अहमदाबादच्या कोविड रुग्णालयाला भीषण आग

06 Aug 2020 12:45:23

ahmedabad_1  H



अहमदाबाद : 
गुजरातच्या अहमदाबाद येथील एका कोविड रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये घडली. स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर जवळपास ४० रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्‌वीटमध्ये म्हटले आहे की,”अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने दु:खी झालो आहे. मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना. या घटनेसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून घटनेतील लोकांना यथासंभव मदत केली जात आहे.”





दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, रात्री साडेतीनच्या सुमारास आयसीयूतील पलंग क्रमांक ८ जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि पलंगावर झोपलेल्या महिला रूग्णाच्या केसांपर्यंत पोहोचली. यामुळे घाबरलेल्या महिलेला वाचविण्यासाठी आलेल्या नर्सच्या पीपीइ किटला आग लागली. यानंतर आग विझविण्यासाठी दोन कर्मचारी पुढे आले आणि ते जखमीही झाले. अपघाताच्या वेळी आयसीयूमध्ये १० रुग्ण होते. त्यापैकी ८ रुग्ण मरण पावले आहेत. आयसीयूमध्ये लागलेल्या भीषण आगीत ऑक्सिजन सिलिंडर कोसळला आणि त्यातून आग पसरली. यामुळे रुग्णांना बाहेर पडता आले नाही आणि संपूर्ण आयसीयू जळून खाक झाला आहे.


आगीतून रुग्णांना वाचविणारे अग्निशामक दलाचे सर्व जवान क्वारंटाईन


अहमदाबाद अग्निशमन दलाचे अतिरिक्त मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश भट म्हणाले की, अग्निशमन दलाची टीमला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला असल्याचा आरोप खोटा आहे. माहिती मिळाल्यानंतर आम्ही १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो. ते म्हणाले की, आम्ही येथे पोहोचलो तोपर्यंत संपूर्ण आयसीयू जळून खाक झाला होता. आगीचे कारण ऑक्सिजन सिलिंडर होते. दुसरीकडे, रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ४० रुग्ण होते, तेथे धूर होता. काहीही दिसत नव्हते. येथे बर्‍याच रुग्णांना ऑक्सिजन होता. त्यामुळे धोका सतत वाढतच होता. या सर्वांच्या दरम्यान ब्रिगेडच्या ४० जवानांची टीम दाखल झाली आणि त्यांनी एक-एक करुन सर्व रुग्णांना बाहेर काढले. आम्ही थेट कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलो. त्यामुळे सर्व कर्मचारी क्वारंटाईन होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0