मू-काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेद्वारे (युएनएससी) सोडविला जावा, अशी पाकिस्तानची इच्छा होती व त्यासाठी बुधवारी एका अनौपचारिक बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. पण, इथे पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली आणि जम्मू-काश्मीरबाबत ‘युएनएससी’द्वारे मार्ग काढण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न अपयशी ठरले. बंद खोलीत झालेल्या ‘युएनएससी’च्या बैठकीत पाकिस्तानला सणसणीत चपराक बसली व जम्मू-काश्मीर भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असून आमचा वेळ वाया घालवू नका, असे सुनावले. पाकिस्तानच्या दृष्टीने आणखी लज्जास्पद बाब म्हणजे अमेरिकेने सदर बैठक कोणत्याही निर्णयाविना संपन्न व्हावी असे म्हटले व चीनदेखील यावर काहीही करू शकला नाही. अर्थात, आतापर्यंत पाकिस्तानच्या कटोर्‍यात ज्यांनी पैसे टाकले आणि आजही जो देश त्यांच्या वाडग्यात काही ना काही पैसे टाकत असतो, त्या दोन्ही देशांचा त्याला उपयोग झाला नाही. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचाच विजय असून, भारतीयांसाठी श्रीराम मंदिरनिर्मितीबरोबरच आणखी एक आनंददायक घटनाक्रम ठरल्याचे स्पष्ट होते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@