कल्याणमध्ये सापडला दुर्मीळ दुतोंडी घोणस; पहा व्हिडीओ

    दिनांक  06-Aug-2020 19:13:57
|

snake_1  H x W: 

एकाच परिसरातून दुसऱ्यांदा नोंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कल्याणच्या गंधारे परिसरातून आज दुर्मीळ दुतोंडी घोणस सापाचा बचाव करण्यात आला. यापूर्वी गेल्यावर्षी कल्याणमध्ये अशाच प्रकारचा दुतोंडी घोणस साप आढळून आला होता. त्यावेळी संशोधनादरम्यान त्याचा हाफकिन संशोधन संस्थेत मृत्यू झाला होता. वन विभागाच्या आदेशानुसार आज सापडलेला दुतोंडी घोणस वन्यजीव बचाव संस्थेकडे ठेवण्यात आला असून या दुर्मीळ घटनांची नोंद मधून संशोधन पत्रिका लिहण्यात येणार आहे.snake_1  H x W: 

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्प बचावाच्या घटनेत वाढ झाली आहे. कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीही वन्यजीव बचाव संस्थेचे स्वयंसेवक वन्यजीव बचाव, संरक्षण, संवर्धन आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. कल्याणच्या गंधारे परिसरात राहणाऱ्या डिंपल शहा यांना ऋतु रिव्हर्स इमारतीच्या प्रवेशव्दारजवळ सापाचे एक पिल्लू आढळून आले. त्यांनी याची माहिती 'वाॅर रेस्क्यू फाऊंडेशन'च्या स्वयंसेवकांना दिली. फाऊंडेशनचे सर्पमित्र निलेश नवसरे आणि प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला. त्यावेळी त्यांना हा साप दुर्मीळ दुतोंडी घोणस असल्याचे निदर्शनास आले. भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांच्या यादीतरसल व्हायपरम्हणजेच घोणसया सापाचा समावेश होतो.

 

मुंबई महानगर प्रदेशात घोणस हा साप सामान्यत: आढळतो. त्यामुळे ही प्रजात दुर्मीळ नाही. परंतु, दुतोंडी साप हा क्वचितच आढळून येतो. यापूर्वी २० सप्टेंबर २०१९ रोजी गंधारे परिसरातच दोन तोंडी घोणस सापाचा बचाव 'वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन'च्या टिम'ने केला होता. त्यावेळी या सापाला संशोधनाच्या निमित्ताने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली 'हाफकिन संशोधन संस्थे'च्या ताब्यात देण्यात आले होते. परंतु, संशोधन सुरू असताना सापाचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात दुसऱ्यांदा असा प्रकारच्या दुतोंडी घोणस सापाला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश मिळाल्याचे 'वाॅर रेस्क्यू टिम'चे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगितले. ठाण्याचे उप वनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर आणि कल्याणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांच्या आदेश येईपर्यंत हा साप 'वाॅर रेस्क्यू टीम'च्या ताब्यात असणार आहे. दोन दुर्मीळ दुतोंडी घोणस साप एकाच परिसरात आढळल्याने त्या जागेबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. या घटनेची जागतिक स्तरावर नोंद करण्यासाठी सरिसृप संशोधन पत्रिकेत ( Reptiles Rescerch Paper) ही माहिती प्रसिद्ध करणार असल्याचे 'वाॅर रेस्क्यू टिम'चे सचिव सुहास पवार यांनी सांगितले.
snake_1  H x W:


 

'घोणस' विषयी

या
सापाच्या शरीरावर साखळीसारख्या रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतो. तो आपले विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला 'कोरडा चावा' असे म्हणतात. भारतामध्ये दरवर्षी सर्पदंशाने होणाऱ्या जीविताहानीमध्ये घोणस सापच्या दंशाचा वाटा मोठा असल्याची माहिती उभयसृपशास्त्रज्ञ केदार भिडे यांनी दिली. इतर सापांच्या तुलनेत या सापाच्या विषामुळे मानवी अवयवांचा नाश मोठ्या प्रमाणत होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा साप पोटामध्ये अंडी उबवतो पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर शरीराबाहेर काढतो.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.